०८ ऑगस्ट २०१८

माझे "निर्माण"मधील अनुभव ...

"शोधग्राम" म्हणजे सामाजिक क्षेत्रातील एक खुली प्रयोगशाळा आहे, जेथे समाजातील विविध प्रश्नांची उकल करण्यासाठी सामुहिक पातळीवर विविध प्रयोग केले जातात. या प्रयोगांना जशी संशोधणात्मक कामाच्या पद्धतीची जोड आहे, तशीच सर्वसमावेशकतेची दृष्टीही आहे. मला वाटतं "निर्माण" हा शोधग्रामच्या सर्वात यशस्वी प्रयोगांमधील एक मैलाचा दगड आहे.

निर्माण तरुणाईला आश्वासक दिशा देत सामाजिक बदलाच्या व तेवढ्याच स्वतःलाही उन्नत करणाऱ्या प्रक्रियेत जबाबदारीने सहभागी करून घेते. हा सहभाग ‘स्व ते समाज” असा आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्याला यातून स्वतःला तर समजून घेता येतेच, सोबत आपल्या अवतीभवती असणाऱ्या समाजालाही  समजून घेता येते. हे समजून घेणं समोर असणाऱ्या भीषण परिस्थितीवर दया भावना, सहानुभूती अथवा कीव करण्यापर्यंत सीमित राहत नाही, तर त्या प्रश्नांच्या सोडवणुकीत मी काय भूमिका करू शकतो याची स्पष्टता देण्यापर्यंत असते.

माझा निर्माणमध्ये सहभागी होण्यापर्यंतचा प्रवास हा काहीसा बाळबोध सामाजिक काम ते परिणामकारक सामाजिक बदलाच्या प्रक्रियेतील सहभाग असा झाला. याची सुरुवात माझ्या गावात युवकांना घेऊन काम करण्यापासून झाली. पुढे मग विद्यार्थी दशेत विद्यार्थी संघटना आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये काम करत एका टप्प्यावर आता पुढे काय? या प्रश्नासह झाला. या टप्प्यावर माझ्यासमोर जसा कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा प्रश्न होता, तसाच पुढील कामाची निश्चित दिशा ठरवण्याचा आणि त्यातून उपजीविका व सामाजिक बदलाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याची ओढाताण कमी करण्याचाही होता. याच काळात भावनिक पातळीवर काहीसा एकटेपणाही जाणवत होता. यामागे प्रवाहापेक्षा वेगळा मार्ग निवडण्याची धडपड आणि त्यातून येणारी असुरक्षितता अशी कारणे होती. आजूबाजूला असणाऱ्या नातेवाईक, मित्र या वर्तुळात आपल्या सामाजिक विचारांना समजून घेऊ शकतील अशी खूप मोजकी माणसं होती. याच काळात मला निर्माणच्या सामाजिक बदलांच्या विचारांनी झपाटलेल्या समविचारी कुटुंबाचा भाग होण्याची संधी मिळाली.

निर्माणच्या वर्षभरातील एकूण ३ शिबिरांमध्ये मी स्वतःला अनेक पातळ्यांवर तपासू शकलो. अनेक ठिकाणी स्व चिकित्सा करण्याच्या मर्यादाही आल्या, तेथे निर्माणचे मित्र मदत करत गेले. ही मदत दोन स्वरूपाची होती. एक म्हणजे त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून काही insights (दृष्टिकोन) मिळत गेले आणि दुसरे माझ्या कृतींचे त्यांच्याकडून मूल्यमापनही झाले. या प्रक्रियेने मूल्यावर ठाम राहून, आदर्श समोर ठेवून देखील वास्तववादी जगता येते आणि नुसते जगता येत नाही तर सामाजिक बदलाच्या प्रक्रियेवर सकारात्मक परिणाम करू शकू एवढ्या प्रभावीपणे जगता येते हे शिकवले.

निर्माणच्या १ वर्षातील सहभाग हा साधारणपणे ३ टप्प्यांमध्ये  (Camp) झाला. यामध्ये स्वतःची वर्तमान स्थिती अचूकपणे समजून घेत जगण्याच्या संकल्पनांमध्ये स्पष्टता आणता आली. तसेच मला माझ्यासमोरील नेमके प्रश्न काय आहेत यावर सखोल विचार करता आला. त्यामुळे सर्वप्रथम नेमके स्वतःवर कोठे कोठे काम करण्याची गरज आहे हे स्पष्ट झाले. आर्थिक परिस्थिती सुरुवातीपासून हालाखीची होती, त्यामुळे भविष्यात काम करत असताना आर्थिक बाजू सांभाळून हवे ते काम कसे करणार हा मोठा प्रश्न होता. कामाची निवड, मूल्ये, आर्थिक गरजा, जबाबदाऱ्या अशा संभ्रमात निर्माणच्या “माझी पैशांची गरज” या exercise ने खूप स्पष्टता दिली. आधी माझी नेमकी आर्थिक गरज किती आहे हे तेवढं स्पष्ट नव्हतं. निर्माणच्या या पहिल्या टप्प्यात हा प्रश्न निकाली निघाला. ही आर्थिक गरज ठरवताना त्यात Need आणि Greed हा फरकही करता आला. त्यामुळे अधांतरीची असुरक्षितता व अस्वस्थता कमी झाली आणि यापुढे प्रश्नांचा कशा सूक्ष्मपद्धतीने विचार करायचा याचेही प्रशिक्षण झाले.

अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी आपल्या गरजा कोणत्या आणि इच्छा कोणत्या हा फरक स्पष्टपणे करू शकणे अत्यंत महत्वाचे असते. एकदा हा फरक कळाला की मग गरजा पूर्ण करून इच्छांच्या मागे न धावता अर्थपूर्ण आयुष्याचाही मार्ग धरता येतो. ‘अर्थ’पूर्ण यातील ‘अर्थ’मध्ये मोठ्या प्रमाणावर ‘Meaning’ आणि गरजेप्रमाणे ‘Money’ (Economic Stability for needs, not greeds) हाही आशय अंतर्भूत आहेच.

निर्माणमधून कौटुंबिक आणि सामाजिक दडपणाला हाताळण्याचेही प्रशिक्षण मिळते. ज्यांना मी माझे यश सांगू शकतो, मात्र अपयश सांगू शकत नाही ते माझे हितचिंतक असू शकत नाही ही थेट भूमिका त्यामधूनच येते. शोधग्रामच्या कामाची एक पद्धत आहे. ती म्हणजे नेमका प्रश्न काय हे शोधणे आणि एकदा प्रश्नाचे स्वरूप कळाले की मग त्याचे छोटछोटे भाग करून त्याच्या उत्तरावर काम करायचे. यामुळे प्रश्नाचं दडपणही राहत नाही आणि सूक्ष्मपणे कामही करता येते. कोणत्या कामाची गरज आहे हे ओळखणे, ज्यांचा प्रश्न आहे त्यांनाही प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठीच्या नियोजन प्रक्रियेत सहभागी करून घेणे आणि अंतिमतः त्या कामाचा फायदा व्यापक पातळीवर होईल यासाठी प्रयत्नरत राहणे ही शोधग्रामच्या व निर्माणच्याही कामाची पद्धत.

निर्माणचं एक महत्वाचं योगदान हेही आहे, की समाजातील मूलभूत गरजा पूर्ण असणाऱ्या आणि आता Need to Greed असा प्रवास करू पाहणाऱ्या एका मोठ्या व निर्णायक समूहाला संवेदनशील बनवणे. सोबतच त्यांना आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रश्नांबाबत आपलीही काहीतरी जबाबदारी आहे याची जाणीव होण्यास मदत करून  त्या प्रश्नांना भिडण्याची हिंमत देणे. आपली स्वतःची मूल्य व्यवस्था आपण क्षुल्लक कारणांसाठी मोडतो तसे होऊ नये म्हणून काय करायचे याचे उत्तर मागणारे निर्माणीदेखील मला याच ठिकाणी भेटले. आनंद नेमका कशात आहे? हे अगदी शास्त्रशुद्धपणे समजून सांगणारे आणि समजून घेणारे मित्रही निर्माणमधीलच. या सर्वांचाच सहवास खूप शिकवणारा होता आणि पुढेही राहीलच.

निर्माणमध्ये सहभागी होण्याअगोदर सामाजिक क्षेत्रात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या संघटनांशीही माझा जवळून संबंध आला. यामध्ये मूल्यांनी भारलेला आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी संघर्षाला नेहमी तयार असलेला काळही अनुभवला. हा अगदीच समृद्ध करणारा काळ होता. हे समृद्ध करणं चुकणे आणि शिकणे या प्रकारातील. यातील बहुतांशी कृती या प्रतिक्रियावादी स्वरूपाच्या राहिल्याचं आज मागे वळून पाहताना जाणवतं. प्रतिक्रिया देण्याची त्या त्या काळात प्रसंग आणि विषयानुसार गरज असतेच, मात्र यात माझी भूमिका काय असणार याबाबत आज अधिक स्पष्टता आली.

तारुण्याच्या उंबरठ्यावरच सामाजिक क्षेत्रात कामाला सुरुवात करणाऱ्या युवकांना एका टप्प्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यातून मग करियरची काळजी आणि पुढे जोडीदाराची निवड या महत्वाच्या निर्णय प्रक्रियेतून जावे लागते. बहुतांश वेळा करियर आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यात सामाजिक कामातील आपला सहभाग हा फक्त दर्शकाचाच होऊन जातो. किंवा अगदी याच्या उलट होऊन सामाजिक कामातील सहभागामुळे ‘करियर आणि कुटुंब’ या दोन्ही गोष्टींकडे दुर्लक्ष होते. यातील ही दुसरी स्थिती जेथे करियर व कुटुंब दुर्लक्षित राहते या ठिकाणी नैराश्य येणे हाही एक न टाळता येणारा परिणाम आहे. याचा परिणाम मग आपल्या अवतीभवती असणाऱ्या माणसांवर आणि नव्याने सामाजिक बदलाच्या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या व्यक्तींवरदेखील होतोच. तो परिणाम अंतिमतः हाती घेतलेल्या सामाजिक बदलाच्या कामावरदेखील होतो.

सामाजिक चळवळींमध्ये एक अनुभव असाही आहे की येथे वारंवार संघर्षाच्या भूमिकेत राहिल्याने एकतर कडवटपणाची सावली असणारा कठोरपणा येतो किंवा मग निराशाजनक संवेदनशीलपणा. या दोन्ही स्थितींना बाजूला करून संवेदनशील, सकारात्मक आणि परिणामकारक कृतिशीलपणा अंगी बाळगल्याचीही काही उदाहरणे सापडतात, मात्र ती अपवादासाठीच. अगदी कडवट कठोरपणा हा वारंवार संघर्ष करूनही शासनाच्या निगरगट्टपणातून न मिळालेला प्रतिसाद आणि प्रलंबित प्रश्न याच्या दाहकतेतून येतो, तर निराशाजनक संवेदनशीलपणा एवढा दीर्घकाळ काम करूनही अपेक्षित परिणाम होत नसल्याने किंवा दिसत नसल्याने येतो, असे मला वाटते. मात्र मधले अपवाद कसे तयार होतात, त्याची तयार होण्याची प्रक्रिया नेमकी काय आणि हे अपवाद हाच मुख्य प्रवाह होईल यासाठी काय करायचे या सर्वच आघाड्यांवर चळवळ अनुत्तरित होत आहे. निर्माणच्या माध्यमातून या अनुत्तरित प्रश्नांची उकल होण्याला सुरुवात झाली आहे, असे मला वाटते.

आपण जे काम हाती घेतलं आहे त्याची निश्चिती करणे, त्यासाठी सूक्ष्म नियोजन करणे, त्यानुसार कृती करणे, त्यानंतर अपेक्षित परिणाम झाला का हे तपासणे, जर परिणाम झाला नसेल तर केलेली कृती तपासून नव्या कृतींचा अवलंब करणे आणि एवढे करूनही अपेक्षित बदल/परिणाम साधता आला नाही तर आपण घेतलेल्या मूळ प्रश्नांच्याच स्वरूपाची किंवा आपल्या अपेक्षांची चिकित्सा करणे ही शोधग्रामसह निर्माणच्या कामाची पद्धत. यामुळे आपण काम करताना नेहमीच बदलांना खुले राहतो आणि सुधारणा करत राहतो. हाच यातील कामाच्या यशाचा गाभा आहे असे मला वाटते. हा दृष्टिकोन जर इतर सामाजिक क्षेत्रातील संस्था संघटनांनी देखील अवलंबला तर खूप मोठं काम उभं राहिलं असा विश्वास वाटतो.

“नायना” आणि “अम्मा” नावाचं खुलं विद्यापीठ -

गडचिरोली येथील शोधग्रामच्या परिसरात मुळातच संशोधक वृत्ती असलेले “नायना” म्हणजेच डॉ. अभय बंग आणि प्रचंड शिस्तबद्धपणे हाती घेतलेले काम पूर्ण करणाऱ्या “अम्मा” म्हणजे डॉ. राणी बंग हे निर्माणींसाठी एक खुलं विद्यापीठ आहे. माझ्या सामाजिक कामातील दिशा ठरवताना विचारांना अधिक स्पष्टता यावी यासाठी नायनांनी सांगितलेल्या ३ कसोट्या खुपच प्रभावी आहेत. आपण कोणतंही काम करत असू तर या तीन कसोट्यांनी तपासल्यास आपल्या अनेक शंका येथेच संपतात. या कसोट्या खालीलप्रमाणे,

१. MK - म्हणजे काय?
२. KM - कसं मोजणार?
३. KS - कशासाठी ?

कामातून (कृतीतून) माणसाला स्वतःला ओळखता येते, भ्रम गळतात आणि वास्तव दिसते. बोलण्यातून ते होत नाही. बोलण्यात नसलेलं सांगणं असतं, जे खोटं असतं, हे नायनांचं अनुभवांती झालेलं मत खूप पटतं. नायनांनी सांगितलेले निर्माणचे वेगळेपण व मी स्वतः घेतलेला अनुभव म्हणजे या प्रक्रियेत स्वतःचा होणारा दुहेरी प्रवास. यात एकीकडे आपण अहंकाराच्या बाबतीत “मी” कडून “विश्व”कडे जातो तर दुसरीकडे जबाबदारीच्या पातळीवर व्यक्ती “आपण”च्या अवस्थेतून “मी”कडे जातो. याच अवस्थेत मग मी काय करणार हे ठरवत कृतीला सुरुवात होते आणि त्याची जबाबदारी मी स्वीकारतो हेच या प्रक्रियेचं यश. नायना स्व च्या शोधाबाबत सांगतात, “या वयात सर्वच तरुण स्व चा शोध घेतात. स्व हा प्रकाशाचा किरण असतो, तो दिसत नाही पण जेव्हा तो एखाद्या वास्तविक प्रश्नाला भिडतो, तेव्हा “स्व” चा शोध लागतो. जे समजण्यासाठी विचारांसोबत कृती हाच एकमेव मार्ग असल्याचे प्रकर्षाने जाणवते.
अम्मांनी सामाजिक कामातील संघर्षमय कसोटीच्या क्षणांची हाताळणी कशी करावी याचे स्वानुभवातून आलेले शहाणपण दिले हे खूप उपयोगी ठरणारे आहे. त्याची उपयुक्तता येणाऱ्या काळात प्रकर्षाने जाणवणार आहे. सत्यासाठी भांडण्याची शिकवण अम्मांना त्यांच्या आई वडिलांकडूनच मिळाली आहे. त्यामुळे सत्याचा स्वीकार तर करायचा पण अन्यायही होऊ द्यायचा नाही हा त्यांचा स्वभाव बनला. माणूस फक्त चांगला किंवा वाईट नसतो, तर तो चांगला + वाईट असतो. स्वार्थाच्या क्षणी माणसातून वाईटपणा बाहेर येतो, हे त्यांचे अनुभवातून आलेले निरीक्षण. अम्मांना मृत्यूचं अजिबात भय नाही. त्यांच्यामते भीती ही एक काल्पनिक बाब आहे. आपण विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयांवर ठाम राहायला हवे, अगदी मृत्यूच्या क्षणीदेखील ठाम रहावे असेच त्या सांगतात. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी जेव्हा आपला सर्व जीवनपट डोळ्यासमोर उभा राहील तेव्हा पश्चाताप वाटायला नको एवढीच त्यांची इच्छा आहे. तरुणांना खूप मोठा अवकाश उपलब्ध असून खूप काम करा असे सांगताना अम्मा सत्याशी आणि मुळाशी तडजोड न करण्याचेही बजावतात. हे सर्वच मला अधिक प्रगल्भ बनवणारे होते.
आपल्यापैकी प्रत्येकजण गांधी होऊ शकतोे हा विश्वास देताना नायनांनी सहभागी निर्माणींना “महाराष्ट्र तुमची (निर्माणींची) वाट बघणार आहे” हे सांगत जबाबदारीची जी जाणीव करून दिली होती. ती फार बोलकी आहे. त्या दृष्टिकोनातून प्रवास सुरु आहे. पाहुयात कसा आणि कोणत्या टप्प्यापर्यंत हा प्रवास जातोय.

प्रविण
०७ ऑगस्ट २०१८

२४ मे २०१८

आणखी जीव घेण्यास "राझी" नसलेली "सेहमत" ...

आपला देश, आपल्या देशातील माणसे आणि त्या माणसांसाठीची देश म्हणून काही प्रतीके यांचे त्या त्या देशातील माणसाच्या आयुष्यात काय महत्व आहे हे जर कुणाला विचारले तर कदाचित सांगता येणार नाही. पण त्याबद्दलची भावना मात्र प्रबळ असते आणि तेवढीच सार्वत्रिकही असते. याच भावनेतून मग आपल्या देशाप्रती अभिमान/प्रेम व्यक्त करण्यासाठी गाणी तयार होतात आणि ती गाणी काही कालावधीसाठी का होईना पण आपल्यामध्ये प्रचंड उत्साह भरतात.

प्रत्येक देशाला अशी गाणी असतात आणि प्रत्येक देशातील माणसाचे आपल्या देशावर असेच निस्सीम प्रेम असते. मग तो देश भारत असो, पाकिस्तान असो की आणखी कोणता.  #राझी या चित्रपटात देखील असेच एक गाणे आहे. ‘ए वतन मेरे वतन आबाद रहे तू, मै जहाँ रहू जहाँ में याद रहे तू ...’ राझीमधील या गाण्याचे एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे हे गाणे एकच आहे, पण ते एकच गाणे म्हणणारी माणसे राष्ट्र निर्मितीपासूनच शत्रुत्व घेऊन जन्माला येणाऱ्या भारत आणि पाकिस्तानचे नागरिक आहेत. या दोन्ही देशांची माणसे हे गाणे एकाच वेळी अत्यंत मनापासून आपल्याआपल्या देशासाठी म्हणत आहेत. त्यात आपल्या देशाप्रती प्रेम आहे, पण म्हणून दुसऱ्या देशाप्रती कोठेही द्वेष नाही. जेथे प्रेम आहे तेथे द्वेष कसा येईल? असाच काहीसा प्रश्नवजा संदेश त्यातून मिळतो. त्यामुळे त्या तत्कालिक काही क्षणांसाठी तरी तेथे प्रेमाची निखळ भावना व्यक्त होते. त्यावेळी काही क्षण मनात पटकन विचार येऊन जातो की मग या दोन देशांमध्येही असेच प्रेम तयार झाले तर ? ही खुपच सुखावणारी शक्यता आहे ना? हो नक्कीच आहे.

या गाण्याचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या गाण्याच्या शेवटी लहान मुलाच्या आवाजात एका प्रार्थनेचाही अंश आहे. हीच प्रार्थना भारताला स्वातंत्र्य मिळण्याअगोदर संपूर्ण देशात म्हटली जायची. याची आठवण स्वतः गुलजार यांनीच एका मुलाखतीत सांगितली. त्यावेळी गुलजार यांनी हेही आवर्जून सांगितले की या प्रार्थनेचे आणि “सारे जहाँ से अच्छा …” या गीताचे लेखक एकच आहेत आणि ते पाकिस्तानी होते. त्याचं नाव #इक्बाल आणि त्यांची ती प्रार्थना,

लब पे आती है दुआ बनके तमन्ना मेरी
जिंदगी शम्मा की सूरत हो खुदाया मेरी
दूर दुनीया का मेरे दम अन्धेरा हईओ जाये
हर जगह मेरे चमकने से उजाला हो जाये
हो मेरे दम से यूही मेरे वतन की जीनत
जिस तरह फूल से होती है चमन की जीनत
जिंदगी हो मेरी परवाने की सूरत या रब
इल्म की शम्मा से हो मुझको मोहब्बत या रब
हो मेरा काम गरीबो की हिमायत करना
दर्द मंदों से ज़ईफों से मोहब्बत करना
मेरे अल्लाह बुराई से बचाना मुझको
नेक जो राह हो उस राह पे चलाना मुझको

सेहमत आणि इकबाल यांच्या नात्याचा प्रवास तर खूपच संवेदनशील आहे. या नात्यात परस्पर सहमती आणि आदर हे खूप महत्वाचे पैलू दिसतात. लग्नानंतर पत्नीला समजून घेण्यासाठी आणि पत्नीला देखील पती समजून घेता यावा यासाठी ते जो वेळ घेतात तो खूपच प्रगल्भता दर्शवणारा भाग आहे. ही प्रगल्भता व्यक्तीनुसार २ देशांमध्ये देखील असेल तर … खरतर हा जर तरचाच प्रश्न आहे, पण चांगल्या शक्यतांबद्दल विचार करायला हरकत नाही. असो.

सेहमत ही तशी रक्त बघितले तरि चक्कर येणारी मुलगी. अगदी छोट्याश्या खारीला वाचवताना रस्त्यात असल्याचेही भान नसणाऱ्या सेहमतला पुढे देशातील समस्यांबद्दल वडिलांकडून माहिती दिली जाते आणि वडिलांच्या जागी हेरगिरी करण्यासाठी पाकिस्तानमध्ये लग्न करून पाठवले जाते. येथे एक प्रश्न मनात येतो तो म्हणजे सेहमतचे लग्न एवढ्या सहजासहजी कसे होते. दोन्ही देशात एकीकडे तणाव वाढत असताना हे होऊच कसे शकते असेही वाटू शकते आणि ते वाटायलाही हवे. याचे उत्तर आहे पाकिस्तानी सैन्याचा तो अधिकारी आणि हेरगिरी करणारा तो "भारतीय काश्मिरी मुस्लिम" यांच्यातील फाळणीपूर्वीचे नाते. बांग्लादेशची फाळणी होऊपर्यंत अशापद्धतीने नात्यांमध्ये काहीसा ओलावा शिल्लक होता का ? असा प्रश्न यानिमित्ताने पडतो. त्याचे उत्तरही होकारार्थी येते. हा चित्रपट घटीत घटनांवरच बेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. या दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने स्वीकारल्याचेही जाणवते ते याचमुळे कदाचित.

आपण कोठे राहतो यावर आपण घटनांकडे कसे पाहतो हे ठरत असते. त्याचा प्रत्यय या चित्रपटात येतो. म्हणजे दोन्ही देशांना वाटत असते की आपला देश सुरक्षित रहावा. आपल्या देशाच्या रक्षणाची जबाबदारी आपली आहे आणि महत्वाचे म्हणजे आमच्या अंतर्गत बाबींमध्ये बाहेरच्या देशांनी हस्तक्षेप करू नये. मग दोघांनाही असे वाटत असताना अडचण कुणाची आहे ? आणि का ? या दोन देशांमध्ये तणाव का निर्माण होतो ? यावर विचार करण्याची जबाबदारी चित्रपट दर्शकांवर सोपवतो.

सेहमत जम्मू काश्मीरमधील ‘भारतीय मुस्लीम मुलगी’. मला हा उल्लेख खूप महत्त्वाचा वाटतो. तो अशासाठी की सद्यस्थितीत मुस्लिमांबाबत एका रणनितीअंतर्गत देशविरोधी असल्याचे प्रचारतंत्र राबवले जात आहे आणि ती मुस्लीम व्यक्ती जम्मू काश्मीरमधील असेल तर मग त्याच्याविषयी आणखी जास्त संशयास्पद वातावरण निर्माण केले जाते. चित्रपट ज्या ‘कॉलिंग सेहमत’ या पुस्तकावर आधारित आहे, ते पुस्तक लिहिणाऱ्या लेखकाने याबाबतचा एक प्रश्न जम्मू काश्मीरच्या एका वरिष्ठ नेत्याला विचारला असता, त्याचे उत्तर देखील अंतर्मुख करायला भाग पाडते. त्या नेत्याने म्हटले होते, की ‘आपको एक सेहमत चाहिये, हजारो सेहमत है. सिर्फ उन्हे अपनाने की जरूरत हैं.’ जम्मू काश्मीरचा प्रश्नाचा विचार तेथील स्थानिक लोक वगळता उर्वरित देश कसा करत असेल तर जम्मू काश्मीर भारताची शान आहे आणि तेथील जमीनीचा इंच न इंच भाग भारताचा आहे, अशी. पण या सर्व हेव्यादाव्यांमध्ये तेथे राहणारे सर्व जम्मू आणि काश्मीरमधील माणसे आमची आहेत की नाही ? असा मुलभूत प्रश्नच हरवून जातो. या प्रश्नाला भिडण्याचीही गरज या निमित्ताने जाणवते.

बांग्लादेश फाळणी या विषयाला घेऊन सुरू झालेला हा चित्रपट शेवटपर्यंत आपल्याला देशभक्तीच्या ओतप्रोत भावनांमधून घेऊन जातो, काही ठिकाणी 'सेहमत'ची (आलिया भट) होणारी भावनिक ओढाताण, घुसमट देखील प्रकर्षाने जाणवते. मात्र या सर्व प्रवासातून अंतिमतः काय होते तर युद्ध (जंग). मग युद्धात काय होते ? याचा काहीसा अनुभव घेणारी सेहमत उद्वेगाने काही प्रश्न उपस्थित करते. सेहमतने उपस्थित केलेले हे प्रश्न आणि त्या प्रश्नांना भारतीय गुप्तहेर संस्थेतील त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेले उत्तर खूप महत्वाचे आहे आणि तेच सांगण्यासाठी अगोदरचा हा सर्व रोमांचक प्रवास अनुभवला आहे का असेही वाटते. तो संवाद आहे,

"वतन के आगे कुछ नही, खुद भी नही प्यार भी नही!
मैने अपना जमीर, जान, जिंदगी आपके लिये दि और आपने ? …
जंग में ना तुम्हारी कोई किमत होती है, ना मेरी
ना रिश्तो की किमत, ना जान की
जंग मे सिर्फ जंग होती है, और कई मासूमोंकी जाने जाती है."

यावेळी सेहमत खूप ठाम भूमिका घेते व इतर गुप्तहेरांसारखं तिला निर्दयी-पाशवी व्हायचे नाही आणि हे सर्व सोडून घरी जायचे आहे असे सांगतेे. भारतात आल्यावर देखील तिची आई तिला ती गरोदर असल्याचे सांगते, त्यावेळी ती क्षणाचाही वेळ न लावता आता आपण कोणाचाही जीव घेणार नसल्याचे स्पष्ट करते. हा क्षण अंगावर काटा आणणारा आहे. पोटात शत्रू समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानच्या नवऱ्यापासून होणारे बाळ असूनही त्याचा गर्भपात करायला नकार देत, सेहमत त्याला वाढवण्याचा निर्णय घेते आणि हाच मुलगा भारतीय सैन्यात दाखल होतो. तो चित्रपटात जहाजावर काम करत असताना दाखवला देखील आहे.

आशयाच्या पातळीवर चित्रपटाच्या सर्वात शेवटी कानावर पडलेले हे संवाद चित्रपटाचा गाभा आहे, असे मला वाटते. हा चित्रपट "Between the line" असे खूप काही सांगून जातो. आपल्यालाही आपल्या अनुभव विश्वानुसार या चित्रपटातील संवादाला घेऊन वर्तमानात काही सापडते आणि आपण त्याचा विचार करायला सुरुवात करतो.
आपल्याकडे  प्रेमाची आणि द्वेषाची सर्वच बीजे इतिहासात असल्याचे माझे व्यक्तीगत मत आहे. इतिहासातून पुढच्या पिढ्यांना घडवत असताना पुर्वजांकडून एकमेकांच्या कडवट आठवणींचा ठेवा दिला जातो,  की एकमेकांवर प्रेम करणारे काही सामायिक दुवे त्या पिढ्यांमध्ये झिरपवल्या जातात त्याप्रमाणे त्या देशातील जनमानसाचे मन घडत असते. हेच पुढे निर्णायक ठरते, याचा प्रत्यय आपल्यालाही येत आहेच.

राष्ट्रवादाच्या प्रवासात कोलमडणारी नाती आणि उद्ध्वस्त होणारे कुटुंब हा या प्रवासातील आणखी एक टप्पा. या टप्प्यावर मन पिळवटून काढणारे अनेक प्रसंग अनुभवायला मिळतात. हे सर्वच प्रसंग देश आणि धर्माच्या चौकटी ओलांडून आपल्यातील माणूसपणाला साद घालतात. जेव्हा आपल्यासमोर आपले माणुसपण जपायचे की राष्ट्रवाद असा प्रश्न येईल, तेव्हा रविंद्रनाथ टागोर यांचा राष्ट्रवादातील विचार देखील आठवतो.  रविंद्रनाथ टोगोर राष्ट्रवादाविषयी आपले विचार मांडताना आपल्या १९१७ च्या ‘नॅशनॅलिझम इन इंडिया’ नावाच्या निबंधात म्हणतात, ‘‘राष्ट्रवाद म्हणजे जनतेच्या स्वार्थाचे असे संघटीत रूप की ज्यामध्ये मानवता तसेच आपलेपणा किचिंतही शिल्लक राहात नाही. दुर्बल आणि असंघटीत शेजारी राज्यांवर अधिकार मिळवण्याचे प्रयत्न हा राष्ट्रवादाचा स्वाभाविक परिणाम आहे. ह्यातूनच निर्माण झालेला साम्राज्यवाद, अखेर मानवतेचा खुनी बनतो. राष्ट्राच्या बलविकासावर काही नियंत्रण शक्य नसते, त्याच्या विस्ताराला काही सीमा नसते. राष्ट्रवादाच्या अनियंत्रित शक्तीमध्येच मानवतेच्या विनाशाचे बीज आहे.’’ संकुचित राष्ट्रवादाच्या विरोधात ते पुढे लिहितात, “राष्ट्रवादातून जन्मणारी संकुचितता हा मानवाचे नैसर्गिक स्वातंत्र्य आणि आध्यात्मिक विकास यांच्या रस्त्यावरील अडथळा आहे.” ते राष्ट्रवादाला युद्धपिपासू वृ्त्तीला उत्तेजन देणारा आणि समाजविरोधी समजतात, कारण राष्ट्रवादाच्या नावांवर होणारा शासनशक्तीचा अनियंत्रित उपयोग अनेक अपराधांना जन्म घालतो.

चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा, संवाद, अभिनय सर्वच अप्रतिम. आलियाचा अभिनय तर प्रचंड ताकदीचा वाटला. ही ताकद चेहऱ्यावरील expression ची वाटली. तिच्या या expression मध्ये 'निरागसपणा' आणि ‘घुसमट’ हे भाव विशेष नोंद करून गेले. गाणी, संगीत तर ऐकत राहावं असंच आहे.

हा चित्रपट ज्या पुस्तकावर बेतला आहे त्याच्या लेखकांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये काही गोष्टी नमूद केल्या आहेत. त्यात त्यांनी हेही नमूद केले की सेहमत भारतात आली तेव्हा प्रचंड तणावात होती व तिने जे काही केले होते त्याबद्दल तिला अजिबात आनंद वाटला नव्हता. सेहमत भारतात जेथे रहात होती, तेथे ती का राहते असे विचारले तर तिने पाकिस्तानमध्ये ज्या अब्दुलला मारले तो येथेच राहत होता, असे सांगितले. सेहमत आणि तिच्या मुलांमध्ये देखील घडामोडींचा काय परिणाम झाला हे सांगताना त्यांच्यातील संबंध काहीसे दुरावल्याचेही लेखकांनी नोंदवले आहे. यातून हा सर्वच प्रवास किती गुंतागुंतीचा होता हे कळते. लेखकांनी हे देखील सांगितले की सेहमतकडून त्यांना गुरुनानक यांच्याबद्दल देखील खूप माहिती मिळाली. ते सेहमतचे वर्णन करताना म्हणतात, “Kashmiri Muslim Women Fight For India”, यात बरंच काही येते आणि ते समजून घेता आले तर खूप सकारात्मक परिस्थिती तयार होईल.

(नोंद - सेहमतचा मृत्यू जून २०१८ ला झाला आहे.)
#Raazi #राझी

१३ एप्रिल २०१८

अपर्णा रामतीर्थकर यांची व्हायरल पोस्ट आणि त्यावरील आक्षेप

आईने मुलीला सासरी जाताना दिलेले सल्ले वजा उपदेश असलेली पोस्ट ही अपर्णा रामतीर्थकर यांच्या भाषणाने प्रभावित आहे. स्त्री शिक्षणाचा जोरदार विरोध करणाऱ्या या कथित समाजसेविकांचा विरोधाभास हा की त्यांनी स्वतः वकिलीचे शिक्षण घेतले आहेत आणि तरिही मुलींच्या शिक्षणाला विरोध करुन त्या स्वतःतीलच दांभिकपणा दाखवत आहेत.

या पोस्टची सुरुवात ज्या पद्धतीने केली आहे त्यामुळे अनेकदा पीडित भूमिकेत असलेल्या प्रत्येकाला पोस्टची सुरुवात वाचून तो विचार पटतो. कारण प्रत्येकाचे स्वतःचे म्हणून काही अनुभव असू शकतात, मात्र कधी कधी अशा व्यक्तींना आपले अनुभव हे सार्वत्रिक असल्याचाही गैरसमज होतो. त्यातूनच मग अशा मांडणीवर विश्वास ठेवायला सुरुवात होते. खरंतर प्रत्येकाने प्रत्येकाशी प्रेमाने, समजूतदारपणे वागावे हे शाश्वत आणि वैश्विक मूल्य आहे, पण जेव्हा हे वागणं फक्त महिलांवर बंधनकारक करत पुरुषांना यातून सूट दिली जाते, तेव्हा त्यातून सोयीस्करपणे आणि कदाचित नियोजनबद्ध पद्धतीने पुरुषप्रधान संस्कृतीला पाठबळ देण्याचा प्रयत्न होतो.
सध्या पालक आणि पाल्य या नात्यात पिढीतील अंतर आणि त्यांच्या अनुभव विश्वांमध्ये गतीने होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभुमीवर एक विचार (मार्गदर्शक दिशा) सांगितला जातो. तो म्हणजे पाल्यांचे दिशादर्शक (मार्गदर्शक) व्हा, त्यांचे नियंत्रक होऊ नका. या तत्वाचा विचार केला की मग साचेबद्ध उत्तर न देता त्यावर आपला दृष्टिकोन शांतपणे आणि संयमाने ठेवा आणि अट्टाहास न करता तो दृष्टीकोन स्वीकारायचा की नाही हा निर्णय समोरच्या व्यक्तीला घेऊ द्यात हा दृष्टिकोन मिळतो. मात्र या पोस्टमध्ये अपर्णा रामतिर्थकर अगदी साचेबद्ध आणि सर्व आजारांचा रामबाण उपाय अशा जाहिराती थाटात सुनेने (स्त्रीने) कसे वागावे असा उपदेश देत आहेत. जे आक्षेपार्ह आणि चुकीचे आहे, असे मला वाटते. त्यामुळे अशा स्वरूपाच्या साचेबद्ध आणि सगळ्या प्रश्नांचे उत्तर एकच सांगणाऱ्या लिंगभेदी पोस्टवर गांभीर्याने विचार करुन या पोस्ट सकारण नाकारायला हव्यात.

मुलीला तिचं घर कोणतं हा उपदेश देत या पोस्टची सुरुवात होते. हे सांगताना लिहिणाऱ्याच्या विचारप्रणालीत पुरुषप्रधानतेची बीजं किती खोलवर रुजली आहेत याचं स्पष्टपणे दर्शन होतं. कोणत्याही माणसाला (स्त्री-पुरुष) आपले लहानपण जेथे गेले त्या जागेशी काही जैविक व भावनिक नाते असते. ते सोडून जाण्याची भावना काय असते हे कदाचित आपल्याला विस्थापितांच्या अनुभवातूनही समजू शकेल. पण आयुष्याच्या एक महत्वाच्या टप्प्यावर अशापद्धतीने स्वतःचं मूळ सोडून दुसऱ्या ठिकाणी जाताना मानसिकपातळीवर काय घालमेल होते हे देखील समजून घेणं आवश्यक ठरते. ज्यावेळी मुलींना आपण जेथे लहानाचे मोठे झालो, ज्या माणसांनी आपल्याला जीवापाड प्रेम करत मोठे केले असे आपले माहेरचे ठिकाण आपले नाहीच असे सांगण्याचा प्रयत्न होतो तेव्हा हा फारच क्रूर आणि स्वार्थीपणाचा मानवी व्यवहार म्हणावा लागेल. यातील स्वार्थीपणा हा पुरुषसत्ताक व्यवस्थेचे समर्थन करणारा व त्याला अधिक बळकटी देणारा असतो. 

पुरुषप्रधान संस्कृतीत मुलीने स्वतःचं घर सोडून सासरी जाणे हे अपेक्षित असते आणि त्याबद्दल कुणालाही काहीही घेणेदेणे नसते, त्यामुळे संवेदनशीलपणे ते संक्रमण समजून घेण्याचीही तसदी कोणाकडून दाखवली जात नाही. त्यामुळे  सासर हेच यापुढे तुझे स्वतःचे घर आहे आणि यापुढे तु आमच्या घरी पाहुणी म्हणुन आहेस, त्यामुळे यापुढे आमच्याशी वागताना पाहुण्यासारखीच वाग, असे सांगणे. तसेच यापुढे जाऊन आता लग्न होऊन ज्या घरी जाते आहेस तेथेच तुझं मरण झालं पाहिजे. जगली तरी सासरी आणि मेलीस तरी सासरी हा जाणीवपूर्वक संस्कार (propoganda) रुजवला जातो. याला माझा व्यक्तिगत विरोध आहे.

मालिका बघण्याबाबत माझे व्यक्तिगत काही आक्षेप आहेत, पण हे आक्षेप रामतीर्थकर यांच्या सारख्या एकेरी हाक मारू नये छाप अर्थहीन आक्षेपांसारखे नाही. कारण अनेकवचनी हाक मारल्यावर अगदी माणुसपणाचे सर्व संस्कार होतात हा माझा भ्रम नाही आणि ज्यांचा आहे त्यांनी तो दुरुस्त करावा असेच माझे स्पष्ट मत आहे. त्याचं कारण हा एकेरीपणा एकमेकांच्या विश्वासातून आणि मैत्रीपूर्ण नात्यातून येतो. आणि हा टप्पा कथित सन्मानाच्या नाटकी वागण्यापेक्षा खूप महत्त्वाचा आहे. जेथे प्रत्येकजण वयाचे दडपण न घेता व्यक्त होतो. त्या व्यक्त होण्यात प्रचंड प्रेम आणि आदर असतो, जो नाटकी अथवा सामाजिक दाबावातून न येता मनातून आलेला असतो. याचं उदाहरण द्यायचं ठरलं तर तिर्थकरांना पटेल असं आईचं उदाहरण आहेच. त्यांनी त्यावर विचार करावाच.

जॉब-करीअर या महत्वाच्या गोष्टींना फालतु म्हणणे म्हणजे टोकच झाले. त्यापुढे जाऊन पैसा कमविण्यासाठी घराचा उंबरठा न ओलांडण्याचा सल्ला म्हणजे वास्तव नाकारत स्वतःच्याच कोशात राहणे आहे. आज पैसे ही आयुष्यातील सर्वस्व नसली तरी जगण्यासाठी (महिलांसाठी तर सन्मानाने जगण्यासाठी) अत्यावश्यक बाब झाली आहे. त्यामुळे नोकरी, पैसे याचं किमान महत्वही नाकारणे हा शुद्ध मूर्खपणा आहे.
तिर्थकरांचं महत्वाचं वेगळेपण म्हणजे त्या ज्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात त्यातून त्या अजूनही बाहेर पडलेल्या नाहीत. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांना त्यांच्या नवऱ्याने कधीही प्रेमाने बाहेर फिरायला जायचे का असे विचारले नाही. त्यामुळे तसे विचारुच नये असा आट्टाहास त्या करतात. दैनंदिन जगण्यात काही नाविन्य शोधत जगण्याचा आनंद घेण्याशी या वकिल बाईंचा दुरान्वये देखील संबंध न आल्याने हे असे होत असावे असे मला वाटते.

'लग्नाच्या वरातीत भर रस्त्यावर चारचौघात नाचु नकोस, त्यामुळे माहेरच्या नावाला काळिमा लागेल', हा तर गमतीशीरच सल्ला. हा सल्ला देण्यामागे नाचणे (नृत्य) वाईट असते, त्यात चारचौघात नाचणे तर जास्त वाईट अशी काही गृहीतके असल्याचे लक्षात येते आणि त्यांची नृत्याविषयीची संकुचित समज व दृष्टिकोनही कळतो. पण यासर्वात त्या दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या आपल्या वंशाच्या दिव्याबद्दल मात्र काहीही आक्षेप घेत नाही. दुसरीकडे घरातल्याच लग्नाच्या वेळी महिलांनी गाण्यावर नाचणे म्हणजे यांना माहेरच्या नावाला काळिमा फासणे वाटते. काय काय केल्यावर आईच्या, वडिलांच्या व माहेरच्या नावाला काळिमा फासला जातो याबद्दलची तिर्थकरांची यादी तशी मोठी आहे. एकूणच संस्कृती रक्षण आणि कुटुंब बचावच्या बेगडी कामात त्यांना या यादीचा काहीसा फायदा होईलही, पण उत्क्रांतीच्या टप्प्यावर त्यांची ही यादी त्यांच्यातील उत्क्रांतीचा अभावच अधोरेखित करते.

"घराबाहेर पडताना लेगिन, जिन्स, टी-शर्ट असे कपडे वापरणं बंद कर व तसे कपडे घालुन फिरण्याचा अट्टाहास करु नकोस", असाही सल्ला त्या देतात. त्यांच्या मते यामुळेही कदाचित संस्कृती व कुटुंब धोक्यात आले असावे , त्यामुळे अशा सल्ल्यांवर येणारी पिढी हसण्यापलिकडे काही करेल असे वाटत नाही.

तिर्थकर यांच्या म्हणण्यानुसार अशा गोष्टी जर प्रत्येक आईने आपापल्या मुलीला मनापासून शिकवायला सुरुवात केली, तर कोर्टात व पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या पती-पत्नींमधील खटल्यांची व तक्रारींची संख्या कमी होईल. एकूणच त्यांच्या मांडणीचा हा गाभा. म्हणजे  यातही त्यांचे गृहीतक हेच की पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या तक्रारी आणि न्यायालयातील खटले स्त्रियांच्या चुकांचा परिपाक आहे. पण त्या यावेळी एवढही समजून घेण्याची तयारी ठेवत नाही की आपल्या समाजात आजही सासरी होणाऱ्या अत्याचाराला सहनच करायचे असते या त्यांच्या सारख्या मानसिकतेच्या स्त्रियांची संख्या प्रचंड आहे. कोणतीही स्त्री अत्याचाराच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर नाईलाजाने पोलीस ठाण्याचा पर्याय निवडते. अनेक स्त्रीयातर हा पर्याय देखील निवडत नाही. अशा स्थितीत अत्याचार करणाऱ्यांच्या सुधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्यांऐवजी पीडितांनाच नसलेले सल्ले देणे म्हणजे त्यांच्या भाषेत माणूसपणाच्या नावावर कलंक आहे. हे असं करणं म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराचा इतिहास व वर्तमान हेतुपुरस्कर विसरायचा आणि काहीतरी वेगळाच सांगत दिशाभूल करण्याचा हा प्रकार होय.

तिर्थकरांना नाते परस्पर समजुतीने समृद्ध करण्याच्या दीर्घ प्रक्रियेशी काही देणे नसल्यासारखे फक्त एकाने तडजोड करावी अशीच त्यांची मांडणी आहे. त्यांच्या भाषणांना   मिळणारा प्रतिसाद या व्यवस्थेच्या लाभार्त्यांकडून व काहीसा स्वतःचे ठोस मत बनवू न शकलेल्या काठावर बसलेल्यांकडून येत आहे. मी जेव्हा एकदा त्यांचे भाषण ऐकायला गेलो होतो, त्यावेळी मी अनुभवले की अनेक पुरुष आपल्या घरातील मुलींना व महिलांना अगदी आग्रहाने (जबरदस्तीने) घेऊन आलेआईने मुलीला सासरी जाताना दिलेले सल्ले वजा उपदेश असलेली पोस्ट ही अपर्णा रामतीर्थकर यांच्या भाषणाने प्रभावित आहे. स्त्री शिक्षणाचा जोरदार विरोध करणाऱ्या या कथित समाजसेविकांचा विरोधाभास हा की त्यांनी स्वतः वकिलीचे शिक्षण घेतले आहेत आणि तरिही मुलींच्या शिक्षणाला विरोध करुन त्या स्वतःतीलच दांभिकपणा दाखवत आहेत.

या पोस्टची सुरुवात ज्या पद्धतीने केली आहे त्यामुळे अनेकदा पीडित भूमिकेत असलेल्या प्रत्येकाला पोस्टची सुरुवात वाचून तो विचार पटतो. कारण प्रत्येकाचे स्वतःचे म्हणून काही अनुभव असू शकतात, मात्र कधी कधी अशा व्यक्तींना आपले अनुभव हे सार्वत्रिक असल्याचाही गैरसमज होतो. त्यातूनच मग अशा मांडणीवर विश्वास ठेवायला सुरुवात होते. खरंतर प्रत्येकाने प्रत्येकाशी प्रेमाने, समजूतदारपणे वागावे हे शाश्वत आणि वैश्विक मूल्य आहे, पण जेव्हा हे वागणं फक्त महिलांवर बंधनकारक करत पुरुषांना यातून सूट दिली जाते, तेव्हा त्यातून सोयीस्करपणे आणि कदाचित नियोजनबद्ध पद्धतीने पुरुषप्रधान संस्कृतीला पाठबळ देण्याचा प्रयत्न होतो.

सध्या पालक आणि पाल्य या नात्यात पिढीतील अंतर आणि त्यांच्या अनुभव विश्वांमध्ये गतीने होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभुमीवर एक विचार (मार्गदर्शक दिशा) सांगितला जातो. तो म्हणजे पाल्यांचे दिशादर्शक (मार्गदर्शक) व्हा, त्यांचे नियंत्रक होऊ नका. या तत्वाचा विचार केला की मग साचेबद्ध उत्तर न देता त्यावर आपला दृष्टिकोन शांतपणे आणि संयमाने ठेवा आणि अट्टाहास न करता तो दृष्टीकोन स्वीकारायचा की नाही हा निर्णय समोरच्या व्यक्तीला घेऊ द्यात हा दृष्टिकोन मिळतो. मात्र या पोस्टमध्ये अपर्णा रामतिर्थकर अगदी साचेबद्ध आणि सर्व आजारांचा रामबाण उपाय अशा जाहिराती थाटात सुनेने (स्त्रीने) कसे वागावे असा उपदेश देत आहेत. जे आक्षेपार्ह आणि चुकीचे आहे, असे मला वाटते. त्यामुळे अशा स्वरूपाच्या साचेबद्ध आणि सगळ्या प्रश्नांचे उत्तर एकच सांगणाऱ्या लिंगभेदी पोस्टवर गांभीर्याने विचार करुन या पोस्ट सकारण नाकारायला हव्यात.

मुलीला तिचं घर कोणतं हा उपदेश देत या पोस्टची सुरुवात होते. हे सांगताना लिहिणाऱ्याच्या विचारप्रणालीत पुरुषप्रधानतेची बीजं किती खोलवर रुजली आहेत याचं स्पष्टपणे दर्शन होतं. कोणत्याही माणसाला (स्त्री-पुरुष) आपले लहानपण जेथे गेले त्या जागेशी काही जैविक व भावनिक नाते असते. ते सोडून जाण्याची भावना काय असते हे कदाचित आपल्याला विस्थापितांच्या अनुभवातूनही समजू शकेल. पण आयुष्याच्या एक महत्वाच्या टप्प्यावर अशापद्धतीने स्वतःचं मूळ सोडून दुसऱ्या ठिकाणी जाताना मानसिकपातळीवर काय घालमेल होते हे देखील समजून घेणं आवश्यक ठरते. ज्यावेळी मुलींना आपण जेथे लहानाचे मोठे झालो, ज्या माणसांनी आपल्याला जीवापाड प्रेम करत मोठे केले असे आपले माहेरचे ठिकाण आपले नाहीच असे सांगण्याचा प्रयत्न होतो तेव्हा हा फारच क्रूर आणि स्वार्थीपणाचा मानवी व्यवहार म्हणावा लागेल. यातील स्वार्थीपणा हा पुरुषसत्ताक व्यवस्थेचे समर्थन करणारा व त्याला अधिक बळकटी देणारा असतो.

पुरुषप्रधान संस्कृतीत मुलीने स्वतःचं घर सोडून सासरी जाणे हे अपेक्षित असते आणि त्याबद्दल कुणालाही काहीही घेणेदेणे नसते, त्यामुळे संवेदनशीलपणे ते संक्रमण समजून घेण्याचीही तसदी कोणाकडून दाखवली जात नाही. त्यामुळे सासर हेच यापुढे तुझे स्वतःचे घर आहे आणि यापुढे तु आमच्या घरी पाहुणी म्हणुन आहेस, त्यामुळे यापुढे आमच्याशी वागताना पाहुण्यासारखीच वाग, असे सांगणे. तसेच यापुढे जाऊन आता लग्न होऊन ज्या घरी जाते आहेस तेथेच तुझं मरण झालं पाहिजे. जगली तरी सासरी आणि मेलीस तरी सासरी हा जाणीवपूर्वक संस्कार (propoganda) रुजवला जातो. याला माझा व्यक्तिगत विरोध आहे.

मालिका बघण्याबाबत माझे व्यक्तिगत काही आक्षेप आहेत, पण हे आक्षेप रामतीर्थकर यांच्या सारख्या एकेरी हाक मारू नये छाप अर्थहीन आक्षेपांसारखे नाही. कारण अनेकवचनी हाक मारल्यावर अगदी माणुसपणाचे सर्व संस्कार होतात हा माझा भ्रम नाही आणि ज्यांचा आहे त्यांनी तो दुरुस्त करावा असेच माझे स्पष्ट मत आहे. त्याचं कारण हा एकेरीपणा एकमेकांच्या विश्वासातून आणि मैत्रीपूर्ण नात्यातून येतो. आणि हा टप्पा कथित सन्मानाच्या नाटकी वागण्यापेक्षा खूप महत्त्वाचा आहे. जेथे प्रत्येकजण वयाचे दडपण न घेता व्यक्त होतो. त्या व्यक्त होण्यात प्रचंड प्रेम आणि आदर असतो, जो नाटकी अथवा सामाजिक दाबावातून न येता मनातून आलेला असतो. याचं उदाहरण द्यायचं ठरलं तर तिर्थकरांना पटेल असं आईचं उदाहरण आहेच. त्यांनी त्यावर विचार करावाच.

जॉब-करीअर या महत्वाच्या गोष्टींना फालतु म्हणणे म्हणजे टोकच झाले. त्यापुढे जाऊन पैसा कमविण्यासाठी घराचा उंबरठा न ओलांडण्याचा सल्ला म्हणजे वास्तव नाकारत स्वतःच्याच कोशात राहणे आहे. आज पैसे ही आयुष्यातील सर्वस्व नसली तरी जगण्यासाठी (महिलांसाठी तर सन्मानाने जगण्यासाठी) अत्यावश्यक बाब झाली आहे. त्यामुळे नोकरी, पैसे याचं किमान महत्वही नाकारणे हा शुद्ध मूर्खपणा आहे.

तिर्थकरांचं महत्वाचं वेगळेपण म्हणजे त्या ज्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात त्यातून त्या अजूनही बाहेर पडलेल्या नाहीत. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांना त्यांच्या नवऱ्याने कधीही प्रेमाने बाहेर फिरायला जायचे का असे विचारले नाही. त्यामुळे तसे विचारुच नये असा आट्टाहास त्या करतात. दैनंदिन जगण्यात काही नाविन्य शोधत जगण्याचा आनंद घेण्याशी या वकिल बाईंचा दुरान्वये देखील संबंध न आल्याने हे असे होत असावे असे मला वाटते.

'लग्नाच्या वरातीत भर रस्त्यावर चारचौघात नाचु नकोस, त्यामुळे माहेरच्या नावाला काळिमा लागेल', हा तर गमतीशीरच सल्ला. हा सल्ला देण्यामागे नाचणे (नृत्य) वाईट असते, त्यात चारचौघात नाचणे तर जास्त वाईट अशी काही गृहीतके असल्याचे लक्षात येते आणि त्यांची नृत्याविषयीची संकुचित समज व दृष्टिकोनही कळतो. पण यासर्वात त्या दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या आपल्या वंशाच्या दिव्याबद्दल मात्र काहीही आक्षेप घेत नाही. दुसरीकडे घरातल्याच लग्नाच्या वेळी महिलांनी गाण्यावर नाचणे म्हणजे यांना माहेरच्या नावाला काळिमा फासणे वाटते. काय काय केल्यावर आईच्या, वडिलांच्या व माहेरच्या नावाला काळिमा फासला जातो याबद्दलची तिर्थकरांची यादी तशी मोठी आहे. एकूणच संस्कृती रक्षण आणि कुटुंब बचावच्या बेगडी कामात त्यांना या यादीचा काहीसा फायदा होईलही, पण उत्क्रांतीच्या टप्प्यावर त्यांची ही यादी त्यांच्यातील उत्क्रांतीचा अभावच अधोरेखित करते.

"घराबाहेर पडताना लेगिन, जिन्स, टी-शर्ट असे कपडे वापरणं बंद कर व तसे कपडे घालुन फिरण्याचा अट्टाहास करु नकोस", असाही सल्ला त्या देतात. त्यांच्या मते यामुळेही कदाचित संस्कृती व कुटुंब धोक्यात आले असावे , त्यामुळे अशा सल्ल्यांवर येणारी पिढी हसण्यापलिकडे काही करेल असे वाटत नाही.

तिर्थकर यांच्या म्हणण्यानुसार अशा गोष्टी जर प्रत्येक आईने आपापल्या मुलीला मनापासून शिकवायला सुरुवात केली, तर कोर्टात व पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या पती-पत्नींमधील खटल्यांची व तक्रारींची संख्या कमी होईल. एकूणच त्यांच्या मांडणीचा हा गाभा. म्हणजे यातही त्यांचे गृहीतक हेच की पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या तक्रारी आणि न्यायालयातील खटले स्त्रियांच्या चुकांचा परिपाक आहे. पण त्या यावेळी एवढही समजून घेण्याची तयारी ठेवत नाही की आपल्या समाजात आजही सासरी होणाऱ्या अत्याचाराला सहनच करायचे असते या त्यांच्या सारख्या मानसिकतेच्या स्त्रियांची संख्या प्रचंड आहे. कोणतीही स्त्री अत्याचाराच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर नाईलाजाने पोलीस ठाण्याचा पर्याय निवडते. अनेक स्त्रीयातर हा पर्याय देखील निवडत नाही. अशा स्थितीत अत्याचार करणाऱ्यांच्या सुधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्यांऐवजी पीडितांनाच नसलेले सल्ले देणे म्हणजे त्यांच्या भाषेत माणूसपणाच्या नावावर कलंक आहे. हे असं करणं म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराचा इतिहास व वर्तमान हेतुपुरस्कर विसरायचा आणि काहीतरी वेगळाच सांगत दिशाभूल करण्याचा हा प्रकार होय.

तिर्थकरांना नाते परस्पर समजुतीने समृद्ध करण्याच्या दीर्घ प्रक्रियेशी काही देणे नसल्यासारखे फक्त एकाने तडजोड करावी अशीच त्यांची मांडणी आहे. त्यांच्या भाषणांना मिळणारा प्रतिसाद या व्यवस्थेच्या लाभार्त्यांकडून व काहीसा स्वतःचे ठोस मत बनवू न शकलेल्या काठावर बसलेल्यांकडून येत आहे. मी जेव्हा एकदा त्यांचे भाषण ऐकायला गेलो होतो, त्यावेळी मी अनुभवले की अनेक पुरुष आपल्या घरातील मुलींना व महिलांना अगदी आग्रहाने (जबरदस्तीने) घेऊन आले होते. यात त्यांचा विचार त्यांची मळलेली वाट पुनर्जीवित करणे हाच होता. त्यामुळे बदलाच्या वाटेवर जन्माला आलेली ही पिढी हे स्वीकारायला तयार होत नाही आणि त्यांच्या आधीची पिढी हे सर्व त्यांच्या गळी उतरवण्याचा अट्टाहास करत राहते असा हा संघर्ष सध्या सुरू असल्याचे चित्र आहे.

( तिर्थकर यांच्या भाषणांबद्दल देखील अनेक आक्षेप आहेत, तेही लवकरच नोंदवेल.)