प्रस्तावना
वृत्तपत्रविद्या व संज्ञापन विभाग सावित्रीबाई फुले विद्यापीठच्या वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रमाची प्रकल्प भेट कृष्णा खोरे विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन अंतर्गत असलेल्या कोयना – सिंचन व जलविद्यूत प्रकल्पाला आयोजित करण्यात आली होती. या भेटीसाठी अनेक दिवस प्रयत्न सुरु होते. पण तो देशपातळीवरील खूप महत्वाचा प्रकल्प असल्याने तेथे भेट देण्यासाठीची परवानगी मिळवणे हे आव्हान होतेच, पण तरीही विभागाच्या व पत्रकार संघाच्या प्रयत्नाने हि भेट निश्चित झाली. प्रत्यक्ष प्रकल्पाच्या ठिकाणावर जाऊनही सरकारी कामातील नेहमीच्या प्रक्रिया आणि अटी यामुळे शेवट पर्यंत प्रकल्पाला भेट होणार कि नाही याबद्दल अनिश्चितता होती पण त्याही वेळी सोबत आलेल्या शिक्षकांनी प्रयत्न करून ती भेट निश्चित केली.
या भेटीत प्रकल्पाची माहिती घेत प्रकल्पाचे एकूण राज्य आणि देशपातळीवरील महत्व तसेच त्या प्रकल्पाचा सर्वांगीण परिणाम अभ्यासता आला. माहिती घेताना अवती भवतीची जैवविविधता, धरणाच्या बांधकामातील तंत्रज्ञान, तेथील स्थानिक रहिवाश्यांच्या सांस्कृतिक व आर्थिक स्थितीचे निरीक्षण, विस्थापितांचा प्रश्न, धरणाचे विकास प्रक्रियेतील महत्व, आपत्कालीन स्थितीत कार्यान्वित होणारी यंत्रणा, सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या योजना या सर्वच गोष्टींचा अभ्यास करणे या अभ्यास भेटीमुळे शक्य झाले. पर्यटकांच्या नजेरेतून न बघता पत्रकारितेचे विद्यार्थी म्हणून या प्रकल्पाकडे बघताना आलेला अनुभव देखील महत्वाचा ठरला. या भेटीदरम्यान सातारा जिल्ह्यात असलेल्या लिंब या गावातील शिवकालीन विहीरही बघायला मिळाली. याबाबतच्या सर्वच निरीक्षणांचा आणि अनुभवांचा हा भेट अहवाल ...
प्रकल्पाविषयी
कोयना प्रकल्पाला भेट देताना माहिती मिळवण्यासाठी सुरुवातीपासून वर्गमित्र ओंकार वाबळे याचा तसेच प्रा. संदीप नरडीले, प्रा. अभिषेक भोसले यांचा खूप उपयोग झाला. यासर्वांनीच प्राथमिक स्वरूपातील आवश्यक ती माहिती दिल्याने प्रकल्प अभियंते नितीन राणे यांना प्रश्न विचारण्यास मदत झाली. नितीन राणे यांनी खूपच प्रभावीपणे कोयना प्रकल्पाची इतिहासापासून तर आत्तापर्यंतची वाटचाल सांगितली. त्यांनी सांगितलेल्या माहितीत अधिकतर माहिती ही अभियांत्रिकी स्वरूपातील होती. तरीही त्या माहितीत या प्रकल्पाचे एकूण राष्ट्रीय स्तरावरील महत्व, आजपर्यंत झालेला उपयोग, जागतिक पातळीवरील महत्व, आपत्कालीन परिस्थितीतील अडचणी व त्यावर केलेली मात, तंत्रज्ञानातील सुधारणा व सज्जता या सर्वांचाही समावेश होता. त्यामुळे पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांमध्ये अभियांत्रिकेची पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांनाही चांगली माहिती मिळाली. अभियांत्रिकेच्या स्वरूपातील आकडेवारी आणि तांत्रिक प्रक्रिया मात्र समजल्या नाही अशी प्रामाणिक भावना देखील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. नितीन राणे हे शासकीय कर्मचारी असल्याने त्यांची माहिती ही सरकारची बाजू घेणारी असली तरी त्यांनी व्यक्ती म्हणून तेथील पुनर्वसनाचा प्रश्न संपला नसल्याचे प्रामाणिक मत व्यक्त केले. सोबतच पुनर्वसनासाठी करत असलेल्या प्रयत्नांची व त्यांना आकलन झालेल्या तथ्यांचीही माहिती त्यांनी दिली. आम्हा विद्यार्थ्यांना प्रकल्प बघता यावा यासाठी तेथील कर्मचारी वर्गाने महत्वाच्या भागांची माहिती थेट त्या ठिकाणी नेऊन दिली.
या प्रकल्पाची निर्मिती प्रक्रिया स्वातंत्र्यपूर्व काळापासून झाली होती, परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या परिस्थितीत ते काम मागे पडले व नंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंत्रप्रधान पंडित नेहरू यांनी या प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावरील महत्वकांक्षी प्रकल्प बनवले. यानंतरच कोयना प्रकल्प उभारणीला गती मिळाली. या प्रकल्पाच्या पाहणी मध्ये व जागा निवडीमध्ये ब्रिटिश सरकारने वापरलेली दृष्टी ही महत्वाची आहे हेही या माहितीतून समजले. पुढे कोयना भूकंपामध्ये धरणाच्या रचनेला झालेले नुकसान व भविष्यात अशा भूकंपांना तोंड देता यावे म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करत बटरफ्लाय भिंतींचे बांधकाम करण्यात आले होते त्यामुळे धरणाची भूकंप सहन करण्याची क्षमता वाढली. बाष्पीभवनामुळे होणारे पाण्याचे नुकसान टाळण्यासाठी लवकरच धरणातील पाण्यावर सौरऊर्जा संयंत्र बसवण्याचा निर्णय घेण्याचा विचार सुरु असल्याची माहिती या वेळी मिळाली. आपत्कालीन परिस्थितीत जेव्हा बाहेरीलभागाशी संपर्काची यंत्रणाच शिल्लक राहिली नव्हती त्यावेळी मोठी अडचण निर्माण झाली होती. म्हणूनच आत्ता प्रकल्पाच्या ठिकाणीच नवीन संपर्क तयार केली आहे. सोबतच भूकंपाचा पूर्वअंदाज घेण्यासाठी आणि पाण्याची पातळीचा अंदाज घेण्यासाठी विशेष यंत्रणा बसवल्याची माहिती यावेळी मिळाली.
धरणाची माहिती
कोयना धरणाचे बांधकाम रबल काँक्रीट प्रकारचे आहे. या बांधकाम प्रकारामुळे धरणाला विशिष्ट प्रकारची लवचिकता अली आहे. भूकंपाच्या स्थितीत हीच लवचिकता धरणाला टिकून राहण्यासाठी नि कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी उपयोगी पडते. पाण्याच्या वेगाचा व दबावाचा सामना करण्यात देखील बांधकामातील ही लवचिकता पूरक ठरते.
कोयना धरणाची उंची १०३.०२ मीटर असून ही उंची महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. तसेच धरणाची लांबी ८०७.७२ मीटर आहे. धरणाच्या दरवाज्याचा प्रकार S स्वरूपाचा असून त्याचा आकार - लांबी ८८.७१ मीटर आहे. या दरवाज्यांतून होणार सर्वोच्च विसर्ग ५४६५ घनमीटर / सेकंद आहे. अशा दरवाज्याची एकूण संख्या संख्या ६ आहे तर आकार १२.५० X ७.६२ मी एवढा आहे.
पाणीसाठा क्षमता : २७९७.४ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : २६७७.६ दशलक्ष घनमीटर
ओलिता खालील क्षेत्र : १२१०० हेक्टर
ओलिता खालील गावांची संख्या : ९८
टप्पा १:
जल प्रपाताची उंची : ४७५ मी. , जास्तीत जास्त विसर्ग : १६४ क्यूमेक्स, निर्मिती क्षमता : २६० मेगा वॅट, विद्युत जनित्र : ४ X ६५ मेगा वॅट
टप्पा २:
जल प्रपाताची उंची : ४९० मी., जास्तीत जास्त विसर्ग : १६४ क्यूमेक्स निर्मिती क्षमता : ३०० मेगा वॅट, विद्युत जनित्र : ४ X ७५ मेगा वॅट
टप्पा ४:
जल प्रपाताची उंची : ४९६ मी., जास्तीत जास्त विसर्ग : २६० क्यूमेक्स, निर्मिती क्षमता : १००० मेगा वॅट, विद्युत जनित्र : ४ X २५० मेगा वॅट
शिवसागर जलाशय
पाणीसाठा
क्षमता : २७९७.४ दशलक्ष घनमीटर, वापरण्यायोग्य क्षमता : २६७७.६ दशलक्ष घनमीटर, ओलिताखालील क्षेत्र : १२१०० हेक्टर, ओलिताखालील गावे : ९८
कोयना अभयारण्य
कोयना प्रकल्पाचा अभ्यास करताना तेथील नदीभोवती आढळणाऱ्या अभयारण्याचीही दखल घेणे क्रमप्राप्त आहे. कोयना नदीच्या किनाऱ्यावर कोयना अभयारण्य आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक घनदाट जंगलांमध्ये कोयना अभयारण्याचा समावेश होतो. हे अभयारण्य कोयना धरणाच्या भिंतीमागील शिवसागर जलाशयाच्या कडेकडेने पसरलेले आहे. इतिहासात हे जंगल जावळीचे खोरे म्हणून प्रसिद्ध आहे. अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ ४२६ चौ.किमी असून याला १९८५ मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळाला. या अभयारण्याला व्याघ्रप्रकल्पाचा दर्जाही मिळावा म्हणून राज्य सरकारचे प्रयत्न आहे. हे अभयारण्य कोयना जलाशयाच्या कडेकडेने पसरलेले आहे.
कोयना नगर ते महाबळेश्वरच्या जवळील तापोळा या ६०-७० किमी अंतरापर्यंत नदीच्या कडेकडेने हे जंगल आहे. ढोबळमानाने अभयारण्याचे तीन मुख्य विभाग पडतात महार खोरे, वासोटा व मेट इंदवली. त्यामध्ये इंदवळी, कुसावळी, सिंधी, बलवण, मोरवी, म्हाळुंग, वाघावळे, कुसापूर, तापोळा, कांदाटकी खोरे अशा गावांच्या वनक्षेत्रांचा समावेश होतो. शिवसागर तलावाची नैसर्गिक तटबंदी या अभयारण्याला लाभली आहे. धरणाच्या जलाशयात मोठ्या प्रमाणावर येथील जंगल पाण्याखाली गेले. जलाशयाच्या पश्चिमेकडील बाजूसच अभयारण्याचा बहुतांशी भाग येतो जो अतिशय घनदाट आहे. अभयारण्याच्या पश्चिमेकडे नदीच्या एका बाजूला सह्याद्रीची मुख्य रांग आहे व दुसऱ्या बाजूस सह्याद्रीची उपरांग आहे. या दोन्ही रागांमधोमध कोयना नदी वाहते. मुख्य रांगेचा उतार नदीच्या बाजूला सौम्य आहे तर पश्चिम बाजूला ९० अंशाचा कडा आहे. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच कडा जो 'बाबू कडा' नावाने ओळखला जातो, तो येथे आहे. अभयारण्यातील सर्वोच्च ठिकाण वासोटा किल्ला आहे. उंची साधारणपणे ११०० मीटर. एकाबाजूला नैसर्गिक कडा व दुसऱ्या बाजूला मानवनिर्मित जलाशय, यामुळे येथील जंगलाला एक प्रकारचे जंगलतोडीपासून अभय मिळाले आहे. कोयनेबरोबरच सोळशी व कांदाटी याही नद्या अभयारण्यात वाहतात. जून ते सप्टेंबर या महिन्यात प्रचंड पाऊस पडतो. एका वर्षाची पावसाची सरासरी अंदाजे ५००० मिमी इतकी आहे.
जंगलाचा प्रकार
येथील जंगलाचा समावेश दमट विषववृत्तीय सदाहरित जंगलात होतो. महाराष्ट्रात असे जंगल इतरत्र केवळ महाबळेश्वर येथे आहे. जंगलतोड कमी असल्याने महाराष्ट्रात इतरत्र न आढळणारे वृक्ष कोयना जंगलात दिसून येतात. प्रचंड वृक्ष, त्याखाली मध्यम उंचीच्या वनस्पती (कारवी, वाकटी या सारख्या), त्याखाली नेच्यासारख्या वनस्पती व त्याखाली गवतासारख्या वनस्पती असे एकाच जागी ४ स्तरातील वनस्पतींनी येथील जंगल घनदाट केले आहे. तसेच विविध प्रकारच्या लहान, मोठ्या आणि अजस्र वेलींनी देखील येथील इंच न् इंच व्यापला आहे. अंजनी, जांभूळ, हिरडा, आवळा, ऐन, आंबा, भोमा, काटक, उंबर, जांभा, बिब्बा शिकेकाई, गारंबी, करवंदे, रानमिरी, तोरण, धायटी, कडीलिंब, मुरुडशेंग या येथे आढळणाऱ्या वनस्पती आहेत.
प्राणिजीवन
पश्चिम महाराष्ट्रातील वन्यप्राण्यांची सर्वाधिक घनता या अभयारण्यात आहे. जंगल अतिशय घनदाट व दुर्गम असल्याने वन्यप्राण्यांची गणती करणे येथे अवघड आहे. हरिणांमध्ये सांबर, भेकर व पिसोरी आढळतात. इतर प्राण्यांमध्ये माकडे, वानरे,तरस, कोल्हे, खोकड, ऊदमांजरे, साळिंदर तसेच रात्रीच्या वेळात रानससे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात, ट्रेकर्सना येथे नेहमी अस्वल दृष्टीस पडते व आमनासामना होतो. वन्यप्राण्यांच्या भयापोटी पूर्वी बरेचसे ट्रेकर्स फटाके वाजवत फिरत, परंतु आता अभयारण्यात फटाके उडवण्यास बंदी आहे. बिबट्याचेही दर्शन नशीबवंताना होते.
ठश्यांवरून व रात्रीच्या डरकाळ्यांच्या आवाजावरून या अभयारण्यात वाघ आहेत हे सिद्ध होते परंतु ते सहसा दिसत नाहीत. अजून येथील खास वैशिट्य म्हणजे येथील खारी. त्यांना शेकरू म्हणतात. येथील शेकरू भीमाशंकर येथे आढळणार्या शेकरूपेक्षा थोडीशी वेगळी आहे व गडद रंगात आहे. पक्ष्यांमध्ये येथे नर्तक, धनेश व इतर अनेक प्रकार पहायला मिळतात.
सापांच्या अनेक प्रजातीत नाग, फुरसे घोणस व मण्यार या चारही महत्त्वाच्या विषारी जाती येथे आढळतात. त्याच बरोबर चापडा ज्याला इंग्रजीत बांबू पिट वायपर म्हणतात तोही आढळतो. विनविषारी सापांमध्ये अजगर, धामण इत्यादी आढळतात.
ट्रेकिंग व पर्यटन
अभयारण्यात अनेक ऐतिहासिक किल्ले असून जंगलाचा अनुभव घ्यायला तसेच ट्रेकिंग करायला अनेक हौशी ट्रेकर्स या अभयारण्याला भेट देत असतात. काही ट्रेकर्स नुसतेच अभयारण्यातील जलाशयाच्या कडेकडेने वन्यजीवांच्या शोधात वाटा शोधत ट्रेकिंग करत असतात. अभयारण्यातील ट्रेकिंग करण्याजोगे किल्ले :
• वासोटा
• जंगली जयगड
• मधुमकरंदगड
पुनर्वसन
१९५९ साली सातारा जिल्ह्यातील ८२ गावे कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे बाधित झाली होती. सरकारने त्यांचे पुनर्वसन रायगड, ठाणे, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांत केले. यावेळी मूळ प्रकल्पग्रस्तांना शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश तत्कालीन सरकारने दिले होते. यामध्ये पर्यायी १६ एकर जमिनीचे वाटप, कुटुंबातील दोन व्यक्तींना सरकारी नोकऱ्या, विविध प्रकारच्या १३ नागरी सुविधा व दुरुस्तीसाठी वर्षाला दोन कोटी रुपयांचा निधी, १00 टक्के मोफत वीज पुरवठा, असे आश्वासन देण्यात आले होते.
रायगड आणि ठाणे जिल्ह्यात पुनर्वसन झालेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित असल्याच्या बातम्या वेळोवेळी वर्तमान पत्रांमधून सातत्याने येत असतात. अखिल भारतीय कोयना पुनर्वसन संघ या नावे पुनर्वसित कुटुंबे "गावठाण मोजून देणे, पुनर्वसित गावांना स्वतंत्र ग्रामपंचायत देणे" या व इतर अनेक प्रलंबित मागण्या समोर ठेवत असतात. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने सन १९५४ -५५ मध्ये कोयना वीज प्रकल्प विकासाचे पहिलेच काम हाती घेऊन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली. त्यावेळी मुख्यमंत्री कै.यशवंतराव चव्हाण व बांधकाममंत्री कै.बाळासाहेब देसाई यांनी संपूर्ण कोयना खोर्यातील शेतकर्यांना दिलासा देताना सांगितले होते की, "कोयना वीजनिर्मितीसाठी वडिलोपर्जित जन्मभूमीला सोडून तुम्हाला अन्यत्र स्थलांतरित व्हावे लागणार आहे. तुमच्या त्यागातून संपूर्ण महाराष्ट्र विजेपासून समृद्ध होईल. तेव्हा, तुम्ही स्थलांतरास घाबरून न जाता महाराष्ट्रात जेथे बोट दाखवले जाईल, तेथे तुमच्या नागरी सुविधासहित पुनर्वसन करण्यास शासन कटिबद्ध राहील." या पार्श्वभूमीवर कोयना खोर्यातील गावांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारचा विरोध अथवा आंदोलने न करता ठाणे, रायगड , सांगली, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यात स्थलांतर केलेले आहे. त्यापैकी काही गावांचे पुनर्वसन झाले आहे तर काही जण अद्यापही भूमिहीन आहेत. शासनाने प्रकल्पग्रस्तांना धरणाच्या पाण्याखाली गेलेल्या जमिनीचा, झाडांचा, घरांचा मोबदला देखील काही प्रमाणात दिला आहे. तथापि, शिल्लक राहिलेल्या डोंगराळ जमिनीचा अद्याप मोबदला न देता त्या जमिनी वन विभागाला देऊन तेथे अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प जाहीर केला आहे . तसेच ठाणे जिल्ह्यातील बहुतांश गावांचे कोयना धरण पूर्ण होऊन देखील अद्यापही पुनर्वसन केलेले नाही. प्रकल्पग्रस्त भूमिहीन असून सरकारी जागेत वस्ती करून राहत आहेत. त्यांना त्यांच्या घराचा 7/12 देखील आजही मिळाला नाही. तसेच शेतजमीन नसल्यामुळे अनेक जण खडतर जीवन जगत आहेत. तसेच अनेक कोयना पुनर्वसन खातेदारांनी शासनाची मदत मिळेल त्याची वाट पाहत जगाचा निरोप देखील घेतला आहे. प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनी पुनर्वसन खात्याकडून वाटप केल्या जात आहे.
सोबतच कोयना अभयारण्यातील सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पासाठी जावळी तालुक्यातील मौजे रवंदी, आडोशी, कुसापूर, व खिरखिंडी या पाच गावांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला आहे. सुमारे २४३ हेक्टर जमिनीवर हे पुनर्वसन भिवंडी येथील सागाव आणि एकसाल या गावांच्या वनक्षेत्रात करण्यात येत आहे. या पुनर्वसन प्रक्रियेची सुरुवात झाली असून आत्तापर्यंत ४९ कुटुंबांनी स्थलांतर केले आहे अशी माहिती वर्तमानपत्रांच्या बातम्यांतून वाचायला मिळाली. महाराष्ट्राला वीज व पाण्याची सोय करून देणाऱ्या कोयना प्रकल्पावरील पुनर्वसनाचा प्रश्नही या प्रकल्पाच्या भव्यतेसारखाच असल्याचे वर्तमानपत्रांच्या या माहितीतून लक्षात येते.
बारा मोटेची विहीर
कोयना प्रकल्पाला जाताना सातारा रस्त्यावर डावीकडे "लिंब" नावाचे एक गाव आहे. या गावात शिवकालीन 'बारा मोटेची विहीर' आहे. त्या काळात महाराष्ट्रातील बांधकामांनी वेगळी उंची गाठली होती त्याचीच प्रचिती या विहिरीतून मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे नव्याने किल्ले बांधले तसेच, अनेक किल्ल्यांची डागडुजीही केली.
त्यावेळच्या बांधकामांचा दर्जा आणि त्यातील कलात्मकता केवळ किल्ल्यांतूनच दिसते असे नाही तर अशा अन्य प्रकारच्या दर्जेदार कामांतूनही दिसते. त्यातीलच एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे लिंब (जि. सातारा) येथील बारा मोटेची विहीर.
इतिहास
संभाजीराजे यांचे पुत्र शाहु महाराज (पहिले शाहु महाराज) यांच्या काळात या विहिरीचे बांधकाम शके १६४१ ते १६४६ या दरम्यान विरुबाई यांनी केले. या विहिरीची खोली ११० फूट असून व्यास साधारण ५० फूट आहे. लिंब गाव परिसरात सुमारे 300 झाडाच्या 'अमराई' च्या पाणी व्यवस्थेसाठी ही विहीर बांधली गेली.
शिवकालीन स्थापत्यशास्त्र : (Architecture)
विहीर पाहताना ही विहीर आहे की भुयारी राजवाडा असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. विहिरीत उतरायला एक आलिशान जिना आणि भव्य कमान आहे, मध्यभागी महाल असून बाजूंनी एक विहिर अणि उपविहिर असं बांधकाम आहे, शिवलिंगाचा आकाराची ही विहीर आहे. उपविहीरीच्या तळापर्यंत जाणाऱ्या पायऱ्या आजही दिसतात. अष्टकोनी आकाराच्या विहिरीच्या आतील बाजूस वर चार वाघांची शिल्पे आहेत. यातील दक्षिणेकडील २ वाघांच्या पायात दोन-दोन असे चार हत्ती आहेत तर उत्तरेकडील २ वाघ आकाशात झेप घेत आहेत. याचा अर्थ असा ही काढला जातो की दक्षिणदिग्विजय झाला आहे, आता उत्तरदिशेकडे झेप घेणार. विहिरीस आलिशान जिना आणि आत उतरण्यास दोन बाजूने वाटा आहेत. या विहिरीवर पंधरा मोटा बसवन्याची सोय असून प्रत्यक्षात बारा मोटा चालत असत असे म्हणतात. नीट लक्ष देवून पाहिल्यास बारा मोटेचे बारा चौथरे नजरेस पडतात.
अष्टकोनी मुख्य विहीर आणि जोडून आयताकृती उप विहीर. या दोन्ही विहिरींना जोडणारी इमारत म्हणजे चक्क एक महाल आहे. आलिशान जिना उतरून आपण खाली महालाच्या तळमजल्यावर जावून पोहोचतो. या महालाला मध्यभागी दोन खांब आहेत, प्रत्येक खांबावर वेगवेगळी शिल्पे कोरलेली आहेत. गणपती, हनुमान यांची शिल्पे त्याखाली गजारूढ राजांचे शिल्पचित्र. खांबाच्या दुसऱ्या बाजूस अश्वारूढ राजांचे शिल्प कोरलेले आहे, त्यावरील बाजूस नक्षीदार फुले आहेत. महालात लाकडी दरवाजे, पदडे लावण्यासाठी लोखंडी रिंगा आजही अस्तित्वात आहेत. विहिरीवर १५ मोटांची जागा असली तरी प्रत्यक्षात १२ मोटांतूनच पाणी उपसा होत असे. इतर ३ मोटा दुरुस्ती काळात पर्यायी मोटा म्हणून वापरत. विहिरीसाठी दगड आणावे लागले होते. हे दगड आणण्यासाठी जो गाडा वापरला होता त्याचे चाक आजही येथे पाहायला मिळते. या विहीरीच्या समोर मोडी लिपितील शिलालेखही आहे. या महालातून मुख्य दरवाजाकडे पाहिल्यास दरवाजावरील कमानिशेजारी दोन शरभ शिल्पे कोरलेली दिसतात.
एवढे सगळे अवशेष पाहून महालाच्या छतावर आलो की सिंहासनाची जागा आणि समोर सभेसाठी बैठक व्यवस्था केलेली आहे. स्वत: थोरले शाहू महाराज तिथे बसायचे अशी माहिती सांगण्यात येत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा