०८ फेब्रुवारी २०१७

पत्रकारितेच्या वास्तविक क्षेत्रातील थेट पत्रकार



वृत्तपत्र विद्या पदविकेच्या प्रथम सत्रानंतर पत्रकारितेच्या वास्तविक क्षेत्रातील थेट पत्रकार म्हणून काम करण्याची मोठी संधी म्हणजे अंतर्वासिता होय. यासाठी पुरेशी तयारी आणि गृहपाठ अभ्यासक्रमादरम्यान तज्ञ शिक्षकांकडून करून घेतला होता. तरीही प्रत्यक्ष वर्तमान पत्राच्या रचनेत कामाचा अनुभव नसल्याने अंतर्वासिता सुरु होऊन काम करणे हे एक उत्कंठावर्धक तसेच जबाबदारीचे काम होते. अंतर्वासिकेसाठी कोणत्या वर्तमान पत्राची आणि कोणत्या भागाची निवड करावी याचा विचार करताना, अभिषेक भोसले, मंदार कुलकर्णी आणि मल्हार अरणकल्ले सरांनी खूप महत्वाचे मार्गदर्शन केले . "जेथे अधिकाधिक कामाची संधी आणि नाविन्यपूर्ण अनुभव येतील अशी निवड करण्याबाबतची"  त्यांची सूचना  अधिक योग्य वाटली . कामासाठी कोणता भाग निवडावा याचा निर्णय मात्र मी व्यक्तिगत पातळीवर घेत , संगमनेर या माझ्या स्वतःच्या तालुक्याचीच निवड केली.

माझे बहुतांशी शिक्षण संगमनेर येथे झाले आणि काही प्रमाणात सामाजिक क्षेत्रातील अनुभवही येथेच घेतला होता. ही निवड करण्यामागे आणखी दुसरे कारण होते ते म्हणजे संगमनेरमध्ये मला विद्यार्थी, नागरिक म्हणून काम करत असताना तेथील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्राची काही प्रमाणात जाण झाली होती. मात्र  पत्रकाराच्या नजरेतून आणि भूमिकेतून हे सर्व समजून घेणे माझ्यासाठी गरजेचे होते . हे समजून घेण्यासाठी निवडणुकांचा काळ जो नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने संगमनेरमध्ये येणार होता तो काळ सर्वाधिक योग्य आणि अनुभव देणारा वाटला . त्याच्यासाठी अंतर्वासिता ही संधी होती आणि म्हणूनच मी लोकमत संगमनेरच्या विभागीय कार्यालयात काम करण्यासाठी अहमदनगर आवृत्तीचे संपादक सुधीर लंके यांच्याशी चर्चा करून काम करण्याची परवानगी घेतली. त्यांनीही तात्काळ यासाठी परवानगी दिली. अंतर्वासितेच्या सर्वच टप्प्यांवर मार्गदर्शन करणाऱ्या या सर्वांसाठी मी मनापासून कृतज्ञ आहे .

लोकमतच्या संगमनेर विभागीय कार्यालयातील अंतर्वासितेचा पहिलाच दिवस नगरपालिकेच्या निवडणुकीच्या विषयाने सुरु झाला. त्यात नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी असलेले एकूण प्रभाग, गट आणि नगरसेवकांची संख्या याची माहिती भेटली. या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे यावेळी नगरपालिका नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्यात येणार असल्याने निवडणुकीची चर्चा अधिक होती. त्यामुळेच सर्वांचे याकडे जास्त लक्ष होते. निवडणूक अर्ज भरायला सुरुवात झाली होती आणि अर्ज मागे घेण्याची तारीख जवळ आली होती त्यामुळे कोण अर्ज मागे घेते, किती अर्ज शिल्लक राहतात, कोणत्या पक्षांच्या युती होतात याविषयी माहिती घेणे गरजेचे असल्याचेही या चर्चेदरम्यान ठरले.

प्रत्येक दिवशी आल्यानंतर सर्व वर्तमान पत्रे स्थानिक बातम्यांचे विषय आणि आकडेवारीसह बघितले. तसे बघण्याचे महत्व कार्यालयातील वितरण विभागाचे वाघ सर यांनी सांगितले. हे बघताना इतर वर्तमान पत्रांशी आपल्या वर्तमानपत्रांची तुलना करत आपल्या कामाच्या विषयांमध्ये आणि वार्तांकनामध्ये सातत्याने सुधारणा करण्याचा धडा मिळाला. याच दिवसापासून निवडणुकीबाबतच्या विविध बातम्यांचे वृत्तांकन तालुका वार्ताहर विलास गुंजाळ यांच्यासोबत करण्यास सुरुवात केली. हा वार्तांकनाचा अनुभव देखील खूप चांगला होता. कारण या वार्तांकनामध्ये निवडणुकीवर परिणाम करणारे घटक असलेल्या जात धर्म आणि आर्थिक हितसंबंधांचा जो परिणाम होणार आहे त्याची माहिती समजली. सोबतच दररोज  विवीध राजकीय प्रसिद्धी कार्यालयांमधून येणाऱ्या प्रसिद्धी पत्रकांची बातमी करताना काय काळजी घ्यायची याचे माहितीसह प्रात्यक्षिक बघायला मिळाले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या मुलाखती घेता येतील का याविषयी चर्चा केली असता तो अधिकार आवृत्ती संपादकांचा असतो हेही तालुका प्रतिनिधी गुंजाळ सर यांच्याकडून कळाले. वृत्तपत्राच्या कामात त्या वृत्तपत्राच्या छपाईच्या अक्षर आकाराच्या प्रकारापासून ते वापरावयाच्या सॉफ्टवेअरचे वेगळेपण काम करत असतानाच लक्षात आले.

याच दरम्यान नोटबंदीच्या निर्णयाने सर्वच ठिकाणी मोठी चर्चा सुरु झाली होती . या निर्णयाचा परिणाम समाजातील सर्वच घटकांवर होणार होता तो समजून घेण्यासाठी मी तेथील सहकारी पतसंस्था, व्यावसायिक, सरकारी कार्यालये येथे गेलो काही नागरिकांशी देखील चर्चा केली. शहरातील बँकांचे निरीक्षण आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. हा अनुभव समाजमन समजून घ्यायला खूप उपयोगी पडला.

या कामा व्यतिरिक्त  तालुकयातील एड्स बाधित मुलांवर काम करणाऱ्या संस्थेच्या प्रमुखांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. त्यांची मुलाखत घेताना या कामात असणारा राजकीय हस्तक्षेप , प्रशासकीय दडपणं आणि समाजाचे विविधांगी दृष्टिकोन नव्याने लक्षात आले. जन्मतः अंधत्व आलेल्या मुलीने तिच्या या कमतरतेवर मात करत राष्ट्रीय पातळीवरील बँकिंगच्या परीक्षेत यश मिळवले होते त्याचीही बातमी करण्याची संधी मिळाली . ती बातमी करण्यासाठी त्या मुलीच्या घरी म्हणजे ‘कोंची’ या गावाच्या अगदी अंतर्गत भागात जायला मिळाले जेथे जाण्यासाठी अजूनही रस्त्याची पुरेशी सुविधा नव्हती. सामाजिक स्तरावर असलेली जातनिहाय विभागणी आणि त्यानुसार मिळणाऱ्या सुविधांमधील वेगळेपणही पुन्हा अनुभवायला मिळाले. संगमनेरच्या वैचारिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रावर प्रभाव असणाऱ्या "कवी अनंत फंदी प्रतिष्ठान व्याख्यानमालेचे" वृत्तांकन करण्याचे कामही करायला मिळाले. जे माझ्यासाठी ज्ञान आणि अनुभव मिळवण्यासाठी अधिक उपयोगी पडले.

अंतर्वासितेच्या शेवटच्या दिवसांमध्ये निवडणुकीचा प्रचार, जाहिरात तंत्र, निकाल आणि निकालानंतरचे विश्लेषण याचाही जवळून अनुभव घेतला . हा सर्वच अनुभव मला माझ्या पत्रकारितेच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे . या अनुभवाच्या जोरावर भरीव काम करण्याचा आत्मविश्वासही मिळाला या बद्दल मी मनस्वी आनंदी आहे .

एकूणच कामाचा अनुभव खूप काही शिकवणारा होता. अनेक गोष्टी कामाचा उत्साह वाढवणाऱ्या होत्या. पण त्यात अनेक वास्तव दाखवणारे अनुभव आले जे पत्रकारितेच्या ऐकीव प्रतिमेला दुजोरा देणारे होते. तालुक्याच्या ठिकाणी पत्रकारिता करताना तेथील पत्रकारावर असलेला जाहिरात, वितरण आणि राजकीय हितसंबंध सांभाळण्याची कसरत गंभीर होती. यात अनेक पत्रकार संघर्षा ऐवजी परिस्थितीशी जुळवून घेत आपले अस्तित्व टिकवतानाच दिसून येत होते. राजकीय पुढाऱ्यांपासून अनेकांच्या दबावाचा सर्वात जास्त बळी म्हणून तालुक्यावरील पत्रकारच समोर आला. कोणती बातमी घ्यायची , कोणता विषय हाताळायचा हे अनेकदा अपुऱ्या पारदर्शीपणे होते आणि त्यात कामावर मर्यादा येतात असेही वाटले .

पत्रकारितेच्या अभ्यासक्रमामध्ये पत्रकारितेचा इतिहास, तत्वे, मूल्ये, संपादकीय उज्वल परंपरा समोर येते तर वास्तवात असे विरोधाभास अनुभवायला मिळतात त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित राहिले. पण सगळीच परिस्थिती एकसारखी नाही याचेही काही उदाहरणे अनुभवली ज्यात काही पत्रकार अजूनही तत्व, मूल्यांशी आणि पत्रकारितेच्या मूळ गाभ्याशी एकनिष्ठ राहून काम करत आहेत. असे पत्रकारच कामासाठीचा खरा मार्ग असून त्या मार्गावर चालायचे या निर्धारासह मी माझी अंतर्वासिता पूर्ण केली.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था


  "भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था" भेट


           
भांडारकर संस्था हे नाव मला सर्व प्रथम माहिती पडले ते संभाजी ब्रिगेडने केलेल्या हल्ल्याच्या बातमीने. त्यावेळी भांडारकर ही संस्था काय आहे हे मात्र समजले नव्हते, पण हल्ला होण्यासारखे या संस्थेच्या बाबतीत काय घडले हे जाणून घेण्याविषयी मात्र खूपच उत्सुकता वाढली होती. तेव्हापासून या संस्थेला भेट देऊन समजून घेण्याची इच्छा कायम मनात होती. ही इच्छा वृत्तपत्रविद्या व संज्ञापन विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रमाच्या  संस्था भेटीने पूर्ण केली.  भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची ही भेट प्रा. अभिषेक भोसले यांनी २१ जानेवारी २०१७ रोजी सकाळी ८ वाजता आयोजित केली होती. भेटी दरम्यान संस्थेची सूक्ष्म तपशिलासह परिपूर्ण माहिती मिळावी यासाठी प्रा. भोसले यांनी तेथील तज्ज्ञ व्यक्तींशी संपर्क केला होता.

           
मित्रांशी आणि इतर जेष्ठ मान्यवरांशी अनेकदा चर्चा करताना भांडारकर संस्थेच्या संशोधन कार्याचा आणि तेथे संकलित आणि जतन करून ठेवलेल्या ऐतिहासिक ठेव्यांचा उल्लेख हा नेहमी ऐकू येत होता. हा उल्लेख सध्या सुरु असलेल्या इतिहासाच्या वादग्रस्त चर्चा आणि परस्पर विरोधी दाव्यांच्या पार्श्वभूमीवर तर अधिकच वाढला होता. कोणता इतिहास खरा ? कोणता इतिहास खोटा ? संशोधन म्हणजे काय ? संशोधन कसे करावे ? कसे करतात ? इतिहास लेखनात संदर्भांचा कसा उपयोग करतात ? संदर्भांची विश्वासहार्यता कशी ठरते ? यासर्वच प्रश्नांची उत्तरे या भेटीतून मिळवायची होती. ती अपेक्षेप्रमाणे या भेटीतून पूर्ण झाली याबद्दल समाधान आहे. याबाबतच्या सर्वच निरीक्षणांचा आणि अनुभवांचा हा भेट अहवाल ...


भांडारकर संस्थेविषयी

           
भांडारकर ही भारतातील एक अग्रगण्य आणि नामांकित इतिहास संशोधन संस्था आहे. भांडारकर संस्थेची स्थापना अभ्यासक रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या ऐशीव्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि हितचिंतकांनी  ६ जुलै १९१७ रोजी केली. त्यांचे संशोधनात्मक काम पुढेही चालू राहावे म्हणून ही स्थापना करण्यात आली होती. टाटांनी दिलेल्या देणगीतून टाटा हॉल एका मोठ्या माळरानावर उभारण्यात आला होता. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था ही महाराष्ट्रामधील पुणे शहरातील ऐतिहासिक संशोधन संस्था आहे . ही संस्था भारतातील एक प्रमुख प्राच्यविद्या संस्था असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील  महत्त्वाची संशोधन संस्था आहे. प्राकृत डिक्शनरी हा महत्त्वपूर्ण प्रकल्प संस्थेने पूर्णत्वास नेण्याकडे वाटचाल केली आहे. केवळ अभ्यास आणि संशोधन या कार्यालाच वाहून घेतलेल्या अभ्यासकांची पिढी घडविण्याचे कार्य संस्थेने केले आहे.

     
रामकृष्ण गोपाळ भांडारकर

           
रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे संस्कृत पंडित, मराठी शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक व प्रार्थना समाजाचे संस्थापक सदस्य होते. भांडारकरांचा जन्म ६ जुलै १८३७ रोजी महाराष्ट्रात मालवण येथे झाला. त्यांचे शिक्षण मालवण, रत्नागिरी, मुंबई येथे झाले. ते मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी होते, त्यांच्यासोबत महादेव रानडे हेही होते.  काही काळ शाळांमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केल्यानंतर त्यांना मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात आणि नंतर पुण्याला डेक्कन कॉलेजामध्ये संस्कृत भाषेचे प्राध्यापक म्हणून नेमणूक मिळाली. इ.स. १८९२ साली डेक्कन कॉलेजातून ते निवृत्त झाले. पुढे इ.स. १८९३-९५ सालांदरम्यान ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. ज्या काळात पाली, मागधी यांसारख्या प्राकृत भाषांचा अभ्यास करणारे दुर्मीळ होते, त्या काळात डॉ. भांडारकरांनी प्राकृत भाषा, ब्राह्मी, खरोष्टी या लिप्या वगैरेंचे संपूर्ण ज्ञान मिळवून भारताच्या इतिहासाचे संशोधन केले, आणि लुप्तप्राय झालेला इतिहासाची पुनर्मांडणी करून तो प्रकाशात आणला. भारतातील हस्तलिखित ग्रंथांचा शोध घेऊन त्यांना प्रकाशित करण्याचे काम तत्कालीन सरकारने भांडारकरांवर सोपवले. त्यांनी पाच जाडजूड ग्रंथ लिहून हे काम बऱ्याच प्रमाणात साध्य केले. पुरातत्त्वशास्त्राचा इतिहास अभ्यास करणारे संशोधक त्यांचे ग्रंथ आजही प्रमाण मानतात. १८८३ साली व्हिएन्नामध्ये भरलेल्या प्राच्यविद्या विद्वानांच्या परिषदेत हजर राहिलेल्या भांडारकरांच्या अभ्यासाचा आवाका पाहून तेथले सरकार तसेच जागतिक विद्वान अचंबित झाले आणि त्यांनी भांडारकरांना सी.आई.ई. (Companion of the Order of the Indian Empire) ही पदवी देऊन सन्मानित केले. त्या पहिल्या युरोपीय प्राच्यविद्या परिषदेत भांडारकरांनी नाशिकजवळील लेण्यांमधल्या शिलालेखांचा अर्थ विशद करून सांगितला. या घटनेमुळे युरोपात प्राच्यविद्या विशारद म्हणून त्यांच्या कार्याची महती पसरली आणि त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्ससह अनेक मानद सन्मान मिळाले. भांडारकरांनी प्राच्यविद्याविषयक विपुल ग्रंथरचना केली.

    
भांडारकरांनी लिहिलेले ग्रंथ-

  •        भारताचा पुरातत्त्व इतिहास- पाच खंड

  •        मुंबई निर्देशिकेसाठी (Bombay Gazetteers) लिहिलेला "दक्षिण भारताचा इतिहास"

  •        वायुपुराण या ग्रंथाचा इग्रजी अनुवाद (अपूर्ण)

  •        भवभूतीच्या "मालती माधव" वर टीका

  •        फक्त इंग्रजी जाणणार्यांतसाठी संस्कृत व्याकरण भाग १ आणि २, वगैरे.

  •       महाभारताची चिकित्सक आवृत्ती

           
जगभरात या संस्थेची ओळख महाभारतावरील संशोधनात्मक कामासाठी आहे. महाभारत हे रामायणापेक्षाही तुलनेने कितीतरी मोठे आहे. तो येथील प्राचीन साहित्याचा महत्वाचा ठेवा म्हणून ओळखला जातो. म्हणूनच तो निर्दोष  बनवण्यासाठी चिकित्सक अभ्यासाचे मोठे काम येथे झाले. थोडक्यात मूळ महाभारत काय असू शकेल याचा शोध पोथ्यांच्या साहाय्याने केला गेला. हे काम जवळ जवळ १२०० पोथ्या गोळा केल्या. त्यातील ७७४ पोथ्यांचा वापर करून १९ खंडांची आवृत्ती तयार करण्यात आली. ती विक्रीसाठी उपलब्ध आहे.

           
एक पोथी आधाराला घेऊन त्यातील प्रत्येक श्लोकांची व अक्षरांची इतर पोथ्यांतील श्लोकाशी व अक्षरांशी तुलना करून अभ्यास केला गेला. महाभारतामध्ये एक लाखापेक्षा जास्त श्लोक आहेत. अशा ७७४ पोथ्यांतील प्रत्येक अक्षराचा अभ्यास केला गेला आहे. महाभारताच्या या चिकित्सक आवृत्तीत पानाच्या एक चतुर्थांश भागात ४ ते ५ श्लोक दिसतील, बाकीच्या उरलेल्या तीन चतुर्थांश भागात प्रक्षिप्त व इतर भागांच्या नोंदींचा तपशील आहे. ज्यावेळी कॉम्पुटर नव्हते अशा काळात भांडारकर संस्थेची २५ ते ३० तज्ञ असलेली टीम सातत्याने काम करत होती. जवळ जवळ ४८ वर्षे हे काम सुरु होते. १९१८ मध्ये सुरु होऊन १९६६ मध्ये ते पूर्ण झाले. आवृत्तीचे प्रकाशन  तेंव्हाचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. हे काम पाश्चात्य देशात हातात घेऊन बंद करण्यात आले होते. ते त्यांना शक्य झाले नाही. ते काम या संस्थेने करून दाखवले. संस्थेने १९१९ मध्ये महाभारताची चिकित्सक आवृत्ती प्रकाशित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. विष्णू सीताराम सुखठणकर यांची महाभारत प्रकल्पाच्या संपादकपदी नियुक्ती करण्यात आली. या प्रकल्पाला ब्रिटिश अकॅडेमीने अर्थसाह्य केले होते. सुखटणकर यांच्या निधनानंतर श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांच्याकडे संपादकपदाची धुरा सोपविण्यात आली. १९४३ मध्ये संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षांच्या कार्यक्रमास स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रपती झालेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन उपस्थित होते. तर, १९६८ मध्ये झालेल्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमास राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन उपस्थित होते.

     
प्राच्य विद्या परिषद


अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद (ऑल इंडिया ओरिएन्टल कॉन्फरन्स) ही भांडारकर संस्थेने दिलेली देणगी आहे. संस्कृत आणि प्राच्यविद्या क्षेत्रातील अभ्यासक आणि संशोधकांचे संमेलन असे या परिषदेचे स्वरूप असून आतापर्यंत देशभरात विविध ठिकाणी ४७ परिषदा झाल्या आहेत.

     
ग्रंथभांडार

           
ह्या संस्थेत अंदाजे १,२५,००० प्राचीन दुर्मिळ ग्रंथ तसेच २९,५१० हस्तलिखिते जतन करून ठेवण्यात आली आहेत. प्राच्यविद्या संशोधक डॉ. रा.ना. दांडेकर यांनी ५४ वर्षे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या मानद सचिवपदाची धुरा सांभाळली होती. त्यांच्या कामाची दाखल घेत भांडारकर संस्थेतील ग्रंथालयाला "डॉ. रा.ना. दांडेकर ग्रंथालया" नाव देण्यात आले आहे. या ग्रंथालयात भारतीय आणि युरोपियन भाषेतील सव्वा लाख पुस्तकांचा समावेश असून त्यापैकी २० हजार पुस्तके दुर्मिळ आहेत.

         

  
हस्तलिखित ग्रंथ विभाग

           
पूर्वी डेक्कन कॉलेजमधील हस्थलिखितांचा मोठा संग्रह भांडारकर संस्थेत आणला गेला आहे. ब्रिटिश शासनाच्या हे लक्षात आले होते की भारतातील प्राचीन साहित्य हे पोथ्यांमध्ये आहे. जर ते शोधून काढायचे असेल तर पोथ्या गोळा केल्या पाहिजे. त्या उद्देशाने देशभरातून पोथ्या गोळा करण्याचा प्रकल्प सुरु केला गेला. त्यात बॉम्बे प्रेसिडेंसि आणि भारताचा पश्चिम भाग येथून पोथ्या गोळा करण्याचे काम बॉम्बे प्रेसिडेन्सी मधील जाणकारांकडे सोपवण्यात आले. त्याच्यामध्ये भांडारकर हे ही होते. उत्तर कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान अशा विविध भागातून या पोथ्या आणल्या गेल्या. हे काम १८६६ ला सुरु झाले होते. सुरुवातीस या पोथ्या गोळा करून मुंबईच्या एंफिल्स्टन कॉलेजमध्ये ठेवण्यात आल्या, पण मुंबईची दमट हवा पोथ्यांच्या जतनासाठी योग्य नाही असे लक्षात आले, म्हणून तो संग्रह डेक्कन कॉलेज मध्ये पुण्यात आणला गेला.

           
पुढे  १९१७ नंतर भांडारकर संस्थेच्या संस्थापकांनी, "संस्थेची स्थापनाच मुळी प्राच्यविद्येच्या संशोधनासाठी झाली आहे, या सर्व साहित्याचा आम्ही वापर करू तरी हा संग्रह आमच्याकडे द्यावा" अशी विनंती केली. त्याप्रमाणे १९२२ मध्ये हा संग्रह भांडारकर संस्थेकडे देण्यात आला. त्यात १८००० पोथ्या होत्या. तो संग्रह डेक्कन कॉलेज मधून भांडारकर संस्थेत आणण्यात आला. त्या संग्रहात येथील कर्मचाऱ्यांनी भर घातली. आज या संस्थेत २८००० दुर्मिळ पोथ्या आहे. यात विविध भाषांचा समावेश आहे. त्यात विविध भारतीय प्रादेशिक भाषा 'बंगाली, तेलगू, कन्नड, उडिया' अशा भाषांच्या ग्रंथांचा समावेश आहे. तसेच पर्शिअन भाषेतील व  इतर सचित्र ग्रंथही येथे पाहायला मिळतात. कागद, ताडपत्र, भुजपात्र यावर लिहिलेल्या पोथ्या हे यातील वैशिट्ये. काश्मीरहून आलेल्या पोथ्या ज्या आज काश्मीरमध्येही उपलब्ध नाही, त्यात राजतरंगिणी हा संस्कृत ग्रंथ आहे. त्यात काश्मीरचा  इतिहास भुजपत्रावरील पोथ्यांमध्ये आहे. त्यावेळी तेथे 'शरद' लिपी प्रचलीत होती, त्यातीलही काही पोथ्या यात आहे. या संस्थेत पर्शिअन पोथ्यांचा स्वतंत्र विभाग आहे. त्यात 'अवेस्ता' या पर्शिअन ग्रंथाचा समावेश आहे.

 
प्रकाशन विभाग

           
भांडारकर संस्थेचा स्वतःचा असा स्वतंत्र प्रकाशन विभाग आहे. या प्रकाशन अंतर्गत अनेक मौल्यवान ग्रंथ प्रकाशित झाले आहे. संस्थेत या प्रकाशित पुस्तकांचे स्वतंत्र दालन आहे. ते सर्व ग्रंथ विक्रीस उपलब्ध करून दिले जातात.


 संशोधन विभाग व प्रशिक्षण कार्यक्रम

           
भांडारकर संस्थेच्या वतीने ऐतिहासिक संशोधनासाठी महत्वाच्या पद्धतींचे प्रशिक्षण वर्ग देखील घेतले जातात. २०१५ मध्ये येथे 'अवेस्ता' भाषेची १५ दिवसीय कार्यशाली झाली होती. त्याला देशभरातून ७०-८० लोक सहभागी झाले होते. येथे हस्थलिखितांचे जतन कसे करायचे याविषयीच्या देखील कार्यशाळा घेतल्या जातात. सर्वांना या पोथ्या व ग्रंथ बघता येतात आणि कॉपी घेता येतात. संस्थेकडून नवोदित अभ्यासकांना पोथ्या वाचण्यात मदत केली जाते. प्राकृत भाषेतील सर्वात पहिली शब्दावली (डिक्शनरी) तयार करण्याचे काम सुरु असून १५०० प्राकृत ग्रंथांचा यासाठी आधार घेण्यात येतो. प्राकृत ही भाषा नसून अनेक भाषांचा समूह आहे. या शब्दावलीत फक्त शब्दार्थाच नसून संदर्भ देखील दिलेले आहेत. हे गेली २० वर्षे काम सुरु आहे, त्यामध्ये आत्तापर्यंत ५ खंड प्रकाशित झाले आहे. यात फक्त स्वर पूर्ण झाले आहे . व्यंजनांचे काम सुरु झाले आहे. सध्या ६व्या खंडाचे काम सुरु आहे.

महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीच्या मदतीने प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी "सांस्कृतिक सूची" तयार करण्यात येत आहे. महाभारतात अनेक प्रदेश, राजे, शस्त्रास्त्र इत्यादी गोष्टींची विषयवार सूची यात बनवण्यात येत आहे. त्याचेही आत्तापर्यंत दोन खंड प्रकाशित झाले आहे. अजूनही हे काम सुरु आहे.

         

     
संदर्भ -

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था

http://www.bori.ac.in/

https://mr.wikipedia.org/wiki

शंभरी.. भांडारकर प्राच्यविद्या संस्थेची
http://www.loksatta.com/lekha-news/the-bhandarkar-oriental-research-institute-centenary-year-start-1268278/

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर

https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand12/index.php/component/content/article?id=9971

भांडारकर संस्था: सांस्कृतिक संचित

http://www.lokmat.com/storypage.php?catid=297&newsid=13492606

http://maharashtratimes.indiatimes.com/cold-wave/ravivar-mata/bhandarkar-institute-celebrating-hundrerd-years/articleshow/53134407.cms

http://marathi.eenaduindia.com/State/WesternMaharashtra/Pune/PuneCity/2016/07/07105854/cenetary-festival-started-on-wednesday.vpf

सर्व प्राणी समान आहेत पण काही प्राणी जास्त समान आहेत

 


उदात्त हेतू मनात ठेवून घडवून आणलेल्या क्रांतीतून जन्माला आलेले शासकही लोभी , स्वार्थी ,कपटी , निर्दयी आणि प्रजेला नाडणारे असू  शकतात  याचे विदारक परंतु आपल्या अवती भवती पाहायला अनुभवायला मिळणारे वास्तव  कादंबरी सांगते. या कादंबरीचे वैशिष्ट्ये म्हणजे मानवी स्वभावाच्या सर्व पैलूंचे प्रतिबिंब असणारे प्राणी मानवी पद्धतीनेच संवाद आणि काम करतात. यात प्राण्यांवरील अन्याय आणि अत्याचारासोबतच शोषणाची कहाणी असून त्याला जबाबदार माणूस असल्याचे प्राण्यांचे मत बनते. त्यामुळे मग सुरु झालेला क्रांतीचा बंड कशा पद्धतीने  वेगवेगळे वळणे घेत परत शोषणाचाच भाग बनतो ते चपखलपणे हि कादंबरी दाखवून देते.

उपरोधिक आणि नर्मविनोदी शैलीतील लिखाण या कादंबरीला वाचनीय बनवते. कादंबरी  अनेक ठिकाणी हे प्रकर्षाने जाणवते कि आपण जरी प्राण्यांच्या बाबत वाचत असलो तरी हे आपल्या याबाबतही घडत आहे. अनेकदा सामूहिक हितासाठी नियमावली बनवली जाते आणि ती ते नियम सर्वांना लागू असल्याचे बोलत त्या नियमांना हळूहळू नियम निर्मातेच कसे सोयीने बगल देतात आणि "सर्व प्राणी सामान आहेत " याचे रूपांतर "सर्व प्राणी सामान आहेत पण काही प्राणी जास्त सामान आहेत " असे होते. कादंबरीत हा सोयीस्कर स्वार्थी स्वभाव प्राण्यांच्या बाबत असल्याचे दिसत असले तरी ते प्राणी म्हणजे  आपणच आहोत हे तीव्रतेने जाणवते आणि पुस्तक संपेपर्यंत तर हि कथा माणसाचीच असल्याचे वाचकाला कळून चुकते. नेहमीच स्वतःची चिकित्सा करणे कठीण असते परंतु दुसऱ्याची चिकित्सा सहज होते . म्हणूनच स्वतःचे जगणे इतरांच्या रूपात बघत शेवटी अचानक द्या सर्व दुटप्पीपणाचा साक्षात्कार करण्यात हि कादंबरी यशस्वी होते.

मिश्किल शैलीत लिहिलेल्या या कादंबरीत , बऱ्याचदा 'एखाद्या घटनेचा कर्ता करविता कोण' याचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही , पण वाचकांनी स्वतःच अर्थ लावायचा आहे आणि तर्क करायचा आहे.  त्यामुळे हि कथा आणखीनच रसपूर्ण बनते. शैलीतील नर्मविनोद किती मर्मभेदक होतो याचा परिचय हि कादंबरी करून देते. शत्रूशी लढता लढता शत्रूसारखे बानू नका हा संदेश तर खूप काही सूचित करून जातो. आयुष्यातील सर्व दुःखाचे कारण हुकूमशाहीच्या आहे हे  हुकूमशाहीविरोधी आवाज न करणाऱ्या, भिणाऱ्या आणि  स्वार्थ असणाऱ्या सर्वांनाच त्याचे परिणाम कसे भोगावे लागतात याचेही वर्णन येथे दिसते.

आधुनिकीकरण, यंत्र, श्रम यांचा खेळ आयुष्य संपवण्यात खूप मोठा वाट उचलतो हे प्रखरपणे समोर येते. 'ओल्ड मेजर' या आपल्या पूर्वजांच्या कावतीचेही प्रतीक होते आणि त्या कवटीला सलामी देताना, जिवंतपणी त्या कवटीतून आलेल्या विचारांना मात्र काहीच जागा उरात नाही. सर्व सामान्यपणे फिरणारे नेतृत्व लष्करी थाटात रूढपणे आदेश देत सहभागी पद्धतीचा शेवट होतो. आपल्या मुख्य सोबत्यांच्या "कॉम्रेड (साथी , सोबती) ते नेताजी" असा होणार प्रवास विचारांना अधिक गती देत सत्ता आणि स्वार्थ यांचे अनेक नवे अर्थ सांगतो.

कादंबरीतील प्राणी पात्र आणि त्यातही विशेषतः डुक्कर जे अधिक बुद्धिमान दाखवले आहे ते कादंबरीच्या शेवट पर्यंत माणसाचीच प्रतिकृती होते आणि एका क्रांतिकारी पर्वाचा सामान्य शेवट होतो.


पुस्तक परीक्षण

पुस्तकाचे नाव - अॅनिमल फार्म
लेखक - जॉर्ज ऑरवेल

स्वयंप्रेरित सामाजिक विकास संस्था भेट अहवाल


विकास प्रकल्प भेट अहवाल


स्वयंप्रेरित सामाजिक विकास संस्था संगमनेर , संचालित स्वयंप्रेरित बालाश्रम



स्वयंप्रेरित ही भारतामध्ये एच आय व्ही आणि एड्स पॉझिटिव्ह मुलांसाठी काम करणारी एक संस्था आहे .

३० ऑगस्ट १९९९ रोजी संतोष पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून ही  संस्था सुरु केली . ही संस्था नोंदणीकृत आहे . आत्तापर्यंत एच आय व्ही आणि एड्स पॉझिटिव्ह १८३ लोकांना तसेच ४२ मुलांना या संस्थेने मदत केली आहे . आजच्या स्थितीत संस्थेत रेड लाईट भागातील २२ मुले असून त्यामध्ये १४ मुले आणि ८ मुली आहे . यापैकी ४ मुले आणि २ मुली अशी सहा मुले पॉझिटिव्ह आहेत . आई वडील पॉझिटिव्ह असल्याने त्यांना या आजाराला सामोरे जावे लागले . या सर्वांवरती जवळच असणाऱ्या लोणी ता . राहता , जि  . अहमदनगर  येथील ART सेन्टरला औषधोपचाराची व्यवस्था केलेली आहे . प्रत्येक महिन्याला या मुलांना औषोधोपचार घेण्यासाठी नेले जाते. जिल्यात एकूण १३,५०० पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती स्वतः जिल्हा रुग्णालयानेच दिली आहे . ज्यामध्ये ३,५०० मुले , ८ हजार स्त्रिया आणि बाकी बालके व पुरुष आहेत . यात पुरुषांचे प्रमाण महिलांच्या तुलनेत जास्त आहे .




नवीन शासन निर्णयानुसार मुलांची आणि मुलींची व्यवस्था स्वतंत्र करण्यास सांगितले आहे . यामागे लैंगिक अत्याचाराची वाढती संख्या हे कारण आहे . मुलींच्या राहण्याची व्यवस्था कशी असावी यासंदर्भात स्पष्ट निकष असून ते पूर्ण केले तरच संस्था चालवण्याची परवानगी दिली जाईल असे निर्देश आहेत  . यासाठी संगमनेर पासून जवळ असलेल्या रायतवाडी फाट्याजवळ पुणे नाशिक रोडवर भिक मागणाऱ्या मुली , रेड लाईट एरियातील मुली आणि वंचित स्त्रिया यांच्यासाठी  "सेवासंगम" नावाने नवीन प्रकल्प सुरु करत आहे . ज्यासाठी जमीन खरेदी झाली असून पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे . पुढील कामासाठी देखील समाजातून निधी उभा करण्याचे काम सुरु असून त्यासाठी जमीन खरेदी केली आहे , इमारत बाकी आहे .

भविष्यात गाडगे बाबांच्या संकल्पनेतील सर्वांना खुली असणारी धर्मशाळा सुरु करण्याचा विचार आहे ज्यामुळे अनेकांना त्याचा फायदा घेता येईल . समाजात असे अनेक मुले आहेत ज्यांना अजूनही शिक्षण मिळत नाही . आजही अनेक ठिकाणी बालकामगार काम करतात त्याचे वाईट वाटते . अशा मुलांसाठी  भविष्यात  खूप काम करणार आहे .


संस्थेची उद्दिष्ट्ये -

१. अपंगांना शिक्षण आणि सामाजिक सेवा देण्यासाठी वसतिगृहांची सोया करणे .

२. आदिवासी  भागातील लोकांना सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासासाठी मदत करणे

३. गरजू तरुणांना रोजगार पुरवणे .

४. एच आय व्ही बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी मदत करणे .

५. वंचित मुलांसाठी बाळ संगोपन केंद्र उभारणे .

६. मुलांसाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरु करणे .

७. व्यसनमुक्ती केंद्र .


संस्थेच्या सेवा सुविधा -

१. प्राथमिक आरोग्य केंद्र

२. व्यसनमुक्ती केंद्र

३. तरुणांसाठी समुपदेशन केंद्र

४. चाईल्ड लाइन

५. पथनाट्य केंद्र .



संस्थेमध्ये मुलांना वाचण्यासाठी ग्रंथालयाची सुविधा  उपलब्ध आहे . सोबतच संगणक प्रशिक्षणासाठी संगणक आणि सोबत विजेचा अडथळा येऊ नये यासाठी इन्व्हर्टरची व्यवस्था देखील आहे . पिण्याचे स्वच्छ पाणी , खेळण्यासाठी साहित्य आणि सोबत मैदान यामुळेही मुलांचे दैनंदिन जगणे अधिक मोकळे आणि आनंदी दिसले . स्वतंत्र स्वयंपाक खोली आणि सोबत स्वयंपाकाची पुरेशी भांडी  व्यवस्था परिपूर्ण करतात स्वयंपाक खोलीतील प्रत्येक वस्तू हि समाजातील कोणत्या ना कोणत्या घटकाने दान अथवा मदत स्वरूपात दिलेली होती .




निवासासाठी ,खाट,  गादी आणि इतर कपडे संस्थेत पुरविलेले आहेत . झोपण्यासाठीची खोली मोठी आणि स्वच्छ ठेवण्यात आलेले होते . त्याच हॉलमध्ये एक फळ असून त्याचा वापर मुलांपासून भेटीसाठी येणाऱ्या पाहुण्यांपर्यंत झालेला दिसला . मुलांना वापरण्यासाठी लागणारी सर्व कपडे हे देखील समाजातील मदत आणि दानातूनच पूर्ण केली जाते . त्यात काही नवीन कपडे तर काही जुनी परंतु सुस्थितीतील कपडे होती . या सर्वच साधनांसह हि सर्व मुले आनंदाने दैनंदिन काम करत असतांना बघायला मिळाले .

निवडणुकीच्या काळातील सामाजिक संस्थेच्या एका प्रतिनिधीचा अनुभव

मुलाखत


आजही समाजात नैतिक अनैतिकतेचा बँडबाजा वाजवण्याचे काम सुरु असताना  अनेक पातळ्यांवर खूप मोठे प्रश्न उभे असून या प्रश्नांवर गांभीर्याने काम करणारी माणसे मात्र या गोंधळापलीकडे जाऊन काही मार्ग काढण्याचा प्रयत्न स्वयंप्रेरणेनेच करत आहेत. अशीच स्वयंप्रेरित कामांचे उदाहरण असलेल्या संगमनेर मधील संतोष पवार या माणसाच्या कामाची माहिती देणारी ही मुलाखत ...





 

आजच्या स्थितीत संस्थेत रेड लाईट परिसरातील २२ मुले असून त्यामध्ये १४ मुले आणि ८ मुली आहे . यापैकी ४ मुले आणि २ मुली अशी सहा मुले एच आय व्ही पॉसिटीव्ह आहे. आई वडील पॉसिटीव्ह असल्याने त्यांना या आजाराला सामोरे जावे लागले. या मुलांना समाजातील तिरस्कारालाही सामोरे जावे लागले.

या सर्वांवरती लोणी ता . राहता , जि  . अहमदनगर  येथील ART सेन्टरला औषधोपचाराची व्यवस्था केलेली आहे . सुरुवातीला अशी तीनच ART  केंद्रे संपूर्ण महाराष्ट्रात होती , त्यापैकी एक अहमदनगर येथे होते . त्यावेळी हा सर्व उपचार घेण्यासाठी नगरालाच जावे लागे . हळूहळू अशी केंद्रे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुरु झाली आहेत . प्रत्येक महिन्याला या मुलांना औषोधोपचार घेण्यासाठी नेले जाते . त्यांचे वजन आणि आजाराचे स्वरूप यानुसार हे उपचार होतात . शासनाकडून कोणत्याही स्वरूपाची मदत येत नाही , परंतु सरकार बदलापासून अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासात मात्र मोठा फरक पडला आहे . या अगोदर शासनाचे महिला बालकल्याण खात्याचे अधिकारी येऊन पैसे उकळण्यासाठी अनेक प्रकारे दबाव आणून त्रास द्यायचे . बंद करा तुम्हाला चालवायची परवानगी नाही असे म्हणत अनेक त्रुटी काढत . हा त्रास दर महिना दोन महिन्यातून होत असे . ते जेंव्हा इतर शासन मान्य अनुदानित संस्थांना भेट द्यायला यायचे तेंव्हा हे सर्व घडत असे .

२००७ पासून तीनदा शासन मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवले परंतु प्रस्ताव पेंडिंग ठेवले आहेत . न्यायालयाने महाराष्ट्रातील २५६ बोगस संस्था ज्या नकली लाभार्थी दाखवून अनुदान घेत होत्या त्यांची मान्यता रद्द करण्याचा आदेश दिला आणि जोपर्यंत अशा संस्था बंद होत नाही तोपर्यंत कोणत्याही नवीन संस्थेला परवानगी देऊ नये असे सांगितले . याच कारणास्तव शासनाने नवीन येणारे सर्व प्रस्ताव प्रलंबित ठेवले आहेत . या बोगस संस्थांमधील बहुतांशी संस्था या राजकीय पक्षांशी संबंधित लोकांच्या आहेत . त्यापैकीं ४० ते ५० संस्थांवर कारवाई झाली असून उरलेल्या संस्थांवर कारवाई बाकी आहे .

आपल्या संस्थेचा कायदेशीर पातळीवर प्रस्ताव पाठवलेला असून तो प्रस्ताव ऑनलाईन आहे. संस्थेने त्यांचे काम केले असून  आता फक्त सरकारचे काम बाकी आहे जे लवकर होणे गरजेचे आहे . जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या चाईल्ड वेलफेयर कमिटीने देखील अशा संस्थेची या परिसरात गरज असल्याची माहिती शासनाला दिली आहे . पण तरीही शासन याची नोंद घेत नाही . आता मंत्री बदल झाल्यापासून अधिकाऱ्यांचा त्रास बंद झाला असून . आम्ही महिला बालकल्याण मंत्र्यांनाही भेटलो . त्यांनी प्रस्ताव ऑनलाईन  करण्यास सांगितले . अशा पद्धतीचे एकूण २२ प्रस्ताव प्रलंबित आहेत जे विना अनुदानित तत्वावर परवानगी मागत आहे पण तरीही परवानगी दिली जात नाही . जेव्हा परवानगी दिली जाईल तेव्हा या सर्वच प्रस्तावांचा विचार केला जाईल असेही मंत्र्यांनी सांगितले. जिल्यात एकूण १३,५०० पॉसिटीव्ह रुग्ण असल्याची माहिती स्वतः जिल्हा रुग्णालयानेच दिली आहे . ज्यामध्ये ३,५०० मुले , ८ हजार स्त्रिया आणि बाकी बालके व पुरुष आहेत . यात पुरुषांचे प्रमाण महिलांच्या तुलनेत जास्त आहे .


नवीन शासन निर्णयानुसार मुलांची आणि मुलींची व्यवस्था स्वतंत्र करण्यास सांगितले आहे . यामागे लैंगिक अत्याचाराची वाढती संख्या हे कारण आहे . मुलींच्या राहण्याची व्यवस्था कशी असावी यासंदर्भात स्पष्ट निकष असून ते पूर्ण केले तरच संस्था चालवण्याची परवानगी दिली जाईल असे निर्देश आहेत  . यासाठी संगमनेर पासून जवळ असलेल्या रायतवाडी फाट्याजवळ भिक मागणाऱ्या मुली , रेड लाईट एरियातील मुली आणि वंचित स्त्रिया यांच्यासाठी  "सेवासंगम" नावाने नवीन प्रकल्प सुरु करणार आहे . ज्यासाठी जमीन खरेदी झाली असून पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे .

पुढील कामासाठी देखील समाजातून निधी उभा करण्याचे काम सुरु असून त्यासाठी जमीन खरेदी केली आहे , इमारत बाकी आहे . नोटबंदीच्या निर्णयाने काही ऑफर आल्या होत्या परंतु त्या मी नाकारल्या . जो काही निधी होता तो आज पर्यंतच्या कामात खर्च केला असून यापुढील काम पूर्ण करणे हे आव्हान आहे .

आपल्या संस्थेमध्ये सुरुवातीच्या काळात जी माणसे होती ती आता नाही त्यामुळे काम करणाऱ्या नवीन माणसांचा सहभाग अत्यावश्यक असतो. धर्मादाय आयुक्त कार्यालयाबाबत मात्र मोठी निराशा असून , संस्थेच्या कार्यकारणी बदल करण्यासाठी मोठी अडवणूक होते . त्यात कोणतीही स्पष्टता आणि पारदर्शकता नाही त्यावर काम होणे गरजेचे आहे .

आजही लोकांमध्ये हवी तेवढी जागृती नाही . आजाराबद्दल अनेक गैरसमज आहे त्यामुळे मदत मिळण्यात अडचण येते परंतु परिस्थितीत थोडासा फरक पडला आहे त्यामुळेच हे काम उभे करता आले . लोकांची मदत हि त्यांच्याकडे काय उपलब्ध आहे त्यावर अवलंबून असते . त्यामुळे एकाच प्रकारची मदत होत त्याच त्याच वस्तू जास्त प्रमाणात येतात . त्यामुळे धान्य , कपडे , पाणी टाकी (ज्यावर देणगी देणाऱ्याचे नाव टाकता येईल) अशा वस्तूंची संख्या जास्त होते आणि इतर गरजा अपूर्ण राहतात . पाण्याची टाकी , कपडे यांची गरज तशी मर्यादित असते पण त्याचीही आवक मोठी असते . या दिवाळीला तर प्रत्येक मुलाला ६ ड्रेस आले .आणि एक मुलगा तर काही एवढे कपडे घालत नाही . पण त्याऐवजी आर्थिक मदत आपण स्वीकारत नाही तर थेट जी गरज आहे त्या वस्तू किंवा पदार्थ मदत स्वरूपात स्वीकारतो . कौंढीन्य सर यांनी यासंदर्भात रोख आर्थिक व्यवहारांमध्ये न अडकण्याबाबत सांगितले होते जे मला महत्वाचे वाटले आणि मी त्यानुसार काम केले . आजही सिमेंट , विटा अशा वस्तुंचा आपण स्वीकार करतो . खांडगावमध्ये या मुलांना कोणतीही वेगळी वागणूक मिळत नाही हे आपल्या आजपर्यंतच्या कामाचा परिणाम आहे .

शासनाने या योजनांचा गैरवापर होऊ नये यासाठी हवे तेवढे कडक नियम आणावे परंतु , परवानगी , अनुदान असे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची गरज आहे ज्यामुळे गरजूंना यामुळे वंचित राहावे लागणार नाही . अधिकारी एक तर नियम सांगतच नाही आणि सांगितले तरी अर्धवट सांगतात . त्यामुळे काम करणाऱ्याला खूप त्रास होतो . अनेक शासकीय कार्यालयात फाईल पुढे जाताच नाही . पैसे दिले अथवा मंत्री अथवा लोकप्रतिनिधींचे फोन गेले कि लगेच त्यावर काम होते . समाजात या कामांचे महत्व समजून घेऊन सहकार्य मिळायला हवे असे वाटते . या कामात अनेकदा योग्य कौशल्य असलेला कर्मचारी वर्ग मिळत नाही . कार्यालयात कॉम्प्युटर चालवण्यासाठी व इतर तांत्रिक कामासाठी योग्य माणसे मिळत नाही . पाट्या टाकणाऱ्यांनाही २० हजार पगार लागतो . MSW झालेल्या मुलांचाही या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यावसायिक असतो. त्यामध्ये सातत्य नसते , जिकडे जास्त पैसे मिळतात तिकडे ते पळतात . याला समाजसेवा म्हणायची का ? हाही प्रश्नच आहे . स्थिर राहून काम करण्याची खूप गरज आहे . राजकीय क्षेत्रातूनही अनेक दबाव येतात. आपल्या मर्जीत राहून काम करावे , आपला सल्ला घ्यावा , आपल्यासाठी काम करावे अशा या राजकीय नेत्यांच्या अपेक्षा असतात त्यात सर्वच पक्ष संघटना सारख्याच पद्धतीने वागतात . निवडणूक आल्याने किमान न होणारी कामे तरी होतात जे चांगले आहे .

अनेक राजकीय समर्थक आपले इमान आल्या नेत्यांना दाखवण्यासाठी आपण नेत्यांच्या नावाने येथे त्यांचे वाढदिवस साजरे करतो असे त्यांना सांगा म्हणून मला म्हणतात पण मी ते नाकारतो . विरोधकही आपला वापर करून सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात .

या आधी संस्था परवानगी साठी ४० नियम होते ज्यात अनेक नियम पूर्ण करण्यासाठी राजकीय व्यक्तींच्या शिफारसींसाठी विनवण्या करायला लागायच्या परंतु आत्ता यातील फक्त २२ नियम ठेवले त्यामुळे काम अधिक सोपे झाले .

भविष्यात गाडगे बाबांच्या संकल्पनेतील सर्वांना खुली असणारी धर्मशाळा सुरु करण्याचा विचार आहे ज्यामुळे अनेकांना त्याचा फायदा घेता येईल . समाजात असे अनेक मुले आहेत ज्यांना अजूनही शिक्षण मिळत नाही . आजही अनेक ठिकाणी बालकामगार काम करतात त्याचे वाईट वाटते . अशा मुलांसाठी  भविष्यात  खूप काम करणार आहे .


 मुलाखत - संतोष पवार
(अध्यक्ष - स्वयंप्रेरित सामाजिक विकास संस्था , संगमनेर)

०२ फेब्रुवारी २०१७

कोयना प्रकल्प आणि बारा मोटेची विहीर भेट अहवाल

प्रस्तावना

          
वृत्तपत्रविद्या व संज्ञापन विभाग सावित्रीबाई फुले विद्यापीठच्या वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रमाची  प्रकल्प भेट कृष्णा खोरे विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन अंतर्गत असलेल्या कोयना – सिंचन व जलविद्यूत प्रकल्पाला आयोजित करण्यात आली होती. या भेटीसाठी अनेक दिवस प्रयत्न सुरु होते. पण तो देशपातळीवरील खूप महत्वाचा प्रकल्प असल्याने तेथे भेट देण्यासाठीची परवानगी मिळवणे हे आव्हान होतेच, पण तरीही विभागाच्या व पत्रकार संघाच्या प्रयत्नाने हि भेट निश्चित झाली. प्रत्यक्ष प्रकल्पाच्या ठिकाणावर जाऊनही सरकारी कामातील नेहमीच्या प्रक्रिया आणि अटी  यामुळे शेवट पर्यंत प्रकल्पाला भेट होणार कि नाही याबद्दल अनिश्चितता होती पण त्याही वेळी सोबत आलेल्या शिक्षकांनी प्रयत्न करून ती भेट निश्चित केली.

          
या भेटीत प्रकल्पाची माहिती घेत प्रकल्पाचे एकूण राज्य आणि देशपातळीवरील महत्व तसेच त्या प्रकल्पाचा सर्वांगीण परिणाम अभ्यासता आला. माहिती घेताना अवती भवतीची जैवविविधता, धरणाच्या बांधकामातील तंत्रज्ञान, तेथील स्थानिक रहिवाश्यांच्या सांस्कृतिक व आर्थिक स्थितीचे निरीक्षण, विस्थापितांचा प्रश्न, धरणाचे विकास प्रक्रियेतील महत्व, आपत्कालीन स्थितीत कार्यान्वित होणारी यंत्रणा, सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या योजना या सर्वच गोष्टींचा अभ्यास करणे या अभ्यास भेटीमुळे शक्य झाले. पर्यटकांच्या नजेरेतून न बघता पत्रकारितेचे विद्यार्थी म्हणून या प्रकल्पाकडे बघताना आलेला अनुभव देखील महत्वाचा ठरला. या भेटीदरम्यान सातारा जिल्ह्यात असलेल्या लिंब या गावातील शिवकालीन विहीरही बघायला मिळाली. याबाबतच्या सर्वच निरीक्षणांचा आणि अनुभवांचा हा भेट अहवाल ...

प्रकल्पाविषयी

          
कोयना प्रकल्पाला भेट देताना माहिती मिळवण्यासाठी सुरुवातीपासून वर्गमित्र ओंकार वाबळे याचा तसेच प्रा. संदीप नरडीले, प्रा. अभिषेक भोसले यांचा खूप उपयोग झाला. यासर्वांनीच प्राथमिक स्वरूपातील आवश्यक ती माहिती दिल्याने प्रकल्प अभियंते नितीन राणे यांना प्रश्न विचारण्यास मदत झाली. नितीन राणे यांनी खूपच प्रभावीपणे कोयना प्रकल्पाची इतिहासापासून तर आत्तापर्यंतची वाटचाल सांगितली. त्यांनी सांगितलेल्या माहितीत अधिकतर माहिती ही अभियांत्रिकी स्वरूपातील होती. तरीही त्या माहितीत या प्रकल्पाचे एकूण राष्ट्रीय स्तरावरील महत्व, आजपर्यंत झालेला उपयोग, जागतिक पातळीवरील महत्व, आपत्कालीन परिस्थितीतील अडचणी व त्यावर केलेली मात, तंत्रज्ञानातील सुधारणा व सज्जता या सर्वांचाही समावेश होता. त्यामुळे पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांमध्ये अभियांत्रिकेची पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांनाही चांगली माहिती मिळाली. अभियांत्रिकेच्या स्वरूपातील आकडेवारी आणि तांत्रिक प्रक्रिया मात्र समजल्या नाही अशी प्रामाणिक भावना देखील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. नितीन राणे हे शासकीय कर्मचारी असल्याने त्यांची माहिती ही सरकारची बाजू घेणारी असली तरी त्यांनी व्यक्ती म्हणून तेथील पुनर्वसनाचा प्रश्न संपला नसल्याचे प्रामाणिक मत व्यक्त केले. सोबतच पुनर्वसनासाठी करत असलेल्या प्रयत्नांची व त्यांना आकलन झालेल्या तथ्यांचीही माहिती त्यांनी दिली. आम्हा विद्यार्थ्यांना प्रकल्प बघता यावा यासाठी तेथील कर्मचारी वर्गाने महत्वाच्या भागांची माहिती थेट त्या ठिकाणी नेऊन दिली.

          
या प्रकल्पाची निर्मिती प्रक्रिया स्वातंत्र्यपूर्व काळापासून झाली होती, परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या परिस्थितीत ते काम मागे पडले व नंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंत्रप्रधान पंडित नेहरू यांनी या प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावरील महत्वकांक्षी प्रकल्प बनवले. यानंतरच कोयना प्रकल्प उभारणीला गती मिळाली. या प्रकल्पाच्या पाहणी मध्ये व जागा निवडीमध्ये ब्रिटिश सरकारने वापरलेली दृष्टी ही महत्वाची आहे हेही या माहितीतून समजले. पुढे कोयना भूकंपामध्ये धरणाच्या रचनेला झालेले नुकसान व भविष्यात अशा भूकंपांना तोंड देता यावे म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करत बटरफ्लाय भिंतींचे बांधकाम करण्यात आले होते त्यामुळे धरणाची भूकंप सहन करण्याची क्षमता वाढली. बाष्पीभवनामुळे होणारे पाण्याचे नुकसान टाळण्यासाठी लवकरच धरणातील पाण्यावर सौरऊर्जा संयंत्र बसवण्याचा निर्णय घेण्याचा विचार सुरु असल्याची माहिती या वेळी मिळाली. आपत्कालीन परिस्थितीत जेव्हा बाहेरीलभागाशी संपर्काची यंत्रणाच शिल्लक राहिली नव्हती त्यावेळी मोठी अडचण निर्माण झाली होती. म्हणूनच आत्ता प्रकल्पाच्या ठिकाणीच नवीन संपर्क तयार केली आहे. सोबतच भूकंपाचा पूर्वअंदाज घेण्यासाठी आणि पाण्याची पातळीचा अंदाज घेण्यासाठी विशेष यंत्रणा बसवल्याची माहिती यावेळी मिळाली.


धरणाची माहिती

        
कोयना धरणाचे बांधकाम रबल काँक्रीट प्रकारचे आहे. या बांधकाम प्रकारामुळे धरणाला विशिष्ट प्रकारची लवचिकता अली आहे. भूकंपाच्या स्थितीत हीच लवचिकता धरणाला टिकून राहण्यासाठी नि कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी उपयोगी पडते. पाण्याच्या वेगाचा व दबावाचा सामना करण्यात देखील बांधकामातील ही लवचिकता पूरक ठरते.

          
कोयना धरणाची उंची १०३.०२ मीटर असून ही उंची महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे. तसेच धरणाची लांबी  ८०७.७२ मीटर आहे. धरणाच्या दरवाज्याचा प्रकार S स्वरूपाचा असून त्याचा आकार - लांबी ८८.७१ मीटर आहे. या दरवाज्यांतून होणार सर्वोच्च विसर्ग ५४६५ घनमीटर / सेकंद आहे. अशा दरवाज्याची एकूण संख्या संख्या ६ आहे तर आकार १२.५० X ७.६२ मी एवढा आहे.

पाणीसाठा क्षमता  : २७९७.४ दशलक्ष घनमीटर

वापरण्यायोग्य क्षमता  : २६७७.६ दशलक्ष घनमीटर

ओलिता खालील क्षेत्र  : १२१०० हेक्टर

ओलिता खालील गावांची संख्या  : ९८





वीज उत्पादन

टप्पा १:

जल प्रपाताची उंची : ४७५ मी. , जास्तीत जास्त विसर्ग : १६४ क्यूमेक्स, निर्मिती क्षमता : २६० मेगा वॅट, विद्युत जनित्र : ४ X ६५ मेगा वॅट

टप्पा २:

जल प्रपाताची उंची : ४९० मी., जास्तीत जास्त विसर्ग : १६४ क्यूमेक्स निर्मिती क्षमता : ३०० मेगा वॅट, विद्युत जनित्र : ४ X ७५ मेगा वॅट

टप्पा ४:

जल प्रपाताची उंची : ४९६ मी., जास्तीत जास्त विसर्ग : २६० क्यूमेक्स, निर्मिती क्षमता : १००० मेगा वॅट, विद्युत जनित्र : ४ X २५० मेगा वॅट


शिवसागर जलाशय


पाणीसाठा

क्षमता : २७९७.४ दशलक्ष घनमीटर, वापरण्यायोग्य क्षमता : २६७७.६ दशलक्ष घनमीटर, ओलिताखालील क्षेत्र : १२१०० हेक्टर, ओलिताखालील गावे : ९८


कोयना अभयारण्य


          
कोयना प्रकल्पाचा अभ्यास करताना तेथील नदीभोवती आढळणाऱ्या अभयारण्याचीही दखल घेणे क्रमप्राप्त आहे. कोयना नदीच्या किनाऱ्यावर कोयना अभयारण्य आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक घनदाट जंगलांमध्ये कोयना अभयारण्याचा समावेश होतो. हे अभयारण्य कोयना धरणाच्या भिंतीमागील शिवसागर जलाशयाच्या कडेकडेने पसरलेले आहे. इतिहासात हे जंगल जावळीचे खोरे म्हणून प्रसिद्ध आहे. अभयारण्याचे  एकूण क्षेत्रफळ ४२६ चौ.किमी असून याला १९८५ मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळाला. या अभयारण्याला व्याघ्रप्रकल्पाचा दर्जाही मिळावा म्हणून राज्य सरकारचे प्रयत्न आहे. हे अभयारण्य कोयना जलाशयाच्या कडेकडेने पसरलेले आहे.

          
कोयना नगर ते महाबळेश्वरच्या जवळील तापोळा या ६०-७० किमी अंतरापर्यंत नदीच्या कडेकडेने हे जंगल आहे. ढोबळमानाने अभयारण्याचे तीन मुख्य विभाग पडतात महार खोरे, वासोटा व मेट इंदवली. त्यामध्ये इंदवळी, कुसावळी, सिंधी, बलवण, मोरवी, म्हाळुंग, वाघावळे, कुसापूर, तापोळा, कांदाटकी खोरे अशा गावांच्या वनक्षेत्रांचा समावेश होतो. शिवसागर तलावाची नैसर्गिक तटबंदी या अभयारण्याला लाभली आहे. धरणाच्या जलाशयात मोठ्या प्रमाणावर येथील जंगल पाण्याखाली गेले. जलाशयाच्या पश्चिमेकडील बाजूसच अभयारण्याचा बहुतांशी भाग येतो जो अतिशय घनदाट आहे. अभयारण्याच्या पश्चिमेकडे नदीच्या एका बाजूला सह्याद्रीची मुख्य रांग आहे व दुसऱ्या बाजूस सह्याद्रीची उपरांग आहे. या दोन्ही रागांमधोमध कोयना नदी वाहते. मुख्य रांगेचा उतार नदीच्या बाजूला सौम्य आहे तर पश्चिम बाजूला ९० अंशाचा कडा आहे. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच कडा जो 'बाबू कडा' नावाने ओळखला जातो, तो येथे आहे. अभयारण्यातील सर्वोच्च ठिकाण वासोटा किल्ला आहे. उंची साधारणपणे ११०० मीटर. एकाबाजूला नैसर्गिक कडा व दुसऱ्या बाजूला मानवनिर्मित जलाशय, यामुळे येथील जंगलाला एक प्रकारचे जंगलतोडीपासून अभय मिळाले आहे. कोयनेबरोबरच सोळशी व कांदाटी याही नद्या अभयारण्यात वाहतात. जून ते सप्टेंबर या महिन्यात प्रचंड पाऊस पडतो. एका वर्षाची पावसाची सरासरी अंदाजे ५००० मिमी इतकी आहे.

जंगलाचा प्रकार


          
येथील जंगलाचा समावेश दमट विषववृत्तीय सदाहरित जंगलात होतो. महाराष्ट्रात असे जंगल इतरत्र केवळ महाबळेश्वर येथे आहे. जंगलतोड कमी असल्याने महाराष्ट्रात इतरत्र न आढळणारे वृक्ष कोयना जंगलात दिसून येतात. प्रचंड वृक्ष, त्याखाली मध्यम उंचीच्या वनस्पती (कारवी, वाकटी या सारख्या), त्याखाली नेच्यासारख्या वनस्पती व त्याखाली गवतासारख्या वनस्पती असे एकाच जागी ४ स्तरातील वनस्पतींनी येथील जंगल घनदाट केले आहे. तसेच विविध प्रकारच्या लहान, मोठ्या आणि अजस्र वेलींनी देखील येथील इंच न्‌ इंच व्यापला आहे. अंजनी, जांभूळ, हिरडा, आवळा, ऐन, आंबा, भोमा, काटक, उंबर, जांभा, बिब्बा शिकेकाई, गारंबी, करवंदे, रानमिरी, तोरण, धायटी, कडीलिंब, मुरुडशेंग या येथे आढळणाऱ्या वनस्पती आहेत.

प्राणिजीवन


          
पश्चिम महाराष्ट्रातील वन्यप्राण्यांची सर्वाधिक घनता या अभयारण्यात आहे. जंगल अतिशय घनदाट व दुर्गम असल्याने वन्यप्राण्यांची गणती करणे येथे अवघड आहे. हरिणांमध्ये सांबर, भेकर व पिसोरी आढळतात. इतर प्राण्यांमध्ये माकडे, वानरे,तरस, कोल्हे, खोकड, ऊदमांजरे, साळिंदर तसेच रात्रीच्या वेळात रानससे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात, ट्रेकर्सना येथे नेहमी अस्वल दृष्टीस पडते व आमनासामना होतो. वन्यप्राण्यांच्या भयापोटी पूर्वी बरेचसे ट्रेकर्स फटाके वाजवत फिरत, परंतु आता अभयारण्यात फटाके उडवण्यास बंदी आहे. बिबट्याचेही दर्शन नशीबवंताना होते.

          
ठश्यांवरून व रात्रीच्या डरकाळ्यांच्या आवाजावरून या अभयारण्यात वाघ आहेत हे सिद्ध होते परंतु ते सहसा दिसत नाहीत. अजून येथील खास वैशिट्य म्हणजे येथील खारी. त्यांना शेकरू म्हणतात. येथील शेकरू भीमाशंकर येथे आढळणार्या शेकरूपेक्षा थोडीशी वेगळी आहे व गडद रंगात आहे. पक्ष्यांमध्ये येथे नर्तक, धनेश व इतर अनेक प्रकार पहायला मिळतात.

          
सापांच्या अनेक प्रजातीत नाग, फुरसे घोणस व मण्यार या चारही महत्त्वाच्या विषारी जाती येथे आढळतात. त्याच बरोबर चापडा ज्याला इंग्रजीत बांबू पिट वायपर म्हणतात तोही आढळतो. विनविषारी सापांमध्ये अजगर, धामण इत्यादी आढळतात.

ट्रेकिंग व पर्यटन

          
अभयारण्यात अनेक ऐतिहासिक किल्ले असून जंगलाचा अनुभव घ्यायला तसेच ट्रेकिंग करायला अनेक हौशी ट्रेकर्स या अभयारण्याला भेट देत असतात. काही ट्रेकर्स नुसतेच अभयारण्यातील जलाशयाच्या कडेकडेने वन्यजीवांच्या शोधात वाटा शोधत ट्रेकिंग करत असतात. अभयारण्यातील ट्रेकिंग करण्याजोगे किल्ले :

•           वासोटा

•           जंगली जयगड

•           मधुमकरंदगड

पुनर्वसन

          
१९५९ साली सातारा जिल्ह्यातील ८२ गावे कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे बाधित झाली होती. सरकारने त्यांचे पुनर्वसन रायगड, ठाणे, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांत केले. यावेळी मूळ प्रकल्पग्रस्तांना शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश तत्कालीन सरकारने दिले होते. यामध्ये पर्यायी १६ एकर जमिनीचे वाटप, कुटुंबातील दोन व्यक्तींना सरकारी नोकऱ्या, विविध प्रकारच्या १३ नागरी सुविधा व दुरुस्तीसाठी वर्षाला दोन कोटी रुपयांचा निधी, १00 टक्के मोफत वीज पुरवठा, असे आश्वासन देण्यात आले होते.

          
रायगड आणि ठाणे जिल्ह्यात पुनर्वसन झालेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित असल्याच्या बातम्या वेळोवेळी वर्तमान पत्रांमधून सातत्याने येत असतात. अखिल भारतीय कोयना पुनर्वसन संघ या नावे पुनर्वसित कुटुंबे "गावठाण मोजून देणे, पुनर्वसित गावांना स्वतंत्र ग्रामपंचायत देणे" या व इतर अनेक प्रलंबित मागण्या समोर ठेवत असतात. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने सन १९५४ -५५ मध्ये कोयना वीज प्रकल्प विकासाचे पहिलेच काम हाती घेऊन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली. त्यावेळी मुख्यमंत्री कै.यशवंतराव चव्हाण व बांधकाममंत्री कै.बाळासाहेब देसाई यांनी संपूर्ण कोयना खोर्यातील शेतकर्यांना दिलासा देताना सांगितले होते की, "कोयना वीजनिर्मितीसाठी वडिलोपर्जित जन्मभूमीला सोडून तुम्हाला अन्यत्र स्थलांतरित व्हावे लागणार आहे. तुमच्या त्यागातून संपूर्ण महाराष्ट्र विजेपासून समृद्ध होईल. तेव्हा, तुम्ही स्थलांतरास घाबरून न जाता महाराष्ट्रात जेथे बोट दाखवले जाईल, तेथे तुमच्या नागरी सुविधासहित पुनर्वसन करण्यास शासन कटिबद्ध राहील." या पार्श्वभूमीवर कोयना खोर्यातील गावांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारचा विरोध अथवा आंदोलने न करता ठाणे, रायगड , सांगली, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यात स्थलांतर केलेले आहे. त्यापैकी काही गावांचे पुनर्वसन झाले आहे तर काही जण अद्यापही भूमिहीन आहेत. शासनाने प्रकल्पग्रस्तांना धरणाच्या पाण्याखाली गेलेल्या जमिनीचा, झाडांचा, घरांचा मोबदला देखील काही प्रमाणात दिला आहे. तथापि, शिल्लक राहिलेल्या डोंगराळ जमिनीचा अद्याप मोबदला न देता त्या जमिनी वन विभागाला देऊन तेथे अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प जाहीर केला आहे . तसेच ठाणे जिल्ह्यातील बहुतांश गावांचे कोयना धरण पूर्ण होऊन देखील अद्यापही पुनर्वसन केलेले नाही. प्रकल्पग्रस्त भूमिहीन असून सरकारी जागेत वस्ती करून राहत आहेत. त्यांना त्यांच्या घराचा 7/12 देखील आजही मिळाला नाही. तसेच शेतजमीन नसल्यामुळे अनेक जण खडतर जीवन जगत आहेत. तसेच अनेक कोयना पुनर्वसन खातेदारांनी शासनाची मदत मिळेल त्याची वाट पाहत जगाचा निरोप देखील घेतला आहे. प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनी पुनर्वसन खात्याकडून वाटप केल्या जात आहे.

          
सोबतच कोयना अभयारण्यातील सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पासाठी जावळी तालुक्यातील मौजे रवंदी, आडोशी, कुसापूर, व खिरखिंडी या पाच गावांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला आहे. सुमारे २४३ हेक्टर जमिनीवर हे पुनर्वसन भिवंडी येथील सागाव आणि एकसाल या गावांच्या वनक्षेत्रात करण्यात येत आहे. या पुनर्वसन प्रक्रियेची सुरुवात झाली असून आत्तापर्यंत ४९ कुटुंबांनी स्थलांतर केले आहे अशी माहिती वर्तमानपत्रांच्या बातम्यांतून वाचायला मिळाली. महाराष्ट्राला वीज व पाण्याची सोय करून देणाऱ्या कोयना प्रकल्पावरील पुनर्वसनाचा प्रश्नही या प्रकल्पाच्या भव्यतेसारखाच असल्याचे वर्तमानपत्रांच्या या माहितीतून लक्षात येते.

बारा मोटेची विहीर

          
कोयना प्रकल्पाला जाताना सातारा रस्त्यावर डावीकडे "लिंब" नावाचे एक गाव आहे. या गावात शिवकालीन 'बारा मोटेची विहीर' आहे. त्या काळात महाराष्ट्रातील बांधकामांनी वेगळी उंची गाठली होती त्याचीच प्रचिती या विहिरीतून मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे नव्याने किल्ले बांधले तसेच, अनेक किल्ल्यांची डागडुजीही केली.

त्यावेळच्या बांधकामांचा दर्जा आणि त्यातील कलात्मकता केवळ किल्ल्यांतूनच दिसते असे नाही तर अशा  अन्य प्रकारच्या दर्जेदार कामांतूनही दिसते. त्यातीलच एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे लिंब (जि. सातारा) येथील बारा मोटेची विहीर.

इतिहास

          
संभाजीराजे यांचे पुत्र शाहु महाराज (पहिले शाहु महाराज) यांच्या  काळात या विहिरीचे बांधकाम शके १६४१ ते १६४६ या दरम्यान  विरुबाई  यांनी केले. या विहिरीची खोली ११० फूट असून व्यास साधारण ५० फूट आहे. लिंब गाव परिसरात सुमारे 300 झाडाच्या 'अमराई' च्या पाणी व्यवस्थेसाठी ही विहीर बांधली गेली.


शिवकालीन स्थापत्यशास्त्र : (Architecture)

          
विहीर पाहताना ही विहीर आहे की भुयारी राजवाडा असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. विहिरीत उतरायला एक आलिशान जिना आणि भव्य कमान आहे, मध्यभागी महाल असून बाजूंनी एक विहिर अणि उपविहिर असं बांधकाम आहे, शिवलिंगाचा आकाराची ही विहीर आहे. उपविहीरीच्या तळापर्यंत जाणाऱ्या पायऱ्या आजही दिसतात. अष्टकोनी आकाराच्या विहिरीच्या आतील बाजूस वर चार वाघांची शिल्पे आहेत. यातील दक्षिणेकडील २ वाघांच्या पायात दोन-दोन असे चार हत्ती आहेत तर उत्तरेकडील २ वाघ आकाशात झेप घेत आहेत. याचा  अर्थ असा ही काढला जातो की दक्षिणदिग्विजय झाला आहे, आता उत्तरदिशेकडे झेप घेणार. विहिरीस आलिशान जिना आणि आत उतरण्यास दोन बाजूने वाटा आहेत. या विहिरीवर पंधरा मोटा बसवन्याची सोय असून प्रत्यक्षात बारा मोटा चालत असत असे म्हणतात. नीट लक्ष देवून पाहिल्यास बारा मोटेचे बारा चौथरे नजरेस पडतात.

          
अष्टकोनी मुख्य विहीर आणि जोडून आयताकृती उप विहीर. या दोन्ही विहिरींना जोडणारी  इमारत म्हणजे चक्क एक महाल आहे. आलिशान जिना उतरून आपण खाली महालाच्या तळमजल्यावर जावून पोहोचतो. या महालाला मध्यभागी दोन खांब आहेत, प्रत्येक खांबावर वेगवेगळी शिल्पे कोरलेली आहेत. गणपती, हनुमान यांची शिल्पे त्याखाली गजारूढ राजांचे शिल्पचित्र. खांबाच्या दुसऱ्या बाजूस अश्वारूढ राजांचे शिल्प कोरलेले आहे, त्यावरील बाजूस नक्षीदार फुले आहेत. महालात लाकडी दरवाजे, पदडे लावण्यासाठी लोखंडी रिंगा आजही अस्तित्वात आहेत. विहिरीवर १५ मोटांची जागा असली तरी प्रत्यक्षात १२ मोटांतूनच पाणी उपसा होत असे. इतर ३ मोटा दुरुस्ती काळात पर्यायी मोटा म्हणून वापरत. विहिरीसाठी दगड आणावे लागले होते. हे दगड आणण्यासाठी जो गाडा वापरला होता त्याचे चाक आजही येथे पाहायला मिळते. या विहीरीच्या समोर मोडी लिपितील शिलालेखही आहे. या महालातून मुख्य दरवाजाकडे पाहिल्यास दरवाजावरील कमानिशेजारी दोन शरभ शिल्पे कोरलेली दिसतात.

एवढे सगळे अवशेष पाहून महालाच्या छतावर आलो की सिंहासनाची जागा आणि समोर सभेसाठी बैठक व्यवस्था केलेली आहे. स्वत: थोरले शाहू महाराज तिथे बसायचे अशी माहिती सांगण्यात येत.