वृत्तपत्र विद्या पदविकेच्या प्रथम सत्रानंतर पत्रकारितेच्या वास्तविक क्षेत्रातील थेट पत्रकार म्हणून काम करण्याची मोठी संधी म्हणजे अंतर्वासिता होय. यासाठी पुरेशी तयारी आणि गृहपाठ अभ्यासक्रमादरम्यान तज्ञ शिक्षकांकडून करून घेतला होता. तरीही प्रत्यक्ष वर्तमान पत्राच्या रचनेत कामाचा अनुभव नसल्याने अंतर्वासिता सुरु होऊन काम करणे हे एक उत्कंठावर्धक तसेच जबाबदारीचे काम होते. अंतर्वासिकेसाठी कोणत्या वर्तमान पत्राची आणि कोणत्या भागाची निवड करावी याचा विचार करताना, अभिषेक भोसले, मंदार कुलकर्णी आणि मल्हार अरणकल्ले सरांनी खूप महत्वाचे मार्गदर्शन केले . "जेथे अधिकाधिक कामाची संधी आणि नाविन्यपूर्ण अनुभव येतील अशी निवड करण्याबाबतची" त्यांची सूचना अधिक योग्य वाटली . कामासाठी कोणता भाग निवडावा याचा निर्णय मात्र मी व्यक्तिगत पातळीवर घेत , संगमनेर या माझ्या स्वतःच्या तालुक्याचीच निवड केली.
माझे बहुतांशी शिक्षण संगमनेर येथे झाले आणि काही प्रमाणात सामाजिक क्षेत्रातील अनुभवही येथेच घेतला होता. ही निवड करण्यामागे आणखी दुसरे कारण होते ते म्हणजे संगमनेरमध्ये मला विद्यार्थी, नागरिक म्हणून काम करत असताना तेथील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्राची काही प्रमाणात जाण झाली होती. मात्र पत्रकाराच्या नजरेतून आणि भूमिकेतून हे सर्व समजून घेणे माझ्यासाठी गरजेचे होते . हे समजून घेण्यासाठी निवडणुकांचा काळ जो नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने संगमनेरमध्ये येणार होता तो काळ सर्वाधिक योग्य आणि अनुभव देणारा वाटला . त्याच्यासाठी अंतर्वासिता ही संधी होती आणि म्हणूनच मी लोकमत संगमनेरच्या विभागीय कार्यालयात काम करण्यासाठी अहमदनगर आवृत्तीचे संपादक सुधीर लंके यांच्याशी चर्चा करून काम करण्याची परवानगी घेतली. त्यांनीही तात्काळ यासाठी परवानगी दिली. अंतर्वासितेच्या सर्वच टप्प्यांवर मार्गदर्शन करणाऱ्या या सर्वांसाठी मी मनापासून कृतज्ञ आहे .
लोकमतच्या संगमनेर विभागीय कार्यालयातील अंतर्वासितेचा पहिलाच दिवस नगरपालिकेच्या निवडणुकीच्या विषयाने सुरु झाला. त्यात नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी असलेले एकूण प्रभाग, गट आणि नगरसेवकांची संख्या याची माहिती भेटली. या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे यावेळी नगरपालिका नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्यात येणार असल्याने निवडणुकीची चर्चा अधिक होती. त्यामुळेच सर्वांचे याकडे जास्त लक्ष होते. निवडणूक अर्ज भरायला सुरुवात झाली होती आणि अर्ज मागे घेण्याची तारीख जवळ आली होती त्यामुळे कोण अर्ज मागे घेते, किती अर्ज शिल्लक राहतात, कोणत्या पक्षांच्या युती होतात याविषयी माहिती घेणे गरजेचे असल्याचेही या चर्चेदरम्यान ठरले.
प्रत्येक दिवशी आल्यानंतर सर्व वर्तमान पत्रे स्थानिक बातम्यांचे विषय आणि आकडेवारीसह बघितले. तसे बघण्याचे महत्व कार्यालयातील वितरण विभागाचे वाघ सर यांनी सांगितले. हे बघताना इतर वर्तमान पत्रांशी आपल्या वर्तमानपत्रांची तुलना करत आपल्या कामाच्या विषयांमध्ये आणि वार्तांकनामध्ये सातत्याने सुधारणा करण्याचा धडा मिळाला. याच दिवसापासून निवडणुकीबाबतच्या विविध बातम्यांचे वृत्तांकन तालुका वार्ताहर विलास गुंजाळ यांच्यासोबत करण्यास सुरुवात केली. हा वार्तांकनाचा अनुभव देखील खूप चांगला होता. कारण या वार्तांकनामध्ये निवडणुकीवर परिणाम करणारे घटक असलेल्या जात धर्म आणि आर्थिक हितसंबंधांचा जो परिणाम होणार आहे त्याची माहिती समजली. सोबतच दररोज विवीध राजकीय प्रसिद्धी कार्यालयांमधून येणाऱ्या प्रसिद्धी पत्रकांची बातमी करताना काय काळजी घ्यायची याचे माहितीसह प्रात्यक्षिक बघायला मिळाले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या मुलाखती घेता येतील का याविषयी चर्चा केली असता तो अधिकार आवृत्ती संपादकांचा असतो हेही तालुका प्रतिनिधी गुंजाळ सर यांच्याकडून कळाले. वृत्तपत्राच्या कामात त्या वृत्तपत्राच्या छपाईच्या अक्षर आकाराच्या प्रकारापासून ते वापरावयाच्या सॉफ्टवेअरचे वेगळेपण काम करत असतानाच लक्षात आले.
याच दरम्यान नोटबंदीच्या निर्णयाने सर्वच ठिकाणी मोठी चर्चा सुरु झाली होती . या निर्णयाचा परिणाम समाजातील सर्वच घटकांवर होणार होता तो समजून घेण्यासाठी मी तेथील सहकारी पतसंस्था, व्यावसायिक, सरकारी कार्यालये येथे गेलो काही नागरिकांशी देखील चर्चा केली. शहरातील बँकांचे निरीक्षण आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. हा अनुभव समाजमन समजून घ्यायला खूप उपयोगी पडला.
या कामा व्यतिरिक्त तालुकयातील एड्स बाधित मुलांवर काम करणाऱ्या संस्थेच्या प्रमुखांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. त्यांची मुलाखत घेताना या कामात असणारा राजकीय हस्तक्षेप , प्रशासकीय दडपणं आणि समाजाचे विविधांगी दृष्टिकोन नव्याने लक्षात आले. जन्मतः अंधत्व आलेल्या मुलीने तिच्या या कमतरतेवर मात करत राष्ट्रीय पातळीवरील बँकिंगच्या परीक्षेत यश मिळवले होते त्याचीही बातमी करण्याची संधी मिळाली . ती बातमी करण्यासाठी त्या मुलीच्या घरी म्हणजे ‘कोंची’ या गावाच्या अगदी अंतर्गत भागात जायला मिळाले जेथे जाण्यासाठी अजूनही रस्त्याची पुरेशी सुविधा नव्हती. सामाजिक स्तरावर असलेली जातनिहाय विभागणी आणि त्यानुसार मिळणाऱ्या सुविधांमधील वेगळेपणही पुन्हा अनुभवायला मिळाले. संगमनेरच्या वैचारिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रावर प्रभाव असणाऱ्या "कवी अनंत फंदी प्रतिष्ठान व्याख्यानमालेचे" वृत्तांकन करण्याचे कामही करायला मिळाले. जे माझ्यासाठी ज्ञान आणि अनुभव मिळवण्यासाठी अधिक उपयोगी पडले.
अंतर्वासितेच्या शेवटच्या दिवसांमध्ये निवडणुकीचा प्रचार, जाहिरात तंत्र, निकाल आणि निकालानंतरचे विश्लेषण याचाही जवळून अनुभव घेतला . हा सर्वच अनुभव मला माझ्या पत्रकारितेच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे . या अनुभवाच्या जोरावर भरीव काम करण्याचा आत्मविश्वासही मिळाला या बद्दल मी मनस्वी आनंदी आहे .
एकूणच कामाचा अनुभव खूप काही शिकवणारा होता. अनेक गोष्टी कामाचा उत्साह वाढवणाऱ्या होत्या. पण त्यात अनेक वास्तव दाखवणारे अनुभव आले जे पत्रकारितेच्या ऐकीव प्रतिमेला दुजोरा देणारे होते. तालुक्याच्या ठिकाणी पत्रकारिता करताना तेथील पत्रकारावर असलेला जाहिरात, वितरण आणि राजकीय हितसंबंध सांभाळण्याची कसरत गंभीर होती. यात अनेक पत्रकार संघर्षा ऐवजी परिस्थितीशी जुळवून घेत आपले अस्तित्व टिकवतानाच दिसून येत होते. राजकीय पुढाऱ्यांपासून अनेकांच्या दबावाचा सर्वात जास्त बळी म्हणून तालुक्यावरील पत्रकारच समोर आला. कोणती बातमी घ्यायची , कोणता विषय हाताळायचा हे अनेकदा अपुऱ्या पारदर्शीपणे होते आणि त्यात कामावर मर्यादा येतात असेही वाटले .
पत्रकारितेच्या अभ्यासक्रमामध्ये पत्रकारितेचा इतिहास, तत्वे, मूल्ये, संपादकीय उज्वल परंपरा समोर येते तर वास्तवात असे विरोधाभास अनुभवायला मिळतात त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित राहिले. पण सगळीच परिस्थिती एकसारखी नाही याचेही काही उदाहरणे अनुभवली ज्यात काही पत्रकार अजूनही तत्व, मूल्यांशी आणि पत्रकारितेच्या मूळ गाभ्याशी एकनिष्ठ राहून काम करत आहेत. असे पत्रकारच कामासाठीचा खरा मार्ग असून त्या मार्गावर चालायचे या निर्धारासह मी माझी अंतर्वासिता पूर्ण केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा