"शोधग्राम" म्हणजे सामाजिक क्षेत्रातील एक खुली प्रयोगशाळा आहे, जेथे समाजातील विविध प्रश्नांची उकल करण्यासाठी सामुहिक पातळीवर विविध प्रयोग केले जातात. या प्रयोगांना जशी संशोधणात्मक कामाच्या पद्धतीची जोड आहे, तशीच सर्वसमावेशकतेची दृष्टीही आहे. मला वाटतं "निर्माण" हा शोधग्रामच्या सर्वात यशस्वी प्रयोगांमधील एक मैलाचा दगड आहे.
निर्माण तरुणाईला आश्वासक दिशा देत सामाजिक बदलाच्या व तेवढ्याच स्वतःलाही उन्नत करणाऱ्या प्रक्रियेत जबाबदारीने सहभागी करून घेते. हा सहभाग ‘स्व ते समाज” असा आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्याला यातून स्वतःला तर समजून घेता येतेच, सोबत आपल्या अवतीभवती असणाऱ्या समाजालाही समजून घेता येते. हे समजून घेणं समोर असणाऱ्या भीषण परिस्थितीवर दया भावना, सहानुभूती अथवा कीव करण्यापर्यंत सीमित राहत नाही, तर त्या प्रश्नांच्या सोडवणुकीत मी काय भूमिका करू शकतो याची स्पष्टता देण्यापर्यंत असते.
माझा निर्माणमध्ये सहभागी होण्यापर्यंतचा प्रवास हा काहीसा बाळबोध सामाजिक काम ते परिणामकारक सामाजिक बदलाच्या प्रक्रियेतील सहभाग असा झाला. याची सुरुवात माझ्या गावात युवकांना घेऊन काम करण्यापासून झाली. पुढे मग विद्यार्थी दशेत विद्यार्थी संघटना आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये काम करत एका टप्प्यावर आता पुढे काय? या प्रश्नासह झाला. या टप्प्यावर माझ्यासमोर जसा कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा प्रश्न होता, तसाच पुढील कामाची निश्चित दिशा ठरवण्याचा आणि त्यातून उपजीविका व सामाजिक बदलाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याची ओढाताण कमी करण्याचाही होता. याच काळात भावनिक पातळीवर काहीसा एकटेपणाही जाणवत होता. यामागे प्रवाहापेक्षा वेगळा मार्ग निवडण्याची धडपड आणि त्यातून येणारी असुरक्षितता अशी कारणे होती. आजूबाजूला असणाऱ्या नातेवाईक, मित्र या वर्तुळात आपल्या सामाजिक विचारांना समजून घेऊ शकतील अशी खूप मोजकी माणसं होती. याच काळात मला निर्माणच्या सामाजिक बदलांच्या विचारांनी झपाटलेल्या समविचारी कुटुंबाचा भाग होण्याची संधी मिळाली.
निर्माणच्या वर्षभरातील एकूण ३ शिबिरांमध्ये मी स्वतःला अनेक पातळ्यांवर तपासू शकलो. अनेक ठिकाणी स्व चिकित्सा करण्याच्या मर्यादाही आल्या, तेथे निर्माणचे मित्र मदत करत गेले. ही मदत दोन स्वरूपाची होती. एक म्हणजे त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून काही insights (दृष्टिकोन) मिळत गेले आणि दुसरे माझ्या कृतींचे त्यांच्याकडून मूल्यमापनही झाले. या प्रक्रियेने मूल्यावर ठाम राहून, आदर्श समोर ठेवून देखील वास्तववादी जगता येते आणि नुसते जगता येत नाही तर सामाजिक बदलाच्या प्रक्रियेवर सकारात्मक परिणाम करू शकू एवढ्या प्रभावीपणे जगता येते हे शिकवले.
निर्माणच्या १ वर्षातील सहभाग हा साधारणपणे ३ टप्प्यांमध्ये (Camp) झाला. यामध्ये स्वतःची वर्तमान स्थिती अचूकपणे समजून घेत जगण्याच्या संकल्पनांमध्ये स्पष्टता आणता आली. तसेच मला माझ्यासमोरील नेमके प्रश्न काय आहेत यावर सखोल विचार करता आला. त्यामुळे सर्वप्रथम नेमके स्वतःवर कोठे कोठे काम करण्याची गरज आहे हे स्पष्ट झाले. आर्थिक परिस्थिती सुरुवातीपासून हालाखीची होती, त्यामुळे भविष्यात काम करत असताना आर्थिक बाजू सांभाळून हवे ते काम कसे करणार हा मोठा प्रश्न होता. कामाची निवड, मूल्ये, आर्थिक गरजा, जबाबदाऱ्या अशा संभ्रमात निर्माणच्या “माझी पैशांची गरज” या exercise ने खूप स्पष्टता दिली. आधी माझी नेमकी आर्थिक गरज किती आहे हे तेवढं स्पष्ट नव्हतं. निर्माणच्या या पहिल्या टप्प्यात हा प्रश्न निकाली निघाला. ही आर्थिक गरज ठरवताना त्यात Need आणि Greed हा फरकही करता आला. त्यामुळे अधांतरीची असुरक्षितता व अस्वस्थता कमी झाली आणि यापुढे प्रश्नांचा कशा सूक्ष्मपद्धतीने विचार करायचा याचेही प्रशिक्षण झाले.
अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी आपल्या गरजा कोणत्या आणि इच्छा कोणत्या हा फरक स्पष्टपणे करू शकणे अत्यंत महत्वाचे असते. एकदा हा फरक कळाला की मग गरजा पूर्ण करून इच्छांच्या मागे न धावता अर्थपूर्ण आयुष्याचाही मार्ग धरता येतो. ‘अर्थ’पूर्ण यातील ‘अर्थ’मध्ये मोठ्या प्रमाणावर ‘Meaning’ आणि गरजेप्रमाणे ‘Money’ (Economic Stability for needs, not greeds) हाही आशय अंतर्भूत आहेच.
निर्माणमधून कौटुंबिक आणि सामाजिक दडपणाला हाताळण्याचेही प्रशिक्षण मिळते. ज्यांना मी माझे यश सांगू शकतो, मात्र अपयश सांगू शकत नाही ते माझे हितचिंतक असू शकत नाही ही थेट भूमिका त्यामधूनच येते. शोधग्रामच्या कामाची एक पद्धत आहे. ती म्हणजे नेमका प्रश्न काय हे शोधणे आणि एकदा प्रश्नाचे स्वरूप कळाले की मग त्याचे छोटछोटे भाग करून त्याच्या उत्तरावर काम करायचे. यामुळे प्रश्नाचं दडपणही राहत नाही आणि सूक्ष्मपणे कामही करता येते. कोणत्या कामाची गरज आहे हे ओळखणे, ज्यांचा प्रश्न आहे त्यांनाही प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठीच्या नियोजन प्रक्रियेत सहभागी करून घेणे आणि अंतिमतः त्या कामाचा फायदा व्यापक पातळीवर होईल यासाठी प्रयत्नरत राहणे ही शोधग्रामच्या व निर्माणच्याही कामाची पद्धत.
निर्माणचं एक महत्वाचं योगदान हेही आहे, की समाजातील मूलभूत गरजा पूर्ण असणाऱ्या आणि आता Need to Greed असा प्रवास करू पाहणाऱ्या एका मोठ्या व निर्णायक समूहाला संवेदनशील बनवणे. सोबतच त्यांना आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रश्नांबाबत आपलीही काहीतरी जबाबदारी आहे याची जाणीव होण्यास मदत करून त्या प्रश्नांना भिडण्याची हिंमत देणे. आपली स्वतःची मूल्य व्यवस्था आपण क्षुल्लक कारणांसाठी मोडतो तसे होऊ नये म्हणून काय करायचे याचे उत्तर मागणारे निर्माणीदेखील मला याच ठिकाणी भेटले. आनंद नेमका कशात आहे? हे अगदी शास्त्रशुद्धपणे समजून सांगणारे आणि समजून घेणारे मित्रही निर्माणमधीलच. या सर्वांचाच सहवास खूप शिकवणारा होता आणि पुढेही राहीलच.
निर्माणमध्ये सहभागी होण्याअगोदर सामाजिक क्षेत्रात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या संघटनांशीही माझा जवळून संबंध आला. यामध्ये मूल्यांनी भारलेला आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी संघर्षाला नेहमी तयार असलेला काळही अनुभवला. हा अगदीच समृद्ध करणारा काळ होता. हे समृद्ध करणं चुकणे आणि शिकणे या प्रकारातील. यातील बहुतांशी कृती या प्रतिक्रियावादी स्वरूपाच्या राहिल्याचं आज मागे वळून पाहताना जाणवतं. प्रतिक्रिया देण्याची त्या त्या काळात प्रसंग आणि विषयानुसार गरज असतेच, मात्र यात माझी भूमिका काय असणार याबाबत आज अधिक स्पष्टता आली.
तारुण्याच्या उंबरठ्यावरच सामाजिक क्षेत्रात कामाला सुरुवात करणाऱ्या युवकांना एका टप्प्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यातून मग करियरची काळजी आणि पुढे जोडीदाराची निवड या महत्वाच्या निर्णय प्रक्रियेतून जावे लागते. बहुतांश वेळा करियर आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यात सामाजिक कामातील आपला सहभाग हा फक्त दर्शकाचाच होऊन जातो. किंवा अगदी याच्या उलट होऊन सामाजिक कामातील सहभागामुळे ‘करियर आणि कुटुंब’ या दोन्ही गोष्टींकडे दुर्लक्ष होते. यातील ही दुसरी स्थिती जेथे करियर व कुटुंब दुर्लक्षित राहते या ठिकाणी नैराश्य येणे हाही एक न टाळता येणारा परिणाम आहे. याचा परिणाम मग आपल्या अवतीभवती असणाऱ्या माणसांवर आणि नव्याने सामाजिक बदलाच्या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या व्यक्तींवरदेखील होतोच. तो परिणाम अंतिमतः हाती घेतलेल्या सामाजिक बदलाच्या कामावरदेखील होतो.
सामाजिक चळवळींमध्ये एक अनुभव असाही आहे की येथे वारंवार संघर्षाच्या भूमिकेत राहिल्याने एकतर कडवटपणाची सावली असणारा कठोरपणा येतो किंवा मग निराशाजनक संवेदनशीलपणा. या दोन्ही स्थितींना बाजूला करून संवेदनशील, सकारात्मक आणि परिणामकारक कृतिशीलपणा अंगी बाळगल्याचीही काही उदाहरणे सापडतात, मात्र ती अपवादासाठीच. अगदी कडवट कठोरपणा हा वारंवार संघर्ष करूनही शासनाच्या निगरगट्टपणातून न मिळालेला प्रतिसाद आणि प्रलंबित प्रश्न याच्या दाहकतेतून येतो, तर निराशाजनक संवेदनशीलपणा एवढा दीर्घकाळ काम करूनही अपेक्षित परिणाम होत नसल्याने किंवा दिसत नसल्याने येतो, असे मला वाटते. मात्र मधले अपवाद कसे तयार होतात, त्याची तयार होण्याची प्रक्रिया नेमकी काय आणि हे अपवाद हाच मुख्य प्रवाह होईल यासाठी काय करायचे या सर्वच आघाड्यांवर चळवळ अनुत्तरित होत आहे. निर्माणच्या माध्यमातून या अनुत्तरित प्रश्नांची उकल होण्याला सुरुवात झाली आहे, असे मला वाटते.
आपण जे काम हाती घेतलं आहे त्याची निश्चिती करणे, त्यासाठी सूक्ष्म नियोजन करणे, त्यानुसार कृती करणे, त्यानंतर अपेक्षित परिणाम झाला का हे तपासणे, जर परिणाम झाला नसेल तर केलेली कृती तपासून नव्या कृतींचा अवलंब करणे आणि एवढे करूनही अपेक्षित बदल/परिणाम साधता आला नाही तर आपण घेतलेल्या मूळ प्रश्नांच्याच स्वरूपाची किंवा आपल्या अपेक्षांची चिकित्सा करणे ही शोधग्रामसह निर्माणच्या कामाची पद्धत. यामुळे आपण काम करताना नेहमीच बदलांना खुले राहतो आणि सुधारणा करत राहतो. हाच यातील कामाच्या यशाचा गाभा आहे असे मला वाटते. हा दृष्टिकोन जर इतर सामाजिक क्षेत्रातील संस्था संघटनांनी देखील अवलंबला तर खूप मोठं काम उभं राहिलं असा विश्वास वाटतो.
“नायना” आणि “अम्मा” नावाचं खुलं विद्यापीठ -
गडचिरोली येथील शोधग्रामच्या परिसरात मुळातच संशोधक वृत्ती असलेले “नायना” म्हणजेच डॉ. अभय बंग आणि प्रचंड शिस्तबद्धपणे हाती घेतलेले काम पूर्ण करणाऱ्या “अम्मा” म्हणजे डॉ. राणी बंग हे निर्माणींसाठी एक खुलं विद्यापीठ आहे. माझ्या सामाजिक कामातील दिशा ठरवताना विचारांना अधिक स्पष्टता यावी यासाठी नायनांनी सांगितलेल्या ३ कसोट्या खुपच प्रभावी आहेत. आपण कोणतंही काम करत असू तर या तीन कसोट्यांनी तपासल्यास आपल्या अनेक शंका येथेच संपतात. या कसोट्या खालीलप्रमाणे,
१. MK - म्हणजे काय?
२. KM - कसं मोजणार?
३. KS - कशासाठी ?
कामातून (कृतीतून) माणसाला स्वतःला ओळखता येते, भ्रम गळतात आणि वास्तव दिसते. बोलण्यातून ते होत नाही. बोलण्यात नसलेलं सांगणं असतं, जे खोटं असतं, हे नायनांचं अनुभवांती झालेलं मत खूप पटतं. नायनांनी सांगितलेले निर्माणचे वेगळेपण व मी स्वतः घेतलेला अनुभव म्हणजे या प्रक्रियेत स्वतःचा होणारा दुहेरी प्रवास. यात एकीकडे आपण अहंकाराच्या बाबतीत “मी” कडून “विश्व”कडे जातो तर दुसरीकडे जबाबदारीच्या पातळीवर व्यक्ती “आपण”च्या अवस्थेतून “मी”कडे जातो. याच अवस्थेत मग मी काय करणार हे ठरवत कृतीला सुरुवात होते आणि त्याची जबाबदारी मी स्वीकारतो हेच या प्रक्रियेचं यश. नायना स्व च्या शोधाबाबत सांगतात, “या वयात सर्वच तरुण स्व चा शोध घेतात. स्व हा प्रकाशाचा किरण असतो, तो दिसत नाही पण जेव्हा तो एखाद्या वास्तविक प्रश्नाला भिडतो, तेव्हा “स्व” चा शोध लागतो. जे समजण्यासाठी विचारांसोबत कृती हाच एकमेव मार्ग असल्याचे प्रकर्षाने जाणवते.
अम्मांनी सामाजिक कामातील संघर्षमय कसोटीच्या क्षणांची हाताळणी कशी करावी याचे स्वानुभवातून आलेले शहाणपण दिले हे खूप उपयोगी ठरणारे आहे. त्याची उपयुक्तता येणाऱ्या काळात प्रकर्षाने जाणवणार आहे. सत्यासाठी भांडण्याची शिकवण अम्मांना त्यांच्या आई वडिलांकडूनच मिळाली आहे. त्यामुळे सत्याचा स्वीकार तर करायचा पण अन्यायही होऊ द्यायचा नाही हा त्यांचा स्वभाव बनला. माणूस फक्त चांगला किंवा वाईट नसतो, तर तो चांगला + वाईट असतो. स्वार्थाच्या क्षणी माणसातून वाईटपणा बाहेर येतो, हे त्यांचे अनुभवातून आलेले निरीक्षण. अम्मांना मृत्यूचं अजिबात भय नाही. त्यांच्यामते भीती ही एक काल्पनिक बाब आहे. आपण विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयांवर ठाम राहायला हवे, अगदी मृत्यूच्या क्षणीदेखील ठाम रहावे असेच त्या सांगतात. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी जेव्हा आपला सर्व जीवनपट डोळ्यासमोर उभा राहील तेव्हा पश्चाताप वाटायला नको एवढीच त्यांची इच्छा आहे. तरुणांना खूप मोठा अवकाश उपलब्ध असून खूप काम करा असे सांगताना अम्मा सत्याशी आणि मुळाशी तडजोड न करण्याचेही बजावतात. हे सर्वच मला अधिक प्रगल्भ बनवणारे होते.
आपल्यापैकी प्रत्येकजण गांधी होऊ शकतोे हा विश्वास देताना नायनांनी सहभागी निर्माणींना “महाराष्ट्र तुमची (निर्माणींची) वाट बघणार आहे” हे सांगत जबाबदारीची जी जाणीव करून दिली होती. ती फार बोलकी आहे. त्या दृष्टिकोनातून प्रवास सुरु आहे. पाहुयात कसा आणि कोणत्या टप्प्यापर्यंत हा प्रवास जातोय.
प्रविण
०७ ऑगस्ट २०१८



