२९ नोव्हेंबर २०१७

कोपर्डी अत्याचार प्रकरणात फाशी, पुढे काय ?



“कोपर्डी” अत्याचाराच्या प्रकरणात जलदगतीने सुनावणी करत दोषीना अखेर फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा झाल्याची अनेकांची भावना आहे, ती तशीच माझीही. यासाठी प्रथमतः तपास यंत्रणांसह वकील आणि न्यायाधीशांचे आभार.

कोपर्डी मधील त्या शाळकरी मुलीवर ज्या क्रूर पद्धतीने अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर ज्या निर्घृणपणे तिचा खून करण्यात आला ते खुपच भयानक आणि माणुसकीला काळिमा फासणारे होते. अशा काळिमा फासणाऱ्या घटना खैरलांजी पासून अगदी कोपर्डी पर्यंत झाल्या. हा खैरलांजी ते कोपर्डीचा प्रवास म्हणजे वेदनांचाच प्रवास राहिला आहे. या प्रवासातील वेदना अजूनही कायम असल्याचेच चित्र आहे. कोपर्डी प्रकरणात दोषींना शिक्षा झाल्याने या वेदनांवर काहीशी फुंकर घातली जाईल, पण वेदना मात्र तशाच राहतील. कोपर्डी प्रकरणातील या शिक्षेच्या निकालाने अशाप्रकारच्या कोणत्याही घटनेत कठोर शिक्षा होईल, असा संदेश न्याययंत्रणेकडून समाजापर्यंत जाणे अत्यंत महत्वाचे होते. आजच्या निकालाने ते काही प्रमाणात झाले असे म्हणता येईल. पण खरंच असं होणार आहे का ?

महाराष्ट्रात प्रत्येक दिवशी सरासरी किती मुलींना अशा पद्धतीच्या अत्याचाराला सामोरे जावे लागते याची आकडेवारी बघितली तर धक्का बसेल अशी माहिती समोर येते. मग काही प्रश्न उपस्थित होतात,

ज्या पीडितांवर अन्याय, अत्याचार होतो त्या सर्व पीडितांना न्याय मिळतो का ?

जर न्याय मिळत नसेल तर का मिळत नाही ?

या अत्याचार पीडितांना न्याय मिळायला हवा की नको ?

अर्थात माणूसपण शाबूत असणाऱ्या प्रत्येकाला त्या पीडितांना न्याय म्हणजेच दोषींना शिक्षा मिळायलाच हवी असेच वाटेल.

मग अत्याचाराच्या प्रकरणात मोठा जनसमुदाय रस्त्यावर आल्याशिवाय न्याय मिळणार की नाही ?

प्रत्येक घटनेत असं रस्त्यावर येणं शक्यही आहे का ?

आणि दररोज होणाऱ्या या अत्याचाराच्या घटनांमध्ये असं रस्त्यावर येणं हे न्यायपूर्ण समाजाचं लक्षण मानायचे का ?

म्हणूनच या निकालासह “न्यायव्यवस्थेचे सक्षमीकरण” हा विषय अजेंड्यावर घ्यावा लागणार आहे.  तसे झाले नाही तर प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे ही मागणी कितीही योग्य वाटली तरी व्यवहारातच येऊ शकणार नाही हेही तेवढंच खरं. फारतर “लाखांचे मोर्चे” काढून एका प्रकरणात न्याय मिळवता येईल, अन्य प्रकारणांचे काय हा प्रश्न यथास्थिती आ वासून उभाच राहतो.

अत्याचार झालेल्या प्रत्येकाला वेळेत न्याय मिळण्यासाठी काय करावे लागेल यावर जेव्हा विचार करायला सुरुवात होते, तेव्हा मात्र व्यवस्थेतील सुधारणांमधील उदासीनता समोर येते. ती उदासीनता झटकण्याची आणि त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची नितांत गरज लक्षात येते. अशी राजकीय इच्छाशक्ती निर्माण होण्यासाठी नक्कीच मोठ्या प्रमाणात जनतेचा रेटा हवा असतो. कारण राजकारणी गर्दी पाहून निर्णय घेतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे. मग या मूलभूत परंतु मुळ आणि अत्यावश्यक मागणीसाठी  “लाखांच्या मोर्चाचा” अजेंडा “न्यायव्यवस्थेचे सक्षमीकरण” हा होऊ शकेल का ?

आज या प्रकरणातील दोषींना शिक्षा देण्यासाठी आवश्यक एवढी न्याययंत्रणाच अस्तित्वात नसणे हे काही कोणत्याही आरोग्यदायी समाजाचे लक्षण होऊ शकत नाही.

या प्रकरणाने मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि समाजातील अशा पद्धतीने अत्याचार करणाऱ्या मानसिकतेला चाप कसा लावणार ? हेही प्रश्न ऐरणीवर आले. कोपर्डीच्या त्या बहिणीला सहन कराव्या लागलेल्या वेदना यापुढे कुणालाही सहन कराव्या लागू नयेत म्हणून हा मूलभूत अजेंडा घेऊन काम व्हायला हवे.

यासोबतच आणखी एक मूलभूत बाब समजून घेणे आवश्यक आहे असे वाटते. अत्याचार पीडितांना वेदनादायक जगणे जगायला लागण्यात ‘एकुण समाज रचनेत स्त्रीचे स्थान आणि अत्याचाराचे स्वरूप’ याचाही काही संबंध आहे का तेही बघायला हवे ? अनेकदा समाजात “ती स्त्री जिवंतपणी नरक यातना भोगते” असं बोललं जातं. नरक यातना म्हणजे काय याचा अर्थ खोलात जाऊन समजून घेतला की लक्षात येईल की, एखादा अपराधी एका विशिष्ट प्रसंगी अत्याचार करतो परंतु समाज तिला नाकारून, तिच्याकडे तिरस्काराने आणि अपमानास्पद पद्धतीने बघून जगण्यापेक्षा मरणे चांगले आहे असे विचार करण्याची वेळ आणतो. मग हाही प्रश्न या फाशीच्या निकालाने सुटणार आहे का ?

अत्याचाराच्या प्रसंगानंतरच्या त्या स्त्रीच्या त्रासात त्या अपराध्याएवढाच समाजाच्या तथाकथित मानसिकतेचा देखील  वाटा आहे हे स्वीकारावे लागणार आहे. जशी माणसाच्या शरीराला एखादी जखम होते तिला फक्त जखम म्हणून पाहिलं जातं आणि सोडून दिलं जातं तसं लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये होत नाही. इज्जतीचे सगळे ओझे स्त्रियांच्या माथी मारून पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुष मंडळी मुक्त आणि स्वैर राहतात. “योनी सुचिता” हा त्यातला कळीचा मुद्दा आहे. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच योनीला न बघता, तेथे हक्क सांगण्याच्या मानसिकतेचा परिपाक म्हणजे त्या अवयवाला पावित्र्याचा लेप देने आणि मग त्यातून तिला सामान्य माणूस म्हणून न बघणे, तिचं माणूसपण मान्य न करणे. स्त्रियांवर लैंगिक अत्याचार झाले की तिला द्वेषाने आणि तिरस्काराने बघणे हा त्याचा परिणाम. यावरचे उत्तर या फाशीने मिळणार आहे का ?

©प्रविण

०४ नोव्हेंबर २०१७

डॉ. गणेश देवींना समजून घेताना ...



"ज्ञान म्हणजे काय ? ते कोणी निर्माण केलं ? ते कसं मिळतं ? ज्ञानाची उत्सुकता का असते ? ज्ञान मिळवण्याची धडपड क असते ?" याचा आयुष्यभर शोध घेत, त्याचा पाठपुरावा करत मुक्तपणे जगणारा माणुस म्हणजे डॉ. गणेश देवी होय. वयाच्या १७ व्या वर्षापासून ४४ व्या वर्षापर्यत दररोज न चुकता पुस्तकाची ३०० पानं वाचणारा हा माणूस.




वयाच्या ४५ व्या वर्षी बडोद्यामधील  (गुजरात) सयाजीराव गायकवाड विश्वविद्यालयातील इंग्रजी विषयाची प्राध्यापकी सोडून आदिवासींमध्ये त्यांच्याच जीवनशैलीत जगू लागला. सुरुवातीचे दोन वर्ष तर डॉ. देवी आदिवासींसोबत एकही शब्द न बोलता एकत्रितपणे बसून राहत. फक्त आदिवासींना ऐकत, न्याहाळत व निघून जात. या सर्व प्रकाराच्या शब्दांशिवायच्या संवादाला गणेश देवी 'निशब्द अड्डा' असं संबोधतात. पुढे मग ते त्या नि:शब्द अड्ड्यात काही वर्तमान पत्र आणुन ठेवत व आदिवासी बांधव उत्सुकतेने ते न्याहाळत बसत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील हा अभ्यासक - संशोधक स्वतःपासून कमालीचा आलिप्त राहून जगाशी जोडला जातो. हे जोडलेपण तेथील मातीशी जोडुन घेण्यापासून सुरू होते आणि पुढे तेथील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुजरात राज्यात बडोद्यामधील तेजगड या आदिवासी भागात त्यांचे काम होय.



सामुहिक प्रयत्नातून व सहभागातून उभ्या राहिलेल्या 'आदिवासी अकॅडमी'च्या माध्यमातून आदिवासींचे जीवन आणि पर्यावरण समजून घेत त्या ऐतिहासिक ठेव्यांचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्याचे महत्वाचे काम तेथे झाले आहे. एकीकडे लोक भाषांना सुनियोजित पद्धतीने संपवण्याचे प्रयत्न होत असताना तेजगडमध्ये ८०० प्रादेशिक भाषांमध्ये बोलणाऱ्या ८०० झाडांचे 'भाषावन' उभे केले आहे. या झाडांना हात लावला की ती झाडे त्यांच्या भाषेत बोलू लागतात. तेजगडमधील आदिवासी म्युझियम हे तर तेथील आदिवासींच्या जगण्याचा जीवंत व समृद्ध ठेवाच आहे. अशा पद्धतीने  बायोसेन्साॅरच्या मदतीने झाडांना बोलते करण्यातून व म्युझियमच्या माध्यमातून ईतिहास करण्याच्या कृतीतून भाषातज्ञ असणाऱ्या गणेश देवींमधील वैज्ञानिक आणि ईतिहासकाराचे सुक्ष्मरूप अनुभवता येते.



डॉ. गणेश देवींच्या या कामातून त्यांच्या सातत्यपुर्ण कृतीप्रवणतेचा गुण स्पष्टपणे अनुभवायला मिळतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रादेशिक लोक भाषा जतनाचे मोठ काम करत असताना अभ्यास आणि संशोधनाला थेट जमिनीवरील रचनात्मक कामाला जोडून घेण्याची त्यांची कामाची पद्धत त्यांना म्हणूनच विशेषत्व बहाल करते. जगभरातील 40 ते 50 देशांमध्ये अभ्यास, अध्यापन आणि संशोधनासाठी गेलेल्या या माणसात जसा व्यापक जागतिक दृष्टिकोन दिसतो तसेच तळागाळातील सामन्यातील सामान्याचं जगणं समजून घेणारा सहृदय दृष्टिकोन देखील दिसतो. त्यांच्या स्वतःच्या मते ते एकाचवेळी तीन जगांमध्ये व भाषांमध्ये राहिले आहेत. ते तीन म्हणजे आदिवासींचे जग, तुमचं आमचं नागरी जग आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील जग होय. तसेच तीन भाषा म्हणजे मराठी,  गुजराती आणि इंग्रजी भाषा होय. त्यामुळेच त्यांच्या विचारांना जसा वैश्विक संदर्भ असतो तसा स्थानिक वास्वववादी आधारही असतो. त्यातूनच त्यांची मांडणी अधिक तर्कसंगत आणि कालसुसंगत झाल्याचे लक्षात येते.



विनोबांचा 'Think Globally Work Locally' हा विचार प्रत्यक्षात आचरणात आणण्याचे भरीव काम डॉ. गणेश देवींनी केले आहे. 'अक्षर मानव'च्या संवाद - सहवास या उपक्रमात त्यांच्या सोबत जो वेळ जगता आला त्यातील एक महत्वाची बाब म्हणजे त्यांनी चर्चेसोबत दिलेला एक कृतीकार्यक्रम होय. त्यांच्यामते स्थानिक पातळीवर प्रत्येक गावात तरूण मातांना एकत्र करून 'मातृमंडळ' तयार करून त्यांना आपल्या कुटूंबात स्वातंत्र व निर्भयता रुजवण्यास प्रोत्साहित केले. त्यांना काही पुस्तके वाचायला देऊन नवा विचार दिला आणि त्याच्या छोट्या छोट्या बातम्या व्हाट्सअॅप , फेसबुकवर पाठवल्या तर स्वातंत्र व निर्भयतेचे वातावरण निर्माण होण्यास मोठी मदत होईल. मातृभूमीचा भावनिक अतिरेक होत असताना त्यावर 'मातृमंडळ' प्रभावी ठरेल.



असाच काहीसा कृती कार्यक्रम फ्रान्समध्ये बिघडलेल्या परिस्थितीत व कडव्या टोकदार उजव्या शक्तींच्या प्रभावाला उत्तर देण्यासाठी एक चळवळ उभी राहिली होती. त्या अंतर्गत फ्रन्समधील लोकांनी दररोज रात्री आपल्या जवळच्या, ओळखीच्या व्यक्यींसोबत १० मिनीटे बोलण्याचे सुरू केले. त्याच्या परिणाम स्वरूप कडव्या टोकदार उजव्या शक्तींना प्रभावी उत्तर तर मिळालेच सोबत २०१७ च्या फ्रान्स अध्यक्षीय निवडणुकीत देखील सकारात्मक बदल घडून आला.
असाच काहीसा शुल्लक वाटणारा कार्यक्रम गांधींनीही दांडी सत्याग्रहाच्या रूपाने केला होता. त्यावेळी त्यांच्या त्या कार्यक्रमाला मोतीलाल नेहरूंनी निरूपयोगी ठरवले ज्यावर गांधींनी दिलेले एका ओळीचे उत्तर होते, 'करके देखो' होते. त्यावर मोतीलाल यांना दांडी सत्याग्रहात सहभागी होण्याच्या अगोदरच अटक झाली व त्यांनी गांधींना उत्तर पाठवले 'करनेसे पहलेही देख लिया'. हीच अनुभूती गणेश देवींच्या या कृतीकार्यक्रमासाठीही लागु झाली तर विशेष वाटायला नको.
म्हणूनच 'करके देखो'



डॉ. गणेश देवी स्वतःला कायम विद्यार्थीच असल्याचे मानतात. त्यांच्यामते त्यांच्या जगण्याचा व कामाचा मार्ग त्यांनी स्वतः ठरवलेला आहे. पण त्यावर कसे चालायचे, मार्गक्रमण करायचे हे त्यांना त्यांचे विविध गुरू सांगतात. डॉ.  गणेश देवी सर्वांनाच वेगवेगळ्या विषयांसाठी गुरू मानतात. जसे मनुस्मृतीच्या विश्लेषणासाठी ते डाॅ. आंबेडकरांना गुरू मानतात तर ग्रामविकासाच्या संकल्पनेसाठी गांधींना गुरू मानतात. अशा पद्धतीने ते अनेकांना विषयानुरूप आपले गुरू मानतात. आदिवासींना ते स्वतःचा सर्वात चांगला गुरू मानतात. या सर्व गोष्टींतून त्यांचा विनम्रपणा आणि ज्ञानोपासनेच्या वृत्तीची प्रचिती होते.

ज्ञानाच्या संदर्भातील संकल्पना स्पष्ट करताना ते सांगतात की, 'ज्ञान आणि स्वातंत्र्यात खुप जवळचा संबंध असून जो मुक्त आहे त्याला ज्ञान मिळवता यायला हवे. पण येथे ज्ञानामुळे माणूस मुक्त होतो अशी मांडणी होते. ज्ञानावर मालकी मिळवण्याचे मोठे प्रयत्न होत असून त्यामागे केवळ नफा कमावण्याचा हेतू आहे. पाठीचा मणका वाकवावा लागेल अशी कष्टाची कामे इतरांवर ढकलण्यासाठीही ज्ञानाचा वापर होतो आहे. लिपी हे स्वार्थाचं स्पष्ट रूप आहे. कुठलीही भाषा कुठल्याही लिपीत लिहिता येते. भाषेचा व लिपीचा काडीचाही संबंध नाही. भाषा लिपीवर अवलंबून नाही तर व्यवसाय देण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे. अनेकदा लिपीचा भाषेवर अन्याय होतो. लिखीत व्याकरण, लिपी ही भाषेची जरूरी नसते. अगदी साडेतीन वर्षांपर्यंतच्या मुलांनाही अवघड आणि किचकट भाषेतील वाक्ये येतात हे त्याचे एक चांगले उदाहरण आहे.



भाषा बोलणारे जर रेल्वेचे इंजिन मानले तर व्याकरणवाले त्या रेल्वेच्या इंजिनचा शेवटचा बडा ठरतील. व या व्याकरणरूपी डब्याला शेवटी इंजिनाच्याच मागे धावावे लागते. त्याप्रमाणे व्याकरण हे देखील भाषा बोलणाऱ्यांची मागे धावत असते. भाषा बोलणारच भाषेला स्वतंत्र बनवतात. शिक्षक हा ज्ञानासाठी आवश्यक नसून, शिक्षकांनी स्वतःच्या अस्तित्वासाठी, रोजगारासाठी भाषा शिकवायला सुरुवात केली. आदिवासी त्यांच्या ढोलाच्या एका आवाजातून २४ प्रकारचे संदेश पाठवू शकतात. हि त्यांची स्वतंत्र अभिव्यक्ती आहे.



आपण कसे बघतो ते बघणे, आपण कसा विचार करतो त्याचा विचार करणे अर्थात प्रक्रिया समजून घेणेहे डॉ. गणेश देवी यांच्या अभ्यासाचे, संशोधनाचे आणि कामाचे मुख्य सूत्र राहिले आहे. या सूत्राबद्दल ते आग्रही आहेत. कुठल्याही कामात झोकून देऊन शिस्तीने, प्रामाणिकपणे आणि वेळेवर काम करणे हि त्यांच्या कामाची पद्धत असल्याचे प्रकर्षाने लक्षात येते. त्याच्याच परिणाम स्वरूप त्यांनी आजपर्यंत मोठे काम निर्माण केले. ३००० लोकांना सोबत घेऊन ३० राज्यांचे लोक भाषा सर्वेक्षणाचे काम जे सरकारने शक्ती असतानाही करणे टाळले तेच काम डॉ. गणेश देवी यांनी सरकारच्या मदतीशिवाय लोकांच्या सहभागातून केले. त्या सर्वेक्षणाचे ३० खंड प्रकाशित करून ते देशाला अर्पण केले. प्रकाशनासाठी त्यांनी बाहेर देशातील अनेक नावाजलेल्या प्रकाशकांची प्रकाशनासाठीची मागणी नाकारून जाणीवपूर्वक ते प्रकाशनाचे काम देशातीलच प्रकाशकाला दिले. यातून त्यांचे कामाच्या प्रत्येक टप्प्यावर असलेले लक्ष आणि प्रत्येक निर्णयात अधिक विधायकता आणि अर्थपूर्णता आणण्याचे प्रयत्न दिसतात. या सोबतच आदिवासी अकॅडमी विकसित करण्याचे ४० ते ५० कोटींचे काम  असो  की 'भाषा' ट्रस्ट व प्रकाशन अंतर्गत २०० ग्रंथांचे प्रकाशन या सर्व कामांत त्यांच्या कार्यपद्धतीचा ठसा उमटलेला दिसतो.



कोणतेही काम दीर्घकाळ टिकण्यासाठी त्या कामात पुढच्या पिढ्यांचा सहभाग अत्यावश्यक असल्याचे ते मानतात. त्यातूनच त्यांनी आदिवासी अकॅडमीच्या सर्व पदांचा त्याग करून ते काम नव्या पिढीकडे सोपविले. जीवनात अंगिकारण्याच्या काही महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख करताना ते सांगतात की, 'अपरिग्रह हे आयुष्यातील महत्वाचे, अर्थपूर्ण व शक्तिशाली शस्त्र आहे. तसेच मनातून भीती काढून टाकणेही अत्यवाश्यक आहे. भय काढून टाकणे म्हणजे मृत्यूबद्दल बेदरकार होणे नसून मृत्यूबद्दल आदर ठेवणे होय.' डॉ. गणेश देवी यांच्या वेळोवेळी घेतलेल्या स्पष्ट वैचारिक भूमिकांमुळे आणि परिणामकारक संघर्षमय रचनात्मक कार्याने त्यांच्यावर जीवघेणे हल्ले देखील झाले. परंतु मृत्यूच्या भयाला दूर केल्याने व कामावरील अपरिग्रहवादी निष्ठेमुळे त्यांनी त्या हल्ल्यांना निकामी तर ठरवलं. सोबत त्यांच्यातील माफ करण्याच्या मानवी वृत्तीने त्यांनी त्या हल्लेखोरांना मोठ्या मानाने माफ केले. यात त्यांना त्यांच्या सतर्क आणि सजग 'दृष्टी'नेही मोठी साथ दिली. त्यांच्या स्वतःच्या निरीक्षणाप्रमाणे त्यांच्या कानाच्या तुलनेत त्यांचे डोळे हे जास्त जलद व तीक्ष्ण आहेत,  त्याचा या सर्व घटनांना सामोरे जाण्यात खूप जास्त उपयोग झाला.



वयाच्या ११व्या वर्षांपासून अध्यात्मापासून अलिप्त झालेले आणि आत्म्याचा शुद्ध न घेता, आत्म्याच्या शोधाचा शोध घेणारे डॉ. देवी देव आणि आत्म्याबाबत स्पष्टपणे नमूद करतात की, 'शब्द आहेत म्हणूनच देव आहेत. आपण घोडा, शेळी या सारखे प्राणी असतो तर देव असला नसता. देव म्हणजे भाषा, लहान मुलांतील जाणिवा, सामाजिक संस्था होय. आस्तिक म्हणजे अस्तित्व स्वीकारणे होय.  आपल्या या काळात 'निर्भयता' हाच देव आहे.'आदिवासींना भुकविना, कर्जविना, रोगविना, आणि स्थलांतर विना जगता येणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करताना ते सांगतात की, 'आदिवासी हे स्वतःला पृथ्वीचा मानतात पण पृथ्वीला स्वतःची मालकी मानत नाही. "I belongs to earth, doesn't belongs to me" म्हणताना त्यांना तेथे अपेक्षित असलेली भावना म्हणजे पृथ्वीच्या असंख्य घटकांपैकी आपण मात्र एक सूक्ष्म घटक असल्याची नम्र जाणीव होय. 'आदिवासींच्या साहित्याची पुस्तके करायची ठरली तर सर्व साधारणपणे ४०,००० पुस्तकांचं आदिवासी साहित्य तयार होऊ शकेल. आदिवासी वर्तमानकाळात जगतात म्हणून ते प्रामाणिक असतात. मात्र भूतकाळाचा शोध लागल्यापासून नागरीकरणातील माणसे अप्रामाणिक वागायला लागली, खोटं बोलायला लागली आहेत.'



भारतीय भाषांचे जागतिक स्तरावरील महत्व व स्थान अधोरेखित करताना ते आवर्जून सांगतात की, 'जगातील सर्वोच्च ३० भाषांमध्ये भारताच्याच १२ भाषांचा सहभाग आहे. १००० वर्षांपेक्षा जास्त इतिहास असलेल्या जगातील १८  भाषांमध्ये भारताच्याच ८ भाषा आहेत. चांगले तत्वज्ञान व साहित्य असलेल्या जगातील ७ भाषांमध्ये भारताच्याच ३ भाषा आहेत आणि जगात सर्वात जास्त गतीने वाढणारी भाषा ही हिंदी आहे.' 'सामंतशाही (Fascism), प्रत्यक्ष नेता वाईट अथवा चुकीचे काम न करता तसे काम करण्यास पोषक विचारांचा मोठा समाज निर्माण करणे (Hegemony), आणि निवडून न आलेल्यांची दंडेलशाही (Terrini of unelected) अशा धोकादायक घटकांबरोबर सत्य, अहिंसा, आणि स्त्रीत्वाने लढावे लागेल. गांधींनी इंग्रजी राजवटीच्या पुरुषी वर्चस्वाला स्त्री प्रतीकांच्या आधाराने विरोध केला. रामकृष्ण परमहंस देखील स्वतःला मनाने स्त्री मानत, शिवाचे अत्युच्च रूप म्हणून अर्धनारी नटेश्वर मानले जाते. त्यातूनच स्त्री प्रतीकांची स्थापना झाली. काही गोष्टी पुरुषी दृष्टीने समजून घ्याव्या लागतात तर काही गोष्टी समजून घेण्यासाठी स्त्री दृष्टीच आवश्यक असते' असेही ते नमूद करतात.



२०० वर्षातील संकल्पनांचा आढावा घेताना समता, स्वातंत्र्य, बंधुता,या मूल्यांसोबतच राष्ट्र - राष्ट्रवाद, व्यक्ती - व्यक्तिवाद, यांचाही ते अचूकपणे वेध घेतात. अँडम स्मिथ आणि कार्ल मार्क्स यांच्या मांडणीत जमीन अस्मानाचा फरक असला तरी व्यक्तीला स्वातंत्र्य आणि न्याय मिळावा हा त्यांच्यातील सामान हेतू ते अचूकपणे अधोरेखित करतात. आजही आपल्याकडे व्यक्तीच्या न्याय स्वातंत्र्यासाठी व हक्कांसाठी राज्यसत्तेवर नियंत्रण घालण्याची मांडणी अस्तित्वात नसून हि मांडणी होण्याची गरज आहे असेही ते सांगतात. सामान्यतः विरुद्ध टोकाच्या गोष्टींमध्ये कमालीची विधायक समानता शोधण्याची त्यांची दृष्टी म्हणूनच महत्वाची वाटते. त्यांना अभिप्रेत असलेला व्यक्तिवाद हा बेफान व्यक्तिवाद (Reckless individualism) नसून तो निर्भय व्यक्तिवाद (Fearless individualism) आहे. भविष्यात तिसरे महायुद्ध हे बेफान व्यक्तिवाद विरुद्ध निर्भय व्यक्तिवाद यामध्ये होण्याची शक्यताही ते वर्तवता.



'१८ व्य शतकापासून पुढे स्वातंत्र्य व राष्ट्र या संकल्पना एकत्रित आल्या होत्या. स्वातंत्र्य मिळवायचे म्हणजे ते एका राज्यकर्त्यांकडून दुसऱ्या राज्यकर्त्याकडे देणे असे नसून राज्यकर्त्याच्या ताब्यातील स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला बहाल करणे आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर स्वातंत्र्य आणि राष्ट्र या संकल्पना वेगळ्या झाल्या. आज मात्र स्वातंत्र्य आणि राष्ट्र या दोघांत संघर्षाची स्थिती निर्माण होत आहे. आता राष्ट्राचे स्वातंत्र्य त्या राष्ट्रात राहून टिकवता येणार नाही तर राष्ट्राबाहेर वैश्विक युती करून टिकवावे लागणार असल्याचे' डॉ. देवी सूचित करतात.



'पोस्ट ट्रुथ' बद्दल आपले मत मांडताना ते शासन आणि लोक यांच्यातील आंतरसंबंध स्पष्ट करतात, 'अगोदर शासनात आणि लोकांमध्ये एक करार असत. त्यात लोकांनी शासनाला कर देणे आणि शासनाने लोकांना सुविधा व सुरक्षा देणे असा व्यवहार होता. त्यावेळी कराच्या  आधारेच लोकांचे नागरिकत्व ठरत. पण आता हा करार बदलत आहे. उद्योपतींचं राज्य सुरु झाले तेंव्हापासून राज्यसत्ता पोखरून निघत आहे. अशा स्थितीत राज्यसत्तेकडे शक्ती, कुवतच शिल्लक नाही. सत्ता आता सरकारांकडे राहिली नसून उद्योगपतींकडे गेली आहे. भविष्यात स्वतःचा नफा, प्राप्ती वाढवण्यासाठी सरकार उद्योगपतींसाठी देखरेखीचे (Servillence) आणि माहिती पुरवठादाराचे (Information Vendering)चे काम करेल. त्यासाठीच आज शारीरिक ओळखेला डिजिटल ओळखेसोबत बंधनकारक केले जात आहे. हेच पोस्ट ट्रुथ आहे. येणाऱ्या काळात जे लोक सत्तेपासून व त्यांच्या देखरेखीपासून दूर जातील तेच सुरक्षित राहतील आणि टिकतील. जगाची वाटचाल हुकूमशाहीकडे होत असून लोकही ते स्वीकारत आहे.'



भारतातील अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोचित होत जाणारा अवकाश, वैचारिक मतभेदांप्रती असहिष्णुता आणि त्यातून झालेले कलबुर्गी, दाभोलकर, पानसरे यांच्या हत्या यांची निंदा करण्याच्या भूमिकेला समर्थन म्हणून डॉ. देवींनी स्वतःचा साहित्य अकादमी पुरस्कार परत केला. नंतर त्यांनी सुरु केलेल्या 'दक्षिणायन' अभियानाबद्दल सांगताना ते म्हणतात की, 'दक्षिणायन या वर्षाचा असा काळ असतो जेंव्हा रात्र मोठी असते आणि दिवस लहान झालेला असतो. गेली ३० वर्ष जगात उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग पडले आहेत. उत्तर हे समृद्धीचे प्रतीक मानले गेले आणि दक्षिणेला गरिबीचे प्रतीक मानले गेले. २०० वर्षात विकासाचे स्वरूप बदलून गेले व पाश्चिमात्यीकरण की पूर्वीकरण अशी मांडणी होत आली आहे. प्रत्येकाला उत्तरेला म्हणजेच सत्तेकडे (दिल्लीकडे)  जाण्याची स्वार्थी इच्छा होत आहे. म्हणूनच मग या अभियानाला 'दक्षिणायन' हे नाव दिले आहे. येणाऱ्या वर्षभरात दक्षिणायनच्या विचारांची १०० पुस्तके आणि गांधी विचारांची परिणाम सांगणारी २० पुस्तके तयार होतील. ज्याचा या अभियानाला दिशा देण्यासाठी मोठा उपयोग होईल.'



डॉ. गणेश देवींना समजून घेताना त्यांच्या कामातील प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या एवढीच मेहनत घेत सक्रियपणे सहभागी असणाऱ्या डॉ. सुरेखा देवी यांना समजून  घेतल्याशिवाय  डाॅ. गणेश देवी  यांना समजून घेण्याची प्रक्रिया पूर्ण होऊच शकणार नाही.  यांना दिलेली आयुष्यभराची अनमोल साथ-सोबत मानवी नाते संबंधांमधील एक आदर्शच म्हणावा लागेल. २०० रिसर्च पेपर, २५ PhD साठी मार्गदर्शन करणाऱ्या आणि नोबेल पारितोषिक निवड समितीवर दोनदा काम केलेल्या डॉ. सुरेखा देवी व डॉ. गणेश देवी यासर्व कामातून जगण्याच्या संदर्भातील एक वेगळे भान नव्या पिढीला नक्कीच देऊन जातात.





प्रविण सिंधू भिमा शिंदे

pravinsindhubhima@gmail.com


Published at -

https://goo.gl/aqJ7D1

http://sumbaran.com/article/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8

२३ ऑक्टोबर २०१७

सिक्रेट सुपरस्टार: ड्रीम देखणा तो बेसिक होता है

'सिक्रेट सुपरस्टार' हा प्रत्येक मुलीने आपल्या आईसोबत बघायलाच हवा असा चित्रपट आहे. तसेच मुलांनी बहिणीसोबत आणि हो मैत्रिणीसोबत बघावा असाही आहे.

आईमधील आणि मुलीमधील नात्याची एक सुंदर, हळवी आणि संवेदनशील गुंफण चित्रपटात ठिकठिकाणी पाहायला मिळते. ही आई मुलीला एक संघर्षमय परिस्थितीत जन्म तर देतेच पण तेवढ्यावरच न थांबता मुलीला स्वप्नही बघण्याचा अवकाश देते. मुलीच्या जन्मासाठी सुरू केलेला संघर्ष पुढे मुलीला दाखवलेल्या स्वप्नांच्या पूर्णत्वापर्यंत कसा होतो हा एक महत्वाचा प्रवास म्हणजे या चित्रपटाचा मुळ गाभा आहे.
(आई-नजमा, मुलगी-इनसिया म्हणजे औरत/बाई)


हा चित्रपट जीवनाचे कोणतेही न पेलवणारे तत्वज्ञान आपल्याला अजिबात सांगत नाही. परंतु तो जगताना स्वप्न पाहण्याची आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मात्र जरूर देतो. ही प्रेरणा म्हणजे सहज न लक्षात येणारी बंडखोरीची अतिसूक्ष्म बीजेच आहे. ज्यात विशेष असे काहीच वाटत नाही, परंतु जेव्हा त्या बीजाला विचारांच्या जमिनीत रुजल्यानंतर अंकुर फुटतात तेव्हा सुरू होतो सामान्य व्यक्तीचा (येथे आईचा आणि मुलीचा) असामान्य प्रवास.

यासोबतच हा चित्रपट मॉडर्न कॉलनीमध्ये राहणाऱ्या जुनाट आणि कुजक्या विचारांच्या मानसिकतेला छेद देण्याचाही प्रवास आहे. घरात होणाऱ्या हिंसाचाराचा आपल्या मुलांवर वाईट परिणाम व्हायला नको म्हणून खोटं बोलण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारी संवेदनशील आई जशी येथे दिसते, तसाच छोट्या छोट्या गोष्टींसाठी बायकोवर हात उगारणारा हिंस्र बापही यात दिसतो. यात तो आपल्या मुलावर (फक्त मुलावर, मुलीवर नाही) मारहाणीचा वाईट परिणाम होऊ नये असा दिखाऊपणा देखील करताना दिसतो.


'सिक्रेट सुपरस्टार' मध्ये प्रतीक म्हणून जरी मुस्लिम समाजाचे उदाहरण घेतले असले तरी त्यात बघायला मिळालेली परिस्थिती थोड्याफार फरकाने सर्वच समाजात आहे. मग सुरू होतो त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा आणि परिस्थितीचे उत्तर शोधणारा मुलीचा आणि तिच्या आईचा प्रवास. या प्रवासाला सुरुवात होण्याची बीजे त्या मुलीच्या जन्मापासून तर रुजायला सुरुवात होतेच, पण त्याला खरे अंकुर फुटतात ते आईने तिच्या हातात वयाच्या सहाव्या वर्षी गिटार आणून दिल्यानंतर.

स्वयंपाक बनवताना भाजीत मीठ कमी पडणे अथवा ते टाकायला विसरणे ही अगदीच सामान्य आणि फक्त सामान्य नाही तर वैश्विक सामान्य गोष्ट आहे. परंतु  तरीही या वैश्विक सामान्य गोष्टीला दिला जाणारा प्रतिसाद हा पुरुषा पुरुषांप्रमाणे बदलतो. तरीही कोणतीही व्यक्ती अधिक तणावपूर्ण वातावरणात जगत असेल तर त्या व्यक्तीच्या बाबतीत विसरण्याचे प्रमाण अधिक अनुभवायला मिळते. त्यात घरातील एखादी व्यक्ती (येथे नवरा) हिंसक असेल आणि घरातील वातावरण नेहमीच दहशतीचे असेल तर जास्तच अनुभवायला मिळते. मग हा प्रवास फक्त भाजीत मीठ टाकायला विसरणे येथपर्यंत न राहता दैनंदिन जगण्याच्या अनेक गोष्टींमध्ये दिसू लागतो. याचे अधिक योग्य विश्लेषण मनोविश्लेषक उत्तम पद्धतीने करतील. येथे मुद्दा एवढंच आहे की, घरातील छोट्या छोट्या अनियमितेंमध्ये बायकोला मारझोड करणाऱ्या व्यक्ती (येथे पुरुष) तेवढ्यावरच थांबत नाही. तर आपल्या पुढच्या पिढीच्या आयुष्याचेही नियंत्रण आणि नियमन करायला सुरुवात करते. ते कसे हे 'सिक्रेट सुपरस्टार' हा चित्रपट दर्शकाला दाखवतो.

या चित्रपटाची आणखी एक विशेष बाब म्हणजे रियालिटी शो पासून दूर राहणारा आणि पुरस्कार कार्यक्रमांना टाळणारा आमीर खान यात शक्ती कपूर या त्याच्या मुळ स्वभावाच्या अगदी विरुद्ध असणाऱ्या व्यक्तीची भुमिका साकारत आहे. त्याला खुप कालावधीनंतर अशा भुमिकेत बघणे खुपच उत्सुकतापूर्ण आहे. शक्ती कपुर कोण आहे, कसा आहे या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपण चित्रपट गृहांपर्यंत आवर्जुन जा. त्यात लक्षात घेण्याची महत्वाची गोष्ट म्हणजे शक्ती कपुरच्या व्यक्ती चित्रातून त्या पद्धतीच्या वास्तव जगातील व्यक्तीमत्वांना लगावलेली चपराक. खूप काही आव आणून जगणाऱ्यांचे समर्पक चित्रण या व्यक्तिरेखेत बघायला मिळते. पण त्यामुळे त्या व्यक्तीला फक्त पांढरं किंवा काळं अश्या दृष्टीने बघून खलनायक बनवले जात नाही. तर त्याच्यातील गुणवत्तेला आणि संवेदनशील माणसाला देखील समोर आणले जाते.


चित्रपटात आणखी दोन व्यक्तिरेखा देखील दर्शकाचे मन जिंकून घेतात. एक म्हणजे 'सिक्रेट सुपरस्टारचा (इनसियाचा) मित्र (चिंतन). हा मित्र चित्रपट संपेपर्यंत अनेक पातळ्यांवर आपली छाप सोडतो. आणि दुसरा मुलीचा छोटा भाऊ. हा छोटा भाऊ म्हणजे आई आणि मुलीच्या आयुष्यातला एक निरागस पुरुष. परंतु त्याचे ते निरागसपण टिकेल की तोही वडीलांसारखा होईल याचीही काळजी आई करत असते. ते कसं हे चित्रपट बघताना नक्की समजेलच.

म्हणूनच सामान्यातल्या सामान्य माणसाला समजेल आणि त्यांच्यातही सकारत्मक बदलाची बीजे पेरेल अशा या चित्रपटाला आवर्जून चित्रपटगृहात जाऊन बघा.
(खरंतर चित्रपटातील काही प्रसंग घेऊन त्याच्याविषयी मत व्यक्त करावेसे वाटले होते पण नंतर ते रद्द केले. कारण चित्रपटातील प्रसंग सांगुन चित्रपट पाहताना तुमच्या मनात उमटणाऱ्या स्वाभाविक प्रतिक्रियांना आणि विचारांना असे केल्याने मर्यादित केल्यासारखे होईल.)

#AamirKhan #SecretSuperstar #आमिर_खान #सिक्रेट_सुपरस्टार


  
The way My these two new friends from Hyderabad were enjoying the film with lots of curiosity and respect was really appreciable. That time I feel that while watching movie #SecretSuperstar , they and me were at the same ground of emotions and thoughts. That's why I feel respect for them.

One more thing that they are a good human who can understand the innocent feelings and thoughts of life.

This reflection is directly connected with their response to film. Means they were understanding the massage of situations narrated in film which director wants to say.

१४ ऑक्टोबर २०१७

माणसातील माणूसपणाला साद घालणारे आणि नकळतपणे जाणवणाऱ्या भावनांना देखील शब्दांकित करणाऱ्या लेखकबद्दल...

माणसातील माणूसपणाला साद घालणारे आणि  नकळतपणे जाणवणाऱ्या भावनांना देखील शब्दांकित करणारे विद्वान लेखक डॉ. आ. ह. साळुंखे (तात्या) यांना जन्मदिनाच्या खुप खुप शुभेच्छा.




डॉ. आ. ह. साळुंखे यांचे पहिले पुस्तक माझ्या ओळखीचे झाले ते 'गुलामांचा आणि गुलाम करणारांचा धर्म एक नसतो' या पुस्तकाच्या माध्यमातून. खरंतर मी काही ते पुस्तक वाचलेही नव्हते, पण माझ्या गावाकडील एक मित्राने त्या पुस्तकाचा संदर्भ दिला होता. तो संदर्भ देताने त्या मित्राने एक विशिष्ट जात (ब्राम्हण) कशी वाईट असते हे मांडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु जातीवरून ठरणाऱ्या चांगले वाईटपणावर माझा अजिबातच विश्वास नव्हता. जे काही थोडे वाचन व त्या वाचनामुळे स्वतःसोबतचा संवाद होता, त्यातून जन्माधिष्टीत चांगले वाईटपणावर माझा मुळीच विश्वास नव्हता. स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील जन्मधिष्टीत उच्चनीचतेला नाकारले होते आणि गांधींनी सर्वांना माणुसकीची शिकवण दिली होती ही पार्श्वभूमी देखील माहीत होतीच. राजेशाहीच्या काळात देखील शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात जातीवरून कुणाचीही गुणवत्ता ठरवली नव्हती. मात्र माझा हा मित्र 'बामसेफ' या जाती आधारीत राजकारण करणाऱ्या संघटनेच्या विचारांनी प्रभावित असल्याने तो असा विशिष्ट युक्तिवाद करत होता. अशापद्धतीने सुरुवातीलाच साळुंखे सरांच्या पुस्तकाचा संदर्भ खूपच नकारात्मक मांडणीची आला होता. या अनुभवाचा स्वाभाविक परिणाम माझ्यावर नकारात्मक झाला. पण साळुंखे सरांनी नेमके असे काय लिहिले आहे, ज्याचा  आधार घेऊन माझा हा मित्र जन्माने मिळणाऱ्या जाती आधारित उच्च निचतेचा समर्थक आहे हे समजून घेण्यासाठी मी त्यांची पुस्तके वाच्यायला सुरुवात केली.


डॉ. आ. ह. साळुंखे यांचे पुस्तक वाचताना सुरुवातीपासून एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येत होती, ती म्हणजे त्यांच्या लेखनात आणि एकूणच मांडणीत कोठेही आक्रस्ताळेपणाचा लवलेश देखील नव्हता. पण तरीही त्यांनी ऐतिहासिक सत्य म्हणुन हेही नोंदवले होते की त्या काळात विशिष्ट जाती समूहाच्या नेतृत्वाने जाती आधारित समाजाची विभागणी करून स्वतःला लाभ मिळवण्याचे यशस्वी प्रयत्न इतिहासात केले आहे . त्यात त्या काळी विशिष्ट जात समूहाचा उल्लेखनीय सहभाग होता. त्यांच्या याच नोंदीला घेऊन माझा बामसेफी मित्र आणि त्याच्यासारखेच इतर संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाचे मित्र सोयीस्करपणे साळुंखे सरांचा युक्तिवाद ब्राम्हण जातीविषयी द्वेष पसरवण्यासाठी करायचे. त्यामुळे मला असेही वाटायला लागले की, कोणत्याही लेखकाने त्याचे लेखन करताना त्याच्या लेखनाचा समाजात कसा वापर होतो आहे त्याविषयी सजग असायला हवे. तसेच जर कोणी या लेखनाचा वापर जातीय राजकारणासाठी करत असेल तर त्या लेखकाने त्या वापरला आक्षेप घ्यावे आणि त्यांची भूमिका अधिक सविस्तरपणे मांडावी.


मुळात माझे डॉ. साळुंखे सरांच्या लेखनाचे पुरेसे वाचन नव्हते आणि नुकतेच कोठे वाचायला सुरुवात केली होती, त्यात त्यांच्या लेखनाचा असे चुकीचे वापर अनुभवायला मिळत होते. त्यामुळे काही काळ काही पूर्वग्रह तयार झाले. मात्र जसे जसे मी त्यांचे लेखन सविस्तरपणे वाचू लागलो आणि अनेकांसोबत चर्चा देखील करू लागलो, तसे तसे त्यांच्याबद्दलचे पूर्वग्रह दूर झाले. साळुंखे सरांना समजून घेताना माझ्या एका खुप जवळच्या मित्राने ज्याचा माझ्या जडणघडणीत महत्वाचा वाट राहिला आहे, त्यानेही मोलाची माहिती दिली. त्या मित्रामुळे डॉ आ. ह. साळुंखे सरांना भेटण्याची संधी देखील मिळाली. त्या भेटीत अनेक शंकांचे समाधान झाले. पण त्यांच्या एकूणच लेखन साहित्याचे वाचन असणाऱ्या माणसाला त्याच्या मनातील बहुतांशी सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळतील एवढे नेमके आणि सकस लेखन साळुंखे सरांनी केले आहे. याची प्रचिती मला त्यांचे सर्व लेखन साहित्य वाचल्यानंतर आली.


साळुंखे सरांनी चळवळीतील कार्यकर्त्यांना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेले 'मित्रांना शत्रू करू नका' आणि 'परिवर्तन शास्त्रही आणि कलाही' या पुस्तकांनी त्यांची कार्यपद्धती समजून घ्यायला खूपच मदत केली.  अत्यंत शांत आणि संयतपणे ते आपला एक एक मुद्दा मांडतात. हे मुद्दे मांडताना ते आपल्या मताचा प्रतिवाद करू शकणाऱ्या सर्वच मतांवर आपली तर्कसंगत आणि संदर्भांनी परिपूर्ण बाजू समोर ठेवतात. या प्रत्येक संदर्भांची मांडणी करतानाच साध्या साध्या उदाहरणांमधून आपले मुद्दे चफकलपणे समजावून सांगतात. ते वाचताना अगदी सामान्य पातळीवरचे ज्ञान असलेल्या, परंतु स्वतःचे असे स्वतंत्र विचार असणाऱ्या माणसाला ते पाटतात. ही त्यांच्या मांडणीची एक महत्वाची बाजू.


साळुंखे सरांच्या लेखनाची माझ्यासाठीची सर्वात जमेची बाजू म्हणजे त्यांच्या लिखाणात आणि मांडणीत कधीही कडवटपणा, तिरस्कार, घृणा, द्वेष, शत्रुत्व, नामोहरम करणे, बदनामी करणे अशा भावनांना स्थान नसते. प्रत्येक माणसाचे माणूसपण मान्य करून त्याच्या विचारांची आणि कार्यपद्धतीची विधायक चिकित्सा करण्याची त्यांची लेखन पद्धती आहे. यात सर्वच जीवसृष्टीचे हित व्हावे हा विचार त्यांच्या केंद्रस्थानी असतो. परंतु तरीही ऐतिहासिक लेखन करताना ते समोर आलेल्या तथ्यांची योग्य दाखल घेऊन तटस्थपणाने चिकित्सा देखील करतात. यात वेगळे मत मांडणाऱ्याचे योग्य मुद्दे स्वीकारतात आणि चुकीचे मुद्दे नम्रपणाने खोडून काढतात. त्यांच्या या कामात ते कधीही व्यक्तिगत दोषारोप करत नाही. नम्रपणा हा त्यांचा स्थायीभाव असल्याने त्यांचे लेखन वाचनीय होते. तसेच त्यांना ऐकणे समृद्ध करणारे ठरते. विचारवंत, अभ्यासक, संशोधक व कार्यकर्ता म्हणून त्यांनी अनेक किचकट आणि गुंतागुंतीचे प्रश्न हाताळले आहेत. वैचारिक विश्वात त्यांच्या मांडणीला प्रचंड महत्व आहे. असे असतानाही त्यांचे सामन्यातील सामान्य माणसाशी एकरूप होऊन बोलणे, त्याची प्रेमाने विचारपूस करणे आणि अगदी त्याच्या व्यक्तिगत अडचणींविषयी हितगुज करण्याची त्यांची क्षमता एकमेवाद्वितीय आहे.
त्यांना जन्मदिनाच्या खुप खुप आरोग्यदायी आणि आनंदी शुभेच्छा.

प्रविण सिंधू

०९ मे २०१७

हुंडा आणि राष्ट्रवाद ?



हुंडा आणि राष्ट्रवाद ?

हुंडा घेणारे देणारे अथवा त्या प्रथेचे समर्थन करणारे राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रवादी ठरू शकणार का ? हुंड्या सारख्या अमानवीय प्रथेला समर्थन करणाऱ्याला आणि त्या प्रथेचा व्यक्तिगत स्वार्थासाठी आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी वापर करणाऱ्यांना अनैतिक, राष्ट्रद्वेष्ट्ये, राष्ट्रद्रोही ठरवणार का  ?


भारतीय कुटुंब संस्थेचा प्रमुख भाग म्हणून नेहमीच विवाह संस्थेकडे बघितले जाते. जगात कशा पद्धतीने कुटुंब संस्था उद्ध्वस्त होत आहे आणि आपल्याकडे ती कशी टिकून आहे याविषयी नेहमीच अभिमानाने व अनेकदा  अभिनिवेशाने, गर्वाने बोलले जाते. या सर्व चर्चेत विवाह संस्थेचा पाय काय आहे हा मूलभूत प्रश्न मात्र तेवढ्याच नियमितपणे  टाळला जातो. कारण आत्मपरीक्षणाची आणि सुधारणावादी भूमिका घेतल्याने हितसंबंध बाधित होतील अशी भीती. असे असताना देखील हुंडा घेऊन आणि देऊनही आम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळावी अशी या जमातीची अपेक्षा असते. ही अपेक्षा समाजही मनमोकळेपणाने पूर्ण करतो. असे करताना दांभिकतेच्या सर्वोच्च टोकावर बसल्याची जाणीवही संबंधितांना रहात नाही.

भारतीय परिप्रेक्षात विवाह संस्थेचा पाया काय आहे याचे उत्तर इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी संशोधनात्मक वृत्तीने  "भारतीय विवाह संस्थेचा इतिहास" या मौल्यवान ग्रंथात अनेक ऐतिहासिक संदर्भांसह दिले आहे. संपत्ती, अधिकार, वर्चस्व असा प्रवास असलेली ही व्यवस्था पुरुषी मानसिकतेचा एक अद्भुत नमुना आहे. यातून पुरुषांचे हितसंबंध जोपासताना स्त्रियांचे माणूसपण नाकारण्यालाही कुणाची हरकत उरली नाही.


नैतिकता आणि हुंडा

आज मितीस हुंडा पद्धत विवाह संस्थेचा गाभा बनली आहे. कायद्याने हुंडा घेण्यास अथवा देण्यास बंदी असली तरी सरसकटपणे हुंडा दिला आणि घेतला जातो. नैतिक आणि अनैतिक कृत्यांचा उहापोह करणारा आपला समाज (कुणी कसे कपडे घालावे ? कोणी काय खावे ? मुलामुलींनी एकत्र भेटावे कि भेटू नये, बोलावे की बोलू नये, प्रेम करावे की करू नये, किती मुले जन्माला घालावी ? अशा) अनेक विषयांवर चर्चा करतो पण हाच समाज हुंडा घेण्याला अनैतिक, अश्लील ठरवण्यात सपशेल अपयशी ठरला आहे. हे अपयश प्रयत्नांनंतर येणारे नसून प्रयत्नांअभावी आलेले आहे हेही लक्षात घ्यावे लागेल.  त्यामुळे नैतिकतेचा, शीलतेचा आग्रह हा फक्त मुखवटा तर नाही ना ? अशी रास्त शंका उपस्थित होते.

सामाजिक प्रतिष्ठा, मान्यता आणि हुंडा यांचा संबंध तपासला असता लक्षात येते की हुंडा देणार्याला आणि घेणाऱ्याला आपल्या समाजात प्रतिष्ठेचे आणि मानाचे स्थान दिले जाते. त्यातूनच मग मी माझ्या मुलाच्या लग्नात एवढा हुंडा घेतला आणि मुलीच्या लग्नात एवढा हुंडा दिला असे फुशारकीने सांगितले जाते. महिलांमध्येही हा विषय खूपच प्रतिष्ठेचा मानला जातो व त्यानुसार चर्चिला जातो. या चर्चा करत असताना स्त्रियांच्यातील पुरुषीपणाचे दर्शन घडत असते. अशा प्रकारच्या उदाहरणांतून हे स्पष्टपणे दिसते की पुरुषत्व हे फक्त पुरुषांची मक्तेदारी राहिली नसून त्यात महिलाही आघाडीवर येण्याच्या प्रयत्नात आहेत. श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भेद करताना  मुलाची बाजू श्रेष्ठ आणि  मुलीची बाजू कनिष्ठ आहे हे दाखवण्याची चढाओढ हे काही समानतेचे लक्षण नाही. श्रेष्ठ असणाऱ्याला कनिष्ठ बनवणे आणि कनिष्ठ असणाऱ्याला श्रेष्ठ बनवणे हा काही समानतेचा मार्ग निश्चितच नाही. ही शंका खोटी ठरण्यासाठी समाज म्हणून आपण सर्वांनी हे अपयश मान्य करत हुंड्याच्या विरोधी  एकत्रितपणे माणुसकीच्या दृष्टिकोनातून काम करणे काळाची गरज बनली आहे.

शीतल वायाळ या तरुणीच्या आत्महत्येनंतर हुंड्याचा विषय पुन्हा एकदा माध्यमांच्या बातमीचा विषय ठरला आहे. हुंड्याने आत्महत्या होते की समाजमान्य रूढी परंपरांद्वारे खून होतो ? हे ठरवायला हवे. शीतलचा विषय चर्चा विश्वात येण्यामागे शीतलने जीवनप्रवास संपवण्या अगोदर चिट्टीद्वारे व्यक्त केलेले मत आहे. नाहीतर आपल्या आजूबाजूला हुंडा आणि तत्सम रूढींनी घेतलेल्या बळींची संख्या काही कमी नाही. हे बळी लग्ना अगोदरचे आहेत तसेच लग्नानंतरचे देखील आहेत. तरीही हे बळी चर्चेत न येण्यामागे त्यांची न झालेली अभिव्यक्ती हेच असते. हुंडा बळीच्या अमानवीय घटना समाजाने संवेदनशीलपणे समजून घ्याव्यात आणि तसे होऊ नये म्हणून सक्रिय प्रयत्न करणे गरजेचे असते, या घटना चर्चेत येणे यासाठीच महत्वाचे आहे.

सक्रिय प्रयत्न काय असावे याचे चांगले उदाहरण पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे अनुभवायला मिळाले. तेथे पुण्यातील आणि पुण्याबाहेरील अनेक तरुण तरुणींनी एकत्र येऊन या हुंडा पद्धतीला स्वतःपासून संपवण्याचा निर्धार केला. हा निर्धार या तरुणांनी फक्त बोलूनच दाखवला नाही, तर १०० रुपयांच्या मुद्रांकावर लिहून दिला आणि तो निर्धार पाळण्यात आमच्याकडून कसूर झाली तर शासनाने आमच्यावर कारवाई करावी असे आवाहनही केले. कायदा करून अंमलबजावणी न करणाऱ्या शासनाला आणि प्रशासनाला हे पाऊल चपराक लगावणारे ठरले. संविधानाची शपथ घेऊन संविधानिक जबाबदारीच्या पदांवर बसणाऱ्या अधिकाऱ्यांनी कायद्याची अंमलबजावणी करणे हे अपेक्षित असते. मात्र वास्तविक हेच मंत्री, अधिकारी हुंडा बंदीचा कायदा धाब्यावर बसवून संपत्तीचे ओंगळ प्रदर्शन करत हुंडा घेत आहेत. या सर्वांची हुंड्याचे नवनवीन अविष्कार शोधण्यात सर्जनात बघितली तर अवाक व्हायला होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत म्हणूनच महात्मा फुले वाड्यातील परिवर्तनवादी आणि कृतिशील तरुणांकडून स्वतःच्या आयुष्यात बदल घडवणे आणि त्या बदलांबद्दल कटिबद्धता व्यक्त करणे अधिक महत्वाचे ठरते.



मराठा क्रांती मोर्चा आणि हुंडा -



काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात लाखांच्या संख्येत बाहेर पडणारे मोर्चे आणि त्या मोर्च्याचे नेतृत्व करणारे बोलेरो आणि स्कॉर्पियो धारक नेते आरक्षणाची मागणी करताना आपण सर्वांनीच पाहिले. मोर्च्याच्या लाखांच्या संख्येत अनेक लाखांच्या आणि कोटीच्या गाड्या बघताना बघणार्यांना नेत्यांच्या आर्थिक मागासलेपणाची पुरेशी स्पष्ट जाणीव झाली असावी आणि म्हणूनच हा क्रांती मोर्चा सर्वसामान्यांचा एकही प्रश्न मार्गी न लावता अस्तित्व हरवून बसला. असे होण्याला मोर्चामागील राजकीय अजेंडा आणि सरकारची विधायक प्रश्न न सोडवण्याची मनोवृत्ती जबाबदार ठरली. शांततापूर्ण मार्गाने आपली मागणी मांडणे याबाबत या मोर्च्यात सहभागींचे आणि नेतृत्वाचे अभिनंदन व्हायला हवे होते आणि ते झालेही. मोर्चात सहभागी झालेल्या स्त्रियांची संख्या आणि सहभाग हा देखील दखल घ्यायला लावणारा आणि महत्वाचा बदल सुचवणारा होता. स्त्रीवर अत्याचार झाला तर स्त्रिया एवढ्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरतात हे दृश्य भविष्यात स्त्रियांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आशावाद निर्माण करणारे होते. परंतु त्या मोर्च्यात लाखांच्या संख्येत बाहेर पडलेल्या स्त्रिया आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असणारे पुरुष आज हुंडा हा स्त्रियांचा गंभीर प्रश्न आहे हे वास्तव स्वीकारणार की नाही ? मराठा क्रांती मोर्च्याची हुंड्याच्या माध्यमातून होणारे स्त्रीचे शोषण रोखण्याबाबत काय भूमिका आहे ? अन्याय आणि अत्याचाराला जातीच्या चष्म्यातून बघण्याची वृत्ती चुकीची असून स्वतःपासून हुंडा बंदीची भूमिका घेण्याचे धाडस हा मोर्चा दाखवणार का ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उभे राहत आहे. तरुण पिठी या प्रश्नांचा तटस्थपणे विचार करून राजकीय नेत्यांची व्यक्तिगत स्वार्थासाठीची आंदोलने आणि समाजपरिवर्तनाची आंदोलने यात नक्कीच फरक करू शकतील यात शंका नाही.


राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्रवाद आणि हुंडा



भक्ती ही राष्ट्राची असो, व्यक्तीची असो वा विचाराची असो त्यात तर्काला आणि मुद्द्यांना अजिबातच महत्व नसते. पण किमान प्रेमात काळजी, निस्वार्थ वृत्ती आणि आपलेपणा असणे अपेक्षित असते. तसेच वाद म्हटले की विचार, मतभिन्नता, तर्क, युक्तिवाद हे येतात.


आज राष्ट्रावर प्रेम करणे, राष्ट्राप्रती निष्ठा व्यक्त करणे म्हणजे राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्राचा नकाशा अशा प्रतिकांवर प्रेम करणे, निष्ठा ठेवणे एवढ्यावर मर्यादित झाला आहे. आपल्या राष्ट्रातील माणसांचे माणूसपण मान्य करत ते माणूसपण टिकवण्यासाठी भूमिका घेणे हाच राष्ट्रप्रेम, राष्ट्रवादाचा खरा अर्थ या स्वार्थी, हेतुपुरस्कृत नवराष्ट्रवादात दिसत नाही. त्या राष्ट्रात राहणाऱ्या माणसांना आपले मानत त्यांच्यावर प्रेम करणे ही उदात्त भावना या मूळ संकल्पनांच्या मागे असताना हुंडा घेणारे देणारे अथवा त्या प्रथेचे समर्थन करणारे राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रवादी ठरू शकणार का ? हा प्रश्न विचारण्याची आवश्यकता पडत आहे. राजकारणासाठी भ्रामक नवराष्ट्रवादाला जन्म घालणारे राजकारणी आपल्या गुंड  प्रवृत्तीच्या लोकांना फक्त राजकीय स्वार्थासाठी देशभक्त आणि राष्टवादी ठरवतात तेव्हा सद्सद्विवेकी माणसाने हुंड्या सारख्या अमानवीय प्रथेला समर्थन करणाऱ्याला आणि त्या प्रथेचा व्यक्तिगत स्वार्थासाठी आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी वापर करणाऱ्यांना अनैतिक, राष्ट्रद्वेष्ट्ये, राष्ट्रद्रोही ठरवणार का  ?

२६ एप्रिल २०१७

विचारांचा वेध घेणारे संमेलन ...

 

(जानेवारी २०१७ मध्ये पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून वृत्तवेध हा अंक काढायचा होता. त्यासाठी "विचारवेध संमेलने" हा विषय निवडला होता. त्या अंकात लिहिलेले हे संपादकीय ...)


ही पिढी इतिहासापासून खूपच अंतर पडल्याने ऐतिहासिक वास्तवापासून दुरावलेली आहे. आज माहितीत आहे तेवढाच भाग म्हणजे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य ही काहीशी मानसिक अवस्था त्यांच्यात दिसू लागली आहे.


विचारवेध संमेलनांची सुरुवात ही बाबरी मस्जिद विद्ध्वंसानंतर वैचारिक मंथनासाठी झाली. भूमिका होती समाजात वैचारिक जडणघडणीला एक दिशा देणे. या दिशेत माणसाचे माणूसपण हा केंद्रबिंदू होता. ते माणूसपण वैश्विक आणि नैसर्गिक आहे हा संदेश सर्व समाज घटकांपर्यंत पोहचवण्याचे काम विचारवेध संमेलनांनी संपूर्ण शक्तीनिशी केले. मध्यंतरीच्या काळात या प्रबोधन प्रक्रियेत काहीसा खंड पडला.

दरम्यानच्या काळात एका नव्या पिढीने समाजात प्रवेश केला होता आणि या पिढीवर जागतिकारणाचा मोठा प्रभाव होता. ही पिढी इतिहासापासून खूपच अंतर पडल्याने ऐतिहासिक वास्तवापासून दुरावलेली आहे. आज माहितीत आहे तेवढाच भाग म्हणजे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य ही काहीशी मानसिक अवस्था त्यांच्यात दिसू लागली आहे. त्यावर उपाय म्हणून पूर्वग्रहांनी चिकित्सा, टीका करणे परिपूर्ण उत्तर नाही. तर त्यासाठी या पिढीला अनभिज्ञ असलेले संदर्भ माहिती करून देत नव्या स्वरूपात, तरुणांना समजेल अशा भाषेत मांडणे गरजेचे आहे. हीच भूमिका विचारवेध संमेलनांनी घेतलेली दिसून येते.

जागतिकीकरणा आधीचा काळ आणि नंतरचा काळ यात मोठा बदल झाला आहे. पूर्वीच्या काली जगण्याला असलेला वेग, सामाजिक दबाव, जगण्याबद्दलच्या अपेक्षा इत्यादी अनेक बाबींचे स्वरूप आणि तीव्रता बदलल्या आहे. हा बदल टिपत प्रबोधनाची दिशा आणि धोरणे  ठरवण्याचे काम अनेक सामाजिक चळवळींना करण्यात अपयश आले आहे. त्यातूनच तरुणाईचा सहभाग कमी कमी होत आहे.

परिवर्तनवादी चळवळींनी बदल स्विकारण्याच्या भूमिकेचा वारंवार उच्चार केलेला आहे. तरीही आधुनिक   तंत्रज्ञान आणि कामाच्या पद्धती स्वीकारताना त्यांनी पुरेशी हालचाल केलेली दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर विचारवेधने प्रबोधनासाठी सुरु केलेला नवं माध्यमांचा वापर दिशादर्शक आहे. यु ट्यूब चा वापर, निबंध, नाट्य, चित्रकला, चित्रपट अशा विविध माध्यमांचा कुशलतेने उपयोग हे यावेळच्या विचारवेध संमेलनांचे आकर्षण होते. या संमेलनांमधील तरुणांचा सहभाग त्यामुळेच लक्षात येणारा होता.

संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्ये येथे लक्षात घेण्यासारखे आहे. हे विचारपीठ फक्त व्यापक वैचारिक प्रबोधनाचे काम करणार असून   कोणत्याही थेट संघर्षात्मक अथवा रचनात्मक कामात सहभागी होणार नाही. या विचारपीठावरील विचार, कल्पना यांच्या घुसळणीतून प्रेरणा घेऊन जर कुणाला कोणतेही संघर्षात्मक अथवा रचनात्मक काम करावेसे वाटले तर ते व्यक्तिगत पातळीवर अशीकामे करतील.

विचारवेधच्या आयोजकांनी स्वीकारलेले धोरण योग्य की अयोग्य यावर चर्चा आणि मतभेद होऊनही ही भूमिका स्पष्टपणे एक धोरणात्मक निर्णय घेते हे स्वागतार्ह्य आहे. यातून कोणता संघर्षात्मक अथवा रचनात्मक कार्यक्रम हाती घ्यायचा हा वाद करत व्यापक प्रबोधनाच्या कामाला खीळ बसू न देण्याचा हेतू निश्चितच साध्य होईल.

माणूस म्हणून जगले पाहिजे …

From Internet


(ऑक्टोबर २०१६ मध्ये पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून वृत्तवेध हा अंक काढायचा होता. त्यासाठी "मराठा क्रांती मोर्चा आणि ऍट्रॉसिटी" हा विषय निवडला होता. त्या अंकात लिहिलेले हे संपादकीय ... )



आजच्या तरुण पिढीने पक्ष, संघटनेच्या, जातीच्या, धर्माच्या आणि एकाच विचारसरणीच्या दावणीला न बांधून घेता मुक्तपणे माणूस म्हणून जगले पाहिजे.


भारत या आपल्या लोकशाही देशाला जातीय अत्याचाराचा इतिहास खूप मोठा आहे. अगदी भारत हे राष्ट्र म्हणून अस्तित्वात नव्हते आणि ते राष्ट्र  म्हणून उदयास येईल की नाही त्याबद्दल कुणाला कल्पनादेखील नव्हती, तेव्हापासून हा जातीय अत्याचार स्पष्टपणे दिसून येतो. म्हणूनच भारताची संस्कृती किती महान आहे याविषयी बोलताना प्रत्येक भारतीयाने काही क्षण थोडेसे थांबून आत्मपरीक्षण करून आपल्या या महान संस्कृतीतील माणसाचे माणूसपण नाकारणार्‍या मानसिकतेचा पुनर्विचार करायला हवा. जर आपण या विकृत प्रवृत्तीबद्दल स्वतःला आणि आपल्या पूर्वजांना प्रश्‍न करू शकलो नाही, तर मग माणूस म्हणून आपलादेखील विकास अपूर्णच ठरेल.

         
भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात म्हणूनच समांतर पातळीवर दुसरी एक सामाजिक स्वातंत्र्याची लढाई सुरू होती. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर या लढाईला दिशा देत होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तरी ही जातीय मानसिकता आणि जातीय विभागणी जावी यासाठी संविधानाची निर्मिती झाली. त्यामुळेच भारताचा इतिहास लक्षात घेता वर्तमानातील आपली वाटचाल आणि भविष्याचा वेध या पातळीवर डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वात संविधान सभेने आणि संपूर्ण देशाने हे संविधान स्वतःप्रत अंगीकृत आणि अधिनियमात केले आणि तोच क्षण होता आपला माणूसपणाकडे जाण्याच्या संकल्पाचा. 26 जानेवारी 1950 रोजीपासून सुरू झालेला हा संविधान अंमलबजावणीचा प्रवास 2016 मध्ये पोहचला आहे तरी संविधानाच्या कलम 17 अन्वये नष्ट केलेली अस्पृश्यता आणि जातीय मानसिकता गेलेली नाही. कलम 13 ते 32 या कलमां मधील मूलभूत अधिकारांचेदेखील मोठ्या प्रमाणात उल्लंघन सुरू आहे. खरंतर एवढी मोठी जातिभेदाची पार्श्‍वभूमी असताना जातीय मानसिकता सहजच जाईल ही भोळी आशादेखील कुणाची नव्हती; पण किमान संविधानाची अंमलबजावणी करणारे लोकनियुक्त सरकार यावर काम करेल असे अपेक्षित होते. या धर्तीवरच मग 1955 साली नागरी हक्क संरक्षण कायदा आला, परंतु तो कायदा जातीय अत्याचारास प्रतिबंध करण्यास अपुरा ठरला. त्यानंतरही देशात जातिभेद, अस्पृश्यता यामुळे दलितांचे सामूहिक खून, बलात्कार झाले.

         
बिहारमधील रणवीर सेना या सवर्ण समाजाच्या संघटनेकडून झालेले हत्याकांड असो की पूर्वीचे मद्रास आणि आत्ताच्या चेन्नईमधील किल्व्हनमानी येथील हत्याकांड, ते अगदी आपल्याकडे नामांतराच्या वेळी झालेले दलित अत्याचार हे सर्वच प्रातिनिधिक उदाहरणे परिस्थिती पुरेशी स्पष्ट करत गेले. ही उदाहरणे म्हणजे विशाल हिमखंडाचे वरती आलेले फक्त टोक होते. त्याच्या तळाला खूप जास्त अत्याचाराच्या घटना होत होत्या; ज्या कधी चर्चेचा विषय होऊ शकल्या नाही. त्यातूनच मग या अत्याचाराला तोंड देण्यासाठी समाजातील विविध स्तरांतून आवाज आला आणि 1989 रोजी आपल्या संसदेने अनुसूचित जाती आणि जनजाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989 पारित केला आणि अत्याचाराची स्पष्टता आणत एक पाउल पुढे टाकले. हा कायदा आला म्हणजे प्रश्‍न सुटले असे यावेळीही झाले नाही; परंतु कायद्यातील पुरेशा स्पष्ट तरतुदींमुळे जातीय मानसिकतेवर मोठा परिणाम झालेला दिसला. मात्र, आजही अत्याचाराच्या घटना घडणे बंद झालेले नाही. या कायद्यानंतरही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात खैरलांजी, सोनई, जवखेडा, खर्डा ही व अशी अनेक प्रकरणे झालीच. कारण कायद्यासोबतच समाजमन घडवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्नही तेवढेच महत्त्वाचे असतात. ते प्रयत्न सामाजिक संघटनांकडून होत होते; परंतु त्या प्रयत्नांची स्वतःची मर्यादा होती.

या मर्यादेत सुरु असणारे हे काम एकीकडे सुरु असतानाच राजकीय पोळ्या भाजत सत्तेपर्यंत पोहोचण्याच्या हव्यासाने परत एकदा जातीला उजाळा देण्याचे काम सुरु केले.

         
समाजमन घडवण्याचे जाणीवपुर्वक प्रयत्न राजकीय क्षेत्रात होणे देखील तेवढेच महत्वाचे होते. पण राजकीय गणिते जुळवताना आणि सत्ता प्राप्तीच्या हव्यासात पुन्हा एकदा सामाजिक परिर्वतनाची ही प्रक्रिया मागे पडत सत्ता संघर्ष पुढे आला. डॉ आंबेडकर यांनीही वंचित घटकाला राज्यकर्ती जमत व्हा हे सांगितले, परंतु डॉ आंबेडकर यांच्यासाठी सत्ता हे समाज परिवर्तनाच्या वाटचालीतील साद्ध्य नसून साधन होते. म्हणूनच तर त्यांनी हिंदू कोड बिल या महिलांच्या जगण्याला माणूसपण बहाल करणार्‍या कायद्यासाठी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. आज मात्र बरोबर या विरोधी स्थिती झाली आहे. अनेक समाजोपयोगी कायदे आणि धोरणात्मक भूमिका पद जाईल, सत्ता जाईल या भीतीने घेतले जात नाही. सर्व लक्ष फक्त त्या साधनातच अडकून पडले असल्याचे लक्षात येते. त्यातूनच मग जगण्याची हमी आणि सुरक्षितता बहाल करणारे कायदे रद्द करा अशा मागण्या येत आहे तर दुसरीकडे आपल्या समाजात आजही दलित महिला सरपंचाला झेंडावंदनापासून रोखले जाते हेच आपल्या समाजाचे जात वास्तव स्पष्ट करते. वास्तविक कलम 46 नुसार अस्पृश्यता दूर करणे व मानवी हक्क देणे ही शासनाची जबाबदारी आहे. याच धर्तीवर मग ऍट्रॉसिटी कायदा आला. सध्या मराठा मोर्च्यामध्ये ऍट्रॉसिटी कायदा बदल हा मुख्य मागण्यांसोबत येणारा विषय आहे. परंतु बलात्कारामागील मानसिक आणि समाजशास्त्रीय कारणांची चिकित्सा न करता मोर्च्याचा रोख इतर राजकीय विषयांकडे वळवणे हा प्रस्थापित राजकीय मंडळींचा हेतू मराठा तरुण हाणून पाडतात की नाही त्यावरच या मोर्चाचे भविष्य ठरेल. अन्यथा हाही एक इव्हेंटच ठरेल .

         
एकीकडे ऍट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराचा सूर काढला जात असताना, तो गैरवापर नेमका काय, कोठे आणि किती याबाबत काहीच माहिती दिली जात नाही. लाखोंच्या मोर्च्यात किती लोकांनी ऍट्रॉसिटी कायद्याविषयी मोर्च्यात सहभागी होण्याअगोदर विचार केला होता हा देखील संशोधनाचा विषय आहे. अनेकांना कायदा काय आहे, कशासाठी आहे, तो कायदा तयार होण्यामागे काय भूमिका आहे हेच माहित नसेल तर ऍट्रॉसिटी हा विषय एवढ्या मोठ्या समूहाच्या मागण्यांमधील मुद्दा कसा होईल हा साधा विचार मोर्चेकर्यांनी करणे गरजेचे आहे.


         
जबाबदार शासन म्हणून याविषयी वास्तववादी श्‍वेतपत्रिका काढणे अत्यावश्यक असताना शासनही बोटचेपी आणि वेळखाऊ भूमिका घेत आहे. ह्या कायद्यात हे स्पष्टपणे नमूद आहे की कायद्याची योग्य अंमलबजावणी करण्याची सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनाची आहे. मग जर कुणी कायद्याच्या गैरउपयोगाचा दावा करत असेल तर तो अर्थात आकडेवारीनिशी आणि उदाहरणांसह शासनाकडे केला पाहिजे. शासनाने देखील यावर तात्काळ भूमिका घ्यायला हवी. अशास्थितीत शासनाची भूमिका खूपच साशंक आहे. मुख्यमंत्री स्वतः म्हणतात की ऍट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग होत असेल तर त्यावर विचार करायला हवा पण हे म्हणताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडेही काहीच आकडेवारी आणि तथ्य नसावे हे सरकार पातळीवरील गांभीर्य स्पष्ट करते. आज खैरलांजी, सोनई, खर्डा यासारख्या हत्याकांडांमध्ये किती न्याय मिळाला? या प्रश्‍नाच्या प्रामाणिक उत्तरामध्येच आजच्या राजकीय आणि सामाजिक गोंधळाचे समाधान आहे. यासाठीच आजच्या तरुण पिढीने पक्ष, संघटनेच्या, जातीच्या, धर्माच्या आणि एकाच विचारसरणीच्या दावणीला न बांधून घेता मुक्तपणे माणूस म्हणून जगले पाहिजे.

२२ मार्च २०१७

चिकित्सक बुद्धीने विचार करण्याची दृष्टी काळाच्या पडद्याआड


राजकीय, आर्थिक वा सामाजिक प्रश्नांचा विचार चिकित्सक बुद्धीने करण्याची दृष्टी महत्वाची आहे. राष्ट्रवाद, राष्ट्रीय चळवळ यांचा विचारही भावनात्मक दृष्टीने न करता, जो पुरावा उपलब्ध होईल त्याच्या आधारे मोकळ्या मनाने करावा...


आज सकाळी कॉलेजला जाण्यासाठी निघालो तेव्हा माझ्या एका मित्राचा  फोन आला आणि गोविंद तळवलकर कोण ? असे विचारत होता. आपल्याला विद्यापीठात भेटले तेच का ते ? असे विचारत होता. पण विद्यापीठात भेटले ते वेगळे, तळवलकर नाही असे मी त्याला सांगितले. त्यावेळी त्याने असेही विचारले की "सत्तांतर" हे त्यांनीच लिहिलेले आहे ना ? पण माझ्या माहितीत आणि वाचनात जे "सत्तांतर" आले होते ते होते व्यंकटेश माडगूळकरांचे. त्यामुळे मी त्या पुस्तकाचे लेखक ते नाही असेच सांगितले आणि आमचा संवाद थांबला. जेव्हा मी कॉलेजमध्ये आलो तेव्हा समजले की तळवलकरांचा मृत्यू झाला. त्यावेळी मराठी वृत्तपत्राच्या विश्वातील अग्रलेखासाठी प्रसिद्ध असलेला संपादक कालवश झाला एवढी मर्यादित भावना आली.

खर तर या क्षणा अगोदर मी साधना मासिकातून त्यांचे काही लेख वाचले होते. तसेच वैचारिक वाचनाची आवड असल्याने तशी पुस्तके चालण्याची सवयही होती. त्यातूनच साधनाच्या पुस्तक स्टॉल वर त्यांचे वैचारिक व्यासपीठे हे पुस्तक फक्त चाळले होते, पण आर्थिक अडचणीमुळे फार पुस्तके विकत घेणे शक्य नसायचे. त्यामुळे ते विकत घेऊन वाचणे राहून गेले होते. त्यानंतर पुढे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या (रानडे इन्स्टिटयूट) पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. "संपादन" हा विषय शिकवणाऱ्या प्रा. सुभाष नाईक सरांनी अग्रलेखाच्या अनुषंगाने गोविंद तळवलकरांचा अनेकदा उल्लेख केला. अग्रलेखाची भाषा, विषय निवड, मांडणीतील व्यासंग, परखडपणा अशा अनेक वैशिष्ट्यांबाबत तळवलकरांचे उदाहरण ते नेहमी द्यायचे. मराठी पत्रकारितेतील या पत्रकाराची त्यापुढील माहिती मात्र घेण्याची प्रक्रिया पुढे जाऊ शकली नाही. पण आज त्यांच्या भौतिक पातळीवर नसल्याच्या भावनेने त्यांच्याविषयी जाणून घेण्याची प्रखरतेने इच्छा झाली. तसेच पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या या गाजलेल्या संपादकाविषयी अगोदर जरी माहिती घेतली नाही, तरी किमान त्यांच्या जाण्यानंतर त्यांना समजून घ्यावे असेही वाटले. म्हणूनच गूगलवर त्यांच्याविषयी शोध घेतला. या शोधात पुढे आलेल्या बातम्या आणि लेख वाचताना एक वेगळेपण प्रकर्षाने जाणवले ते म्हणजे त्यांच्या मृत्यूची बातमी ही बहुतांशी सर्वच मराठी वृत्तपत्रात (ऑनलाइन) आलेली होती. मराठी वृत्तपत्रांच्या टोकाच्या स्पर्धेच्या काळात दुसऱ्या एखाद्या वर्तमान पत्राच्या संपादकाच्या मृत्यूची बातमी देणे अनेकदा टाळले जाते. पण त्या गृहीतकाला छेद देऊन त्या घटनेची दखल त्यांच्या कामाच्या विस्तृत तपशिलासह घेतली गेली. यातून त्यांची कामाची ताकद लक्षात आली.


दुसरी नोंदवावी अशी एक बाब म्हणजे त्यांनी लिहिलेल्या कोणत्याही पुस्तकाचे वाचन झाले नव्हते. त्यात सकाळी मित्राने "सत्तांतर त्यांनीच लिहिले आहे का ? अशी विचारणा केल्याने त्यांच्या पुस्तकांचीही माहिती घेतली. "सत्तांतर" या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाची काही मोजकी पाने बुकगंगा या वेबसाईटवर वाचायला मिळाली. यात सुरुवातीला एक निवेदन आहे. त्यात त्यांनी तो ग्रंथ मानवेंद्रनाथ रॉय यांच्या स्मृतीस अर्पण करण्याचे कारण सांगितले आहे. त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांपासून त्यांनी मानवेंद्रनाथ रॉय यांच्या साहित्याचे आणि विचाराचे आकर्षित होऊन वाचन केले. त्या वाचनामुळे राजकीय, आर्थिक वा सामाजिक प्रश्नांचा विचार चिकित्सक बुद्धीने करण्याची दृष्टी त्यांना प्राप्त झाली. राष्ट्रवाद, राष्ट्रीय चळवळ यांचा विचारही भावनात्मक दृष्टीने न करता, जो पुरावा उपलब्ध होईल त्याच्या आधारे मोकळ्या मनाने करावा असे म्हटले.  ही वृत्ती त्यांना मानवेंद्रनाथ रॉय यांच्याच लेखनातून मिळाल्याचे ते नमूद करतात. यात चिकित्सेच्या दृष्टिकोनात खूप महत्वाचे मूल्य ते सांगून जातात.

 गोविंद तळवलकर यांना आदरांजली देण्यासाठी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाने आदरांजली सभेचे नियोजन केले होते. त्यात अनेक मान्यवर पत्रकार सहभागी झाले होते. त्या सर्वांनीच त्यांच्या स्मरणातील तळवलकरांच्या आठवणी व्यक्त केल्या. त्या सर्वच आठवणी पुस्तका व्यतिरिक्तचे तळवलकर उलगडून सांगणाऱ्या होत्या.

त्यांच्या जाण्याला आदरांजली म्हणून त्यांच्या चिकित्सक बुद्धीने विचार करण्याची दृष्टी संपादन करण्याचा आणि त्यांना आणखी समजून घेण्याचा संकल्प करून मी त्यांना आदरांजली अर्पण करतो.

२१ मार्च २०१७

बोलके मोर्चे निघण्याची गरज ...




मराठा मोर्च्यांच्या निमित्ताने सध्या महाराष्ट्राचा सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिघ अ‍ॅट्रॉसिटीच्या चर्चेने गाजत आहे. त्याअनुषंगाने जेष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांची ’'माध्यम’'साठी घेतलेल्या मुलाखतीचे शब्दांकन ...


अ‍ॅट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्याच्या गैरवापराची चर्चा सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात छेडण्यात आली आहे. या सर्व चर्चेत एक महत्त्वाचा मुद्दाही समोर आला होता, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरउपयोग हा दलितांकडून होत नसून मराठ्यांमधीलच परस्परविरोधी दोन गटांकडून होतो, असं मत राज्यातील अनेक मराठा नेत्यांनी नोंदविलं आहे. त्यात शरद पवारानींही सूर मिसळला होता.  दलित समाजातील तरूणांना आमिष दाखवून विरोधकांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्यास सांगितले जाते.

अ‍ॅट्रॉसिटीचा दुरुपयोग दलित करीत नसून मराठा राजकारणीच करत आहेत. मुळात एक बाब इथं लक्षात घेण्याची गरज आहे, ती म्हणजे सदर कायदा रद्द करण्याचा अधिकार कोणत्याच राज्य सरकारला नाही. त्यामुळं किमान राज्य शासनाने तो सक्षम आणि निरपेक्ष पद्धतीने राबविण्याचा प्रयत्न करायला हवा. जर कायद्याचा गैरवापर होत असेल तर त्याचा एकच अर्थ निघू शकतो तो म्हणजे इथली यंत्रणा तो कायदा राबवायला सक्षम नाही.  या विषयासंदर्भात मी शरद पवार यांच्याशी जो संवाद साधला, त्यावेळी मी त्यांना त्यांनी माध्यमातून मांडलेली सदर भूमिका मराठा मोर्च्याच्या समोर जाऊन मांडावी असं सूचविलं होतं. पण शरद पवारांनी तसं काही केलं नाही. कारण एखाद्या गोष्टीचं पिल्लू सोडून, त्याभोवती फिरत राजकारण पाहत, तोंडाची गुळणी धरूण बसण्याची पवारांची खोड जुनीच आहे. त्यामुळं ते त्यांच्या फायद्याचं जिकडं असेल तिकडे जात असतात. जर शरद पवारांना खरंच हा वाद वाढू द्यायचा नव्हता तर त्यांनी खुलेपणाने भूमिका घेणं गरजेचं होतं.
         
माझ्या मते, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर हा दलितांमुळं होत नसून, कायद्याच्या फालतू अंमलबजावणीमुळे होतोय. पोलिसांना पैसे हवे असतात, त्यामुळं दोष नसणार्‍या माणसाला अटक केली जाते आणि त्याच्याकडून आणि गुन्हा नोंदविणार्‍यांकडूनही पैसे उकळले जातात आणि नंतर सोडून देतात.
         
कोणत्याही मानवी समाजात परिवर्तन हे अपरिहार्य आहे. सामंतशाहीनंतर भांडवलशाही येणार याविषयी कोणीच्याही मनात शंका असता कामा नये. सामंतशाहीला पहिला धक्का भांडवलशाहीच देणार हे नाकारता येणार नाही. जागतिकीकरणाने तर तो दिलाच आहे. आत्ता मराठा समाजाचा जो उद्रेक दिसतोय ते त्याचेच लक्षण आहे.
         
एकीकडे अण्णा हजारे यांचं जे गाव स्वयंपूर्ण करण्याचे स्वप्न आहे ते अर्थातच सांमतशाही टिकविण्याचे त्यांचे शेवटचे अस्त्र आहे. प्रेमसंबंध कौटुंबिक विरोधामुळे अयशस्वी झाल्याने मुली आत्महत्या करतात, अनेक घरचेच त्यांची हत्या करतात किंवा आजही करतात. तर दुसरीकडे आमचा शिकलेला तरुण - तरूणी मोठ्या प्रमाणात आंतरजातीय विवाह करीत आहेत. त्यामुळं जातीसंस्था शेवटच्या घटका मोजत आहे.
          
मी चाळीस वर्षे शिक्षण क्षेत्रात होतो. चाळीस वर्षांपूर्वी जी खेड्यातील गरीबाची मुलगी होती, ती आज तशी नाही. एका अर्थाने त्या मुलींमध्ये जैविकदृष्टीने फरक जाणवतोय. या मुला - मुलींची साधी मागणी आहे कि, आम्हांला आमच्या पसंतीचा जीवनसाथी पाहिजे. तो जातीतला असला तरी चालेल, जातीबाहेरचा असला तरी चालेल. त्यांना स्वतःचे आत्मभान आलेले आहे आणि त्यांना त्यांचे भविष्य दिसतंय. अशा परिस्थितीमध्ये जर त्यांनी आवडीचा जोडीदार निवडण्याची मागणी केली तर त्यात चूक काय आहे ? समाजाने ते कितीही दाबले तरी आता त्यांच्या भावनानां आवर घालणं अशक्य आहे. हा बदल आता अटळ आहे. त्यांना विरोध केला तर अनेक मुलं -  मुली पळून जातील. तुम्ही त्यांच्या हत्या केल्या तरी त्यातून काहीही होणार नाही. आणि त्यातल्या त्यात जातीव्यवस्था तर टिकून राहणारच नाही. उलट तुमची मुलगी फक्त जाईल, यापलीकडे काहीही होणार नाही. पण ही प्रकि‘या आता थांबणे नाही. कारण भांडवलशाहीने जातीत वर्ग तयार केले आहेत. या वर्गातील मुलामुलींचे लग्न होणे अटळ आहे, हे कुणीही थांबवू शकणार नाही.
          
बाबासाहेब आंबेडकर यांनी 1936 साली लिहिलेल्या ’अ‍ॅनहिलेशन ऑफ कास्ट’ या ग्रंथात सांगितले होते कि, या देशाचे भविष्यातील जातीचे प्रश्र मिटवायचे असतील तर मुला मुलींना प्रेम विवाह करण्यास प्रोत्साहन द्या, मग तो प्रेम विवाह जातीतील असो अथवा आंतरजातीतील असो, पण तो प्रेमातून झाला पाहिज. कारण प्रेम हे निसर्गाने फक्त माणसालाच दिले आहे. ज्या मनुष्याच्या अंतःकरणात कायम प्रिय व्यक्ती असेल तर तो इतर कुठल्याही स्त्रीकडे बघताना वासनेच्या नजरेतून पाहणार नाही. त्यामुळे तो कधीही बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार नाही आणि बलात्कारही करू देणार नाही. हीच बाब स्त्रियांच्या बाबतीतही आहे.
         
सध्या महाराष्ट्रात होत असलेल्या स्त्री अत्याचारांकडे जातीय अंगाने बघणे हे राजकारण आहे. हा मुद्दा पुढे करून जर मराठा समाज संघटित होणार असेल आणि त्यातून मराठ्यांची गेलेली पत सुधारणार असेल आणि त्यातून जर सत्ता येणार असेल तर मराठा समाजातील प्रस्थापित राजकारणी आंदोलनाचा असाच वापर करणार. बलात्कारपिडीत ती मुलगी फक्त मराठा नसून ती एक स्त्री देखील आहे.
         
प्रत्येक गोष्टीचा पुनर्विचार करण्याची गरज असते. कालबाह्य गोष्ट टाकून द्यायला हवी, त्यात सुधारणा करायला हवी किंवा ती गोष्ट काढून त्याला चांगला कालानुसंगे पर्याय आणला पाहिजे. अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा हा सामाजिक लोकशाहीसाठी आहे, तो आर्थिक लोकशाहीसाठी नाही.
         
आर्थिक लोकशाही आणण्यासाठी गरिब मराठ्यांनी उठलेच पाहिजे. अ‍ॅट्रॉसिटी हा विषय त्यांच्या संघर्षाच्या वाटेत अडसर ठरू शकतो, कारण या मुद्द्याला केंद्रस्थानी ठेवण्यात मराठा समाजातीलच प्रस्थापित राजकारण्यांचे हित आहे. मी या मोर्च्यांचे स्वागत करतो, कारण त्यांना अनेक गोष्टींची कल्पना येणे बाकी आहे.
         
या मूक मोर्च्यांच्या ऐवजी आता बोलके मोर्चे निघायला हवेत. तरुण - तरुणींनी विचारायला हवं की, त्यांचे खरे शत्रू कोण आहेत ? राजकारणी त्या प्रश्‍नांनाही घाबरतात म्हणून हे मोर्चे मूक आहेत. ही तरुण मुलं - मुली बोलायला लागली तर सर्व पक्षाचे सत्ताधारी पळून जातील.
         
तेरा - चौदा वर्षाच्या मुलींना ज्यांना मूळ प्रश्‍नांची जाण यायची बाकी आहे त्यांना बोलायला लावण्यात काय अर्थ आहे ? महाविद्यालयातील आणि त्यानंतर बेरोजगारीला सामोरं जावं लागणार्‍या तरुणांना बोलायला लावलं पाहिजे . मला हे मोर्चे महत्त्वाचेवाटतात,  कारण मराठा तरुण किमान विचार करायला लागला आहे. तो आतापर्यंत फक्त जातीचा आणि क्षत्रियत्वाचा विचार करत होता. आता तो आरक्षण मागतो आहे हा मोठा बदल आहे. यातून त्यांना कळेल की,  आपलं खरं शोषण कोण करत आहे ?

http://maadhyam2016.blogspot.com/2016/10/blog-post.html?spref=bl



०७ मार्च २०१७

स्तन आणि गर्भाशय नसलेली स्त्री ही स्त्री असू शकते का ?


                                                             एरिन ब्रोकोविच (चित्रपट)


"स्तन आणि गर्भाशय नसलेली स्त्री ही स्त्री असू शकते का ?" हा प्रश्न प्रचलित स्त्री असण्याच्या सर्वच संकल्पनांना धक्का देतो आणि त्या स्त्रीचे स्त्री असण्यापलीकडचे माणूसपण अधोरेखित करतो.



१४ मार्च २००० रोजी अमेरिकेत प्रदर्शित झालेला हा चित्रपट कॅलिफोर्नियामधील एका सत्य घटनेवर आधारित आहे. एक बेरोजगार आई (एरिन ब्रोकोविच) स्वतःच्या कष्टाने आणि गुणवत्तेच्या आधारावर आपल्या कामाचा ठसा उमटवते. कायद्याची प्रचलित कोणतीही पार्श्वभूमी आणि डिग्री नसतानाही संशोधक वृत्ती आणि कामाबद्दलची आत्मीयता याच्या बळावर एका वकिलाच्या कार्यालयात कायदेशीर कामात सहाय्यक बनते. त्यामाध्यमातून कॅलिफोर्नियातील असंख्य लोकांना ती न्याय मिळवून देते. "पॅसिफिक गॅस अँड इलेक्ट्रिक कंपनी ऑफ कॅलिफोर्निया" या कंपनीच्या प्रकल्पामुळे तेथील भूगर्भातील पाण्याचे प्रदूषण होऊन पाण्यात हेक्सावॅलेन्ट क्रोमिअमचे घटक मोठ्या प्रमाणात सोडले गेले. त्याचा परिणाम म्हणून तेथील स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणावर आजारांनी ग्रासले. अनेक लहान मुले, वृद्ध आणि तरुण स्त्री पुरुषांचा त्यात मृत्यूही झाला. १९९३ सालच्या वास्तविक घटनेवर आधारित हा चित्रपट त्या घटनांमध्ये वैश्विक पातळीवरील स्त्री जीवन दर्शकांसमोर ठेवतो. हा चित्रपट बघताना एक महत्वाची बाब लक्षात येते ती म्हणजे, "सर्वसामान्यपणे स्त्री जीवनाविषयी आणि त्यातही आई म्हणून असलेल्या जबाबदाऱ्या पेलताना होणारी स्त्रीची  ससेहोलपट आणि खडतर प्रवास हा फक्त भारतीय परिप्रेक्ष्यापुरता मर्यादित नाही. तो शोषणाचा आणि पिळवणुकीचा अनुभवही वैश्विक आहे. पाश्चिमात्य जगातही मुक्त जीवनाच्या वाटेवर जगताना जबाबदाऱ्यांचे ओझे हे तेथील स्त्रीवरच येते. असे होत असतानाही या जबाबदाऱ्यांना तोंड देत नोकरीसाठी आटापिटा करत नोकरी मिळवून कामाच्या ठिकाणी स्वतःच्या कामातून समाजात स्वतःचे स्थान संवेदनशीलपणे निर्माण केले.

एरिनचे ऐन उमेदीच्या काळात लग्न झाले आणि त्यामुळे जे काम करत होती तेही मध्येच सुटले. मध्यंतरीच्या मोठ्या काळाचे अंतर आणि नंतर आई म्हणून तीन मुलांच्या जबाबदारीसह इराणचा घटस्फोट होतो. यापुढेच सुरु होते या चित्रपटाची खरी कथा.

चित्रपटाची वैशिट्ये म्हणजे, संपूर्ण चित्रपट कोठेही संगीताचा अथवा पार्श्वसंगीताचा भडीमार करत नाही. अनेक  चित्रपटांत काल्पनिकता आणि अतिशयोक्ती करत मांडणी होते, पण या चित्रपटात तसे काहीही आढळत नाही. अगदी साधेपणाने दैनंदिन जगण्यातील ठिकाणे आणि प्रसंग अर्थपूर्ण पद्धतीने मांडलेली दिसतात. ती घालत असलेल्या कपड्यांवर कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून जो आक्षेप घेतला जातो तो समाजाचा आरसा दाखवतो. तर उलटप्रश्नी सहकाऱ्याला त्याच्या वेशभूषेत (टाय घालू नये) बदल करण्यास सांगताना समाजाचा दुटप्पी चेहराही समोर येतो. अनेकदा स्त्रियांना आजूबाजूला असलेल्या वातावरणामुळे असेच वाटू लागते की मी काही करू शकणार नाही, मला काहीही काम करता येत नाही. त्यातून महिला आणखी मागे राहतात. तशीच स्थिती एरिन या महिलेच्या रूपाने या चित्रपटात दाखवली आहे, पण फरक एवढाच आहे की एरिन फक्त तेवढ्यावरच थांबत नाही तर त्या परिस्थितीशी संघर्ष करते. हा संघर्ष पुढे सर्वच गृहीतके मोडीत काढत अमेरिकेच्या सामाजिक क्षेत्रात मैलाचा दगड ठरतो. आजपर्यंतच्या सर्वात जास्त मोबदला मिळवून देणारी कायदेशीर लढाई एरिनच्या कामातून उभी राहते आणि यशस्वी होते.

पत्रकारितेचा विद्यार्थी म्हणून हा चित्रपट बघताना काही वेगळे दृष्टिकोनही समोर आले. एरिन या सामान्य स्त्रीने ज्या असामान्यपणे तिच्या कामाच्या संबंधाने घटनास्थळांवर जाऊन संशोधन केले आणि पुरावे मिळवले ते "शोध पत्रकारितेला" प्रोत्साहन देणारे होते. त्या प्रकल्पाच्या प्रदूषणाने गंभीर आजारी पडलेल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एरिनही मोठ्या काळापासून त्या प्रदूषणात काम करत असते आणि त्यामुळे तीही काही प्रमाणात आजारी पडलेली असते. हे सर्व दाखवण्यासाठी चित्रपट एरिनचा एका आजारी मुलीशी संवाद दाखवला आहे, ज्यात त्या लहान मुलीच्या चेहऱ्यावर आजारपणाचे स्पष्ट संकेत दिसत असतात. पण कॅमेरा जेव्हा विरुद्ध दिशेला बसलेल्या एरिनच्या चेहऱ्यावर येतो तेव्हा ते दृश्य त्या मुलीच्या स्थितीत आणि एरिनच्या स्थितीत खूप काही साम्य असल्याचे सुचवितो. कॅन्सर आणि इतर आजाराने शस्त्रक्रिया करायला लागलेली महिला एरिनला विचारते की "स्तन आणि गर्भाशय नसलेली स्त्री ही स्त्री असू शकते का ?" हा प्रश्न प्रचलित स्त्री असण्याच्या सर्वच संकल्पनांना धक्का देतो आणि त्या स्त्रीचे स्त्री असण्यापलीकडचे माणूसपण अधोरेखित करतो.

एका बलाढ्य कंपनीविरोधात असलेले हे काम थांबण्यासाठी एरिनला आर्थिक अमिषापासून तर अगदी जीवे मारण्याच्या धमक्यांपर्यंत प्रकार होतात तरी एरिन थांबत नाही कारण ती या घटनांकडे माणूस म्हणून बघत असते. या माणूसपणाचे दर्शन तिच्या दोन महिला वकिलांसोबतच्या संवादात स्पष्टपणे दिसते. एरिन ज्या केसवर काम करत असते त्या संबंधित प्रत्येक व्यक्तीशी तिचे व्यक्तिगत नाते तयार झालेले असते. त्या प्रत्येकाची इतंभूत माहिती तिला तोंड पाठ असते, पण तरीही तिच्या सोबत काम करणाऱ्या वरिष्ठ महिला वकिलाकडून तिच्याशी वाईट वागणूक होते. पण एरिन तिला सडेतोडपणे उत्तर देते.

दुसऱ्या एका प्रसंगात प्रकरण मिटवण्यासाठी आलेल्या महिला वकिलाच्या पैशाच्या भाषेतील मांडणीला एरिन खूप चपखलपणे स्त्री जीवनाच्या अंगाने खोडते आणि तिला वास्तवाची जाणीव करून देत. वकिलाच्या भूमिकेतील त्या महिलेला महिला प्रश्नांवर जागे करते. खरतर स्त्री जीवन हे कौटुंबिक दृष्टिकोनातून खूपच संवेदनशील आहे. ही संवेदनशीलता खूप सकारात्मक पद्धतीने या चित्रपटात मांडली आहे.

कामानिमित्त नेहमी घराबाहेर राहायला लागल्यामुळे एरिनच्या अगदी लहान वयातील मुलांना आईचा सहवास मिळत नाही. त्यातून एरिनचा ८ वर्षाचा मुलगा तिच्यावर नाराज होतो. एरिनच्या मनात हा प्रश्न पडतो की, "मी जे महत्वाचे आम करते आहे हे माझ्या मुलांना कधी समजेल ? ज्यामुळे  ते नाराज होणार नाही ?" आई म्हणून हा प्रसंग आणि एकूणच स्थिती तिची कसोटी बघणारी ठरते. पण कामाचे गांभीर्य तिला काम सुरु ठेवण्यास मदत करते. पुढे तिचा तोच मुलगा जो आईला रात्र रात्र काही कागदपत्रे वाचत असलेली बघतो आणि ती कागदपत्रे वाचून आईला विचारतो की "या ठिकाणी उल्लेख असलेल्या मुलीचे वयही माझ्या एवढेच आहे आणि ती आजारी आहे ना ?" त्यावर आई त्याला म्हणते "हो, मी तिलाच मदत करते आहे." त्यावर तो मुलगा पुन्हा म्हणतो की मग तिची आई तिला का मदत करत नाही ?" "तिची आई देखील आजारी आहे" हे समजल्या नंतर त्या मुलाच्या वागण्यात जो बदल होतो तो खूप काही सांगून जातो. त्या संवेदनशील बदलाचे समाधान एरिनच्या चेहऱ्यावर खूप प्रभावीपणे दिसतात. आयुष्यात एकटी असलेली एरिन नव्याने झालेल्या मित्राच्या मदतीमुळे जास्त वेळ काम करू शकली पण शेवटी तोही जेव्हा सोडून जाण्याचा निर्णय घेतो. तेव्हा मात्र एरिन एकूणच पुरुषी मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. यावर तिचा मित्र "मी इतरांसारखा  नाही यासाठी काय करायला हवे ?" असे विचारतो तेव्हा एरिन खूप खंबीरपणे स्पष्ट सांगते की "अश्या स्थितीत तू येथेच थांब इतरांसारखा निघून जाऊ नको." हा प्रसंग अनेक महिलांना कणखरपणे भूमिका घ्यायला प्रेरणा देतो. कालांतराने पुन्हा तो मित्र आणि ती एकत्र येतात. या मित्राला आपण एवढे दिवस काय करत होतो हे दाखवण्यासाठी त्या समस्याग्रस्त स्थानिकांच्या भेटीला नेते तेव्हा त्या सर्व लोकांच्या चेहऱ्यावरील न्याय मिळाल्याचे समाधान एरिनच्या मित्राचे अनेक प्रश्न निकाली काढते.

अशा पद्धतीने "एरिन ब्रोकोविच" हा चित्रपट दर्शकांना चित्रपट कसे असतात आणि कसे असावेत हे बघण्याची दृष्टी तर देतोच पण भारतीय चित्रपट सृष्टीत वास्तवाला भिडणाऱ्या चित्रपटांची उणीव देखील तीव्रपणे अधोरेखित करतो.




एरिन ब्रोकोविच



०८ फेब्रुवारी २०१७

पत्रकारितेच्या वास्तविक क्षेत्रातील थेट पत्रकार



वृत्तपत्र विद्या पदविकेच्या प्रथम सत्रानंतर पत्रकारितेच्या वास्तविक क्षेत्रातील थेट पत्रकार म्हणून काम करण्याची मोठी संधी म्हणजे अंतर्वासिता होय. यासाठी पुरेशी तयारी आणि गृहपाठ अभ्यासक्रमादरम्यान तज्ञ शिक्षकांकडून करून घेतला होता. तरीही प्रत्यक्ष वर्तमान पत्राच्या रचनेत कामाचा अनुभव नसल्याने अंतर्वासिता सुरु होऊन काम करणे हे एक उत्कंठावर्धक तसेच जबाबदारीचे काम होते. अंतर्वासिकेसाठी कोणत्या वर्तमान पत्राची आणि कोणत्या भागाची निवड करावी याचा विचार करताना, अभिषेक भोसले, मंदार कुलकर्णी आणि मल्हार अरणकल्ले सरांनी खूप महत्वाचे मार्गदर्शन केले . "जेथे अधिकाधिक कामाची संधी आणि नाविन्यपूर्ण अनुभव येतील अशी निवड करण्याबाबतची"  त्यांची सूचना  अधिक योग्य वाटली . कामासाठी कोणता भाग निवडावा याचा निर्णय मात्र मी व्यक्तिगत पातळीवर घेत , संगमनेर या माझ्या स्वतःच्या तालुक्याचीच निवड केली.

माझे बहुतांशी शिक्षण संगमनेर येथे झाले आणि काही प्रमाणात सामाजिक क्षेत्रातील अनुभवही येथेच घेतला होता. ही निवड करण्यामागे आणखी दुसरे कारण होते ते म्हणजे संगमनेरमध्ये मला विद्यार्थी, नागरिक म्हणून काम करत असताना तेथील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्राची काही प्रमाणात जाण झाली होती. मात्र  पत्रकाराच्या नजरेतून आणि भूमिकेतून हे सर्व समजून घेणे माझ्यासाठी गरजेचे होते . हे समजून घेण्यासाठी निवडणुकांचा काळ जो नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने संगमनेरमध्ये येणार होता तो काळ सर्वाधिक योग्य आणि अनुभव देणारा वाटला . त्याच्यासाठी अंतर्वासिता ही संधी होती आणि म्हणूनच मी लोकमत संगमनेरच्या विभागीय कार्यालयात काम करण्यासाठी अहमदनगर आवृत्तीचे संपादक सुधीर लंके यांच्याशी चर्चा करून काम करण्याची परवानगी घेतली. त्यांनीही तात्काळ यासाठी परवानगी दिली. अंतर्वासितेच्या सर्वच टप्प्यांवर मार्गदर्शन करणाऱ्या या सर्वांसाठी मी मनापासून कृतज्ञ आहे .

लोकमतच्या संगमनेर विभागीय कार्यालयातील अंतर्वासितेचा पहिलाच दिवस नगरपालिकेच्या निवडणुकीच्या विषयाने सुरु झाला. त्यात नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी असलेले एकूण प्रभाग, गट आणि नगरसेवकांची संख्या याची माहिती भेटली. या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे यावेळी नगरपालिका नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्यात येणार असल्याने निवडणुकीची चर्चा अधिक होती. त्यामुळेच सर्वांचे याकडे जास्त लक्ष होते. निवडणूक अर्ज भरायला सुरुवात झाली होती आणि अर्ज मागे घेण्याची तारीख जवळ आली होती त्यामुळे कोण अर्ज मागे घेते, किती अर्ज शिल्लक राहतात, कोणत्या पक्षांच्या युती होतात याविषयी माहिती घेणे गरजेचे असल्याचेही या चर्चेदरम्यान ठरले.

प्रत्येक दिवशी आल्यानंतर सर्व वर्तमान पत्रे स्थानिक बातम्यांचे विषय आणि आकडेवारीसह बघितले. तसे बघण्याचे महत्व कार्यालयातील वितरण विभागाचे वाघ सर यांनी सांगितले. हे बघताना इतर वर्तमान पत्रांशी आपल्या वर्तमानपत्रांची तुलना करत आपल्या कामाच्या विषयांमध्ये आणि वार्तांकनामध्ये सातत्याने सुधारणा करण्याचा धडा मिळाला. याच दिवसापासून निवडणुकीबाबतच्या विविध बातम्यांचे वृत्तांकन तालुका वार्ताहर विलास गुंजाळ यांच्यासोबत करण्यास सुरुवात केली. हा वार्तांकनाचा अनुभव देखील खूप चांगला होता. कारण या वार्तांकनामध्ये निवडणुकीवर परिणाम करणारे घटक असलेल्या जात धर्म आणि आर्थिक हितसंबंधांचा जो परिणाम होणार आहे त्याची माहिती समजली. सोबतच दररोज  विवीध राजकीय प्रसिद्धी कार्यालयांमधून येणाऱ्या प्रसिद्धी पत्रकांची बातमी करताना काय काळजी घ्यायची याचे माहितीसह प्रात्यक्षिक बघायला मिळाले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या मुलाखती घेता येतील का याविषयी चर्चा केली असता तो अधिकार आवृत्ती संपादकांचा असतो हेही तालुका प्रतिनिधी गुंजाळ सर यांच्याकडून कळाले. वृत्तपत्राच्या कामात त्या वृत्तपत्राच्या छपाईच्या अक्षर आकाराच्या प्रकारापासून ते वापरावयाच्या सॉफ्टवेअरचे वेगळेपण काम करत असतानाच लक्षात आले.

याच दरम्यान नोटबंदीच्या निर्णयाने सर्वच ठिकाणी मोठी चर्चा सुरु झाली होती . या निर्णयाचा परिणाम समाजातील सर्वच घटकांवर होणार होता तो समजून घेण्यासाठी मी तेथील सहकारी पतसंस्था, व्यावसायिक, सरकारी कार्यालये येथे गेलो काही नागरिकांशी देखील चर्चा केली. शहरातील बँकांचे निरीक्षण आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. हा अनुभव समाजमन समजून घ्यायला खूप उपयोगी पडला.

या कामा व्यतिरिक्त  तालुकयातील एड्स बाधित मुलांवर काम करणाऱ्या संस्थेच्या प्रमुखांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. त्यांची मुलाखत घेताना या कामात असणारा राजकीय हस्तक्षेप , प्रशासकीय दडपणं आणि समाजाचे विविधांगी दृष्टिकोन नव्याने लक्षात आले. जन्मतः अंधत्व आलेल्या मुलीने तिच्या या कमतरतेवर मात करत राष्ट्रीय पातळीवरील बँकिंगच्या परीक्षेत यश मिळवले होते त्याचीही बातमी करण्याची संधी मिळाली . ती बातमी करण्यासाठी त्या मुलीच्या घरी म्हणजे ‘कोंची’ या गावाच्या अगदी अंतर्गत भागात जायला मिळाले जेथे जाण्यासाठी अजूनही रस्त्याची पुरेशी सुविधा नव्हती. सामाजिक स्तरावर असलेली जातनिहाय विभागणी आणि त्यानुसार मिळणाऱ्या सुविधांमधील वेगळेपणही पुन्हा अनुभवायला मिळाले. संगमनेरच्या वैचारिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रावर प्रभाव असणाऱ्या "कवी अनंत फंदी प्रतिष्ठान व्याख्यानमालेचे" वृत्तांकन करण्याचे कामही करायला मिळाले. जे माझ्यासाठी ज्ञान आणि अनुभव मिळवण्यासाठी अधिक उपयोगी पडले.

अंतर्वासितेच्या शेवटच्या दिवसांमध्ये निवडणुकीचा प्रचार, जाहिरात तंत्र, निकाल आणि निकालानंतरचे विश्लेषण याचाही जवळून अनुभव घेतला . हा सर्वच अनुभव मला माझ्या पत्रकारितेच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे . या अनुभवाच्या जोरावर भरीव काम करण्याचा आत्मविश्वासही मिळाला या बद्दल मी मनस्वी आनंदी आहे .

एकूणच कामाचा अनुभव खूप काही शिकवणारा होता. अनेक गोष्टी कामाचा उत्साह वाढवणाऱ्या होत्या. पण त्यात अनेक वास्तव दाखवणारे अनुभव आले जे पत्रकारितेच्या ऐकीव प्रतिमेला दुजोरा देणारे होते. तालुक्याच्या ठिकाणी पत्रकारिता करताना तेथील पत्रकारावर असलेला जाहिरात, वितरण आणि राजकीय हितसंबंध सांभाळण्याची कसरत गंभीर होती. यात अनेक पत्रकार संघर्षा ऐवजी परिस्थितीशी जुळवून घेत आपले अस्तित्व टिकवतानाच दिसून येत होते. राजकीय पुढाऱ्यांपासून अनेकांच्या दबावाचा सर्वात जास्त बळी म्हणून तालुक्यावरील पत्रकारच समोर आला. कोणती बातमी घ्यायची , कोणता विषय हाताळायचा हे अनेकदा अपुऱ्या पारदर्शीपणे होते आणि त्यात कामावर मर्यादा येतात असेही वाटले .

पत्रकारितेच्या अभ्यासक्रमामध्ये पत्रकारितेचा इतिहास, तत्वे, मूल्ये, संपादकीय उज्वल परंपरा समोर येते तर वास्तवात असे विरोधाभास अनुभवायला मिळतात त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित राहिले. पण सगळीच परिस्थिती एकसारखी नाही याचेही काही उदाहरणे अनुभवली ज्यात काही पत्रकार अजूनही तत्व, मूल्यांशी आणि पत्रकारितेच्या मूळ गाभ्याशी एकनिष्ठ राहून काम करत आहेत. असे पत्रकारच कामासाठीचा खरा मार्ग असून त्या मार्गावर चालायचे या निर्धारासह मी माझी अंतर्वासिता पूर्ण केली.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था


  "भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था" भेट


           
भांडारकर संस्था हे नाव मला सर्व प्रथम माहिती पडले ते संभाजी ब्रिगेडने केलेल्या हल्ल्याच्या बातमीने. त्यावेळी भांडारकर ही संस्था काय आहे हे मात्र समजले नव्हते, पण हल्ला होण्यासारखे या संस्थेच्या बाबतीत काय घडले हे जाणून घेण्याविषयी मात्र खूपच उत्सुकता वाढली होती. तेव्हापासून या संस्थेला भेट देऊन समजून घेण्याची इच्छा कायम मनात होती. ही इच्छा वृत्तपत्रविद्या व संज्ञापन विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रमाच्या  संस्था भेटीने पूर्ण केली.  भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची ही भेट प्रा. अभिषेक भोसले यांनी २१ जानेवारी २०१७ रोजी सकाळी ८ वाजता आयोजित केली होती. भेटी दरम्यान संस्थेची सूक्ष्म तपशिलासह परिपूर्ण माहिती मिळावी यासाठी प्रा. भोसले यांनी तेथील तज्ज्ञ व्यक्तींशी संपर्क केला होता.

           
मित्रांशी आणि इतर जेष्ठ मान्यवरांशी अनेकदा चर्चा करताना भांडारकर संस्थेच्या संशोधन कार्याचा आणि तेथे संकलित आणि जतन करून ठेवलेल्या ऐतिहासिक ठेव्यांचा उल्लेख हा नेहमी ऐकू येत होता. हा उल्लेख सध्या सुरु असलेल्या इतिहासाच्या वादग्रस्त चर्चा आणि परस्पर विरोधी दाव्यांच्या पार्श्वभूमीवर तर अधिकच वाढला होता. कोणता इतिहास खरा ? कोणता इतिहास खोटा ? संशोधन म्हणजे काय ? संशोधन कसे करावे ? कसे करतात ? इतिहास लेखनात संदर्भांचा कसा उपयोग करतात ? संदर्भांची विश्वासहार्यता कशी ठरते ? यासर्वच प्रश्नांची उत्तरे या भेटीतून मिळवायची होती. ती अपेक्षेप्रमाणे या भेटीतून पूर्ण झाली याबद्दल समाधान आहे. याबाबतच्या सर्वच निरीक्षणांचा आणि अनुभवांचा हा भेट अहवाल ...


भांडारकर संस्थेविषयी

           
भांडारकर ही भारतातील एक अग्रगण्य आणि नामांकित इतिहास संशोधन संस्था आहे. भांडारकर संस्थेची स्थापना अभ्यासक रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या ऐशीव्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि हितचिंतकांनी  ६ जुलै १९१७ रोजी केली. त्यांचे संशोधनात्मक काम पुढेही चालू राहावे म्हणून ही स्थापना करण्यात आली होती. टाटांनी दिलेल्या देणगीतून टाटा हॉल एका मोठ्या माळरानावर उभारण्यात आला होता. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था ही महाराष्ट्रामधील पुणे शहरातील ऐतिहासिक संशोधन संस्था आहे . ही संस्था भारतातील एक प्रमुख प्राच्यविद्या संस्था असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील  महत्त्वाची संशोधन संस्था आहे. प्राकृत डिक्शनरी हा महत्त्वपूर्ण प्रकल्प संस्थेने पूर्णत्वास नेण्याकडे वाटचाल केली आहे. केवळ अभ्यास आणि संशोधन या कार्यालाच वाहून घेतलेल्या अभ्यासकांची पिढी घडविण्याचे कार्य संस्थेने केले आहे.

     
रामकृष्ण गोपाळ भांडारकर

           
रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे संस्कृत पंडित, मराठी शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक व प्रार्थना समाजाचे संस्थापक सदस्य होते. भांडारकरांचा जन्म ६ जुलै १८३७ रोजी महाराष्ट्रात मालवण येथे झाला. त्यांचे शिक्षण मालवण, रत्नागिरी, मुंबई येथे झाले. ते मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी होते, त्यांच्यासोबत महादेव रानडे हेही होते.  काही काळ शाळांमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केल्यानंतर त्यांना मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात आणि नंतर पुण्याला डेक्कन कॉलेजामध्ये संस्कृत भाषेचे प्राध्यापक म्हणून नेमणूक मिळाली. इ.स. १८९२ साली डेक्कन कॉलेजातून ते निवृत्त झाले. पुढे इ.स. १८९३-९५ सालांदरम्यान ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. ज्या काळात पाली, मागधी यांसारख्या प्राकृत भाषांचा अभ्यास करणारे दुर्मीळ होते, त्या काळात डॉ. भांडारकरांनी प्राकृत भाषा, ब्राह्मी, खरोष्टी या लिप्या वगैरेंचे संपूर्ण ज्ञान मिळवून भारताच्या इतिहासाचे संशोधन केले, आणि लुप्तप्राय झालेला इतिहासाची पुनर्मांडणी करून तो प्रकाशात आणला. भारतातील हस्तलिखित ग्रंथांचा शोध घेऊन त्यांना प्रकाशित करण्याचे काम तत्कालीन सरकारने भांडारकरांवर सोपवले. त्यांनी पाच जाडजूड ग्रंथ लिहून हे काम बऱ्याच प्रमाणात साध्य केले. पुरातत्त्वशास्त्राचा इतिहास अभ्यास करणारे संशोधक त्यांचे ग्रंथ आजही प्रमाण मानतात. १८८३ साली व्हिएन्नामध्ये भरलेल्या प्राच्यविद्या विद्वानांच्या परिषदेत हजर राहिलेल्या भांडारकरांच्या अभ्यासाचा आवाका पाहून तेथले सरकार तसेच जागतिक विद्वान अचंबित झाले आणि त्यांनी भांडारकरांना सी.आई.ई. (Companion of the Order of the Indian Empire) ही पदवी देऊन सन्मानित केले. त्या पहिल्या युरोपीय प्राच्यविद्या परिषदेत भांडारकरांनी नाशिकजवळील लेण्यांमधल्या शिलालेखांचा अर्थ विशद करून सांगितला. या घटनेमुळे युरोपात प्राच्यविद्या विशारद म्हणून त्यांच्या कार्याची महती पसरली आणि त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्ससह अनेक मानद सन्मान मिळाले. भांडारकरांनी प्राच्यविद्याविषयक विपुल ग्रंथरचना केली.

    
भांडारकरांनी लिहिलेले ग्रंथ-

  •        भारताचा पुरातत्त्व इतिहास- पाच खंड

  •        मुंबई निर्देशिकेसाठी (Bombay Gazetteers) लिहिलेला "दक्षिण भारताचा इतिहास"

  •        वायुपुराण या ग्रंथाचा इग्रजी अनुवाद (अपूर्ण)

  •        भवभूतीच्या "मालती माधव" वर टीका

  •        फक्त इंग्रजी जाणणार्यांतसाठी संस्कृत व्याकरण भाग १ आणि २, वगैरे.

  •       महाभारताची चिकित्सक आवृत्ती

           
जगभरात या संस्थेची ओळख महाभारतावरील संशोधनात्मक कामासाठी आहे. महाभारत हे रामायणापेक्षाही तुलनेने कितीतरी मोठे आहे. तो येथील प्राचीन साहित्याचा महत्वाचा ठेवा म्हणून ओळखला जातो. म्हणूनच तो निर्दोष  बनवण्यासाठी चिकित्सक अभ्यासाचे मोठे काम येथे झाले. थोडक्यात मूळ महाभारत काय असू शकेल याचा शोध पोथ्यांच्या साहाय्याने केला गेला. हे काम जवळ जवळ १२०० पोथ्या गोळा केल्या. त्यातील ७७४ पोथ्यांचा वापर करून १९ खंडांची आवृत्ती तयार करण्यात आली. ती विक्रीसाठी उपलब्ध आहे.

           
एक पोथी आधाराला घेऊन त्यातील प्रत्येक श्लोकांची व अक्षरांची इतर पोथ्यांतील श्लोकाशी व अक्षरांशी तुलना करून अभ्यास केला गेला. महाभारतामध्ये एक लाखापेक्षा जास्त श्लोक आहेत. अशा ७७४ पोथ्यांतील प्रत्येक अक्षराचा अभ्यास केला गेला आहे. महाभारताच्या या चिकित्सक आवृत्तीत पानाच्या एक चतुर्थांश भागात ४ ते ५ श्लोक दिसतील, बाकीच्या उरलेल्या तीन चतुर्थांश भागात प्रक्षिप्त व इतर भागांच्या नोंदींचा तपशील आहे. ज्यावेळी कॉम्पुटर नव्हते अशा काळात भांडारकर संस्थेची २५ ते ३० तज्ञ असलेली टीम सातत्याने काम करत होती. जवळ जवळ ४८ वर्षे हे काम सुरु होते. १९१८ मध्ये सुरु होऊन १९६६ मध्ये ते पूर्ण झाले. आवृत्तीचे प्रकाशन  तेंव्हाचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. हे काम पाश्चात्य देशात हातात घेऊन बंद करण्यात आले होते. ते त्यांना शक्य झाले नाही. ते काम या संस्थेने करून दाखवले. संस्थेने १९१९ मध्ये महाभारताची चिकित्सक आवृत्ती प्रकाशित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. विष्णू सीताराम सुखठणकर यांची महाभारत प्रकल्पाच्या संपादकपदी नियुक्ती करण्यात आली. या प्रकल्पाला ब्रिटिश अकॅडेमीने अर्थसाह्य केले होते. सुखटणकर यांच्या निधनानंतर श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांच्याकडे संपादकपदाची धुरा सोपविण्यात आली. १९४३ मध्ये संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षांच्या कार्यक्रमास स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रपती झालेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन उपस्थित होते. तर, १९६८ मध्ये झालेल्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमास राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन उपस्थित होते.

     
प्राच्य विद्या परिषद


अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद (ऑल इंडिया ओरिएन्टल कॉन्फरन्स) ही भांडारकर संस्थेने दिलेली देणगी आहे. संस्कृत आणि प्राच्यविद्या क्षेत्रातील अभ्यासक आणि संशोधकांचे संमेलन असे या परिषदेचे स्वरूप असून आतापर्यंत देशभरात विविध ठिकाणी ४७ परिषदा झाल्या आहेत.

     
ग्रंथभांडार

           
ह्या संस्थेत अंदाजे १,२५,००० प्राचीन दुर्मिळ ग्रंथ तसेच २९,५१० हस्तलिखिते जतन करून ठेवण्यात आली आहेत. प्राच्यविद्या संशोधक डॉ. रा.ना. दांडेकर यांनी ५४ वर्षे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या मानद सचिवपदाची धुरा सांभाळली होती. त्यांच्या कामाची दाखल घेत भांडारकर संस्थेतील ग्रंथालयाला "डॉ. रा.ना. दांडेकर ग्रंथालया" नाव देण्यात आले आहे. या ग्रंथालयात भारतीय आणि युरोपियन भाषेतील सव्वा लाख पुस्तकांचा समावेश असून त्यापैकी २० हजार पुस्तके दुर्मिळ आहेत.

         

  
हस्तलिखित ग्रंथ विभाग

           
पूर्वी डेक्कन कॉलेजमधील हस्थलिखितांचा मोठा संग्रह भांडारकर संस्थेत आणला गेला आहे. ब्रिटिश शासनाच्या हे लक्षात आले होते की भारतातील प्राचीन साहित्य हे पोथ्यांमध्ये आहे. जर ते शोधून काढायचे असेल तर पोथ्या गोळा केल्या पाहिजे. त्या उद्देशाने देशभरातून पोथ्या गोळा करण्याचा प्रकल्प सुरु केला गेला. त्यात बॉम्बे प्रेसिडेंसि आणि भारताचा पश्चिम भाग येथून पोथ्या गोळा करण्याचे काम बॉम्बे प्रेसिडेन्सी मधील जाणकारांकडे सोपवण्यात आले. त्याच्यामध्ये भांडारकर हे ही होते. उत्तर कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान अशा विविध भागातून या पोथ्या आणल्या गेल्या. हे काम १८६६ ला सुरु झाले होते. सुरुवातीस या पोथ्या गोळा करून मुंबईच्या एंफिल्स्टन कॉलेजमध्ये ठेवण्यात आल्या, पण मुंबईची दमट हवा पोथ्यांच्या जतनासाठी योग्य नाही असे लक्षात आले, म्हणून तो संग्रह डेक्कन कॉलेज मध्ये पुण्यात आणला गेला.

           
पुढे  १९१७ नंतर भांडारकर संस्थेच्या संस्थापकांनी, "संस्थेची स्थापनाच मुळी प्राच्यविद्येच्या संशोधनासाठी झाली आहे, या सर्व साहित्याचा आम्ही वापर करू तरी हा संग्रह आमच्याकडे द्यावा" अशी विनंती केली. त्याप्रमाणे १९२२ मध्ये हा संग्रह भांडारकर संस्थेकडे देण्यात आला. त्यात १८००० पोथ्या होत्या. तो संग्रह डेक्कन कॉलेज मधून भांडारकर संस्थेत आणण्यात आला. त्या संग्रहात येथील कर्मचाऱ्यांनी भर घातली. आज या संस्थेत २८००० दुर्मिळ पोथ्या आहे. यात विविध भाषांचा समावेश आहे. त्यात विविध भारतीय प्रादेशिक भाषा 'बंगाली, तेलगू, कन्नड, उडिया' अशा भाषांच्या ग्रंथांचा समावेश आहे. तसेच पर्शिअन भाषेतील व  इतर सचित्र ग्रंथही येथे पाहायला मिळतात. कागद, ताडपत्र, भुजपात्र यावर लिहिलेल्या पोथ्या हे यातील वैशिट्ये. काश्मीरहून आलेल्या पोथ्या ज्या आज काश्मीरमध्येही उपलब्ध नाही, त्यात राजतरंगिणी हा संस्कृत ग्रंथ आहे. त्यात काश्मीरचा  इतिहास भुजपत्रावरील पोथ्यांमध्ये आहे. त्यावेळी तेथे 'शरद' लिपी प्रचलीत होती, त्यातीलही काही पोथ्या यात आहे. या संस्थेत पर्शिअन पोथ्यांचा स्वतंत्र विभाग आहे. त्यात 'अवेस्ता' या पर्शिअन ग्रंथाचा समावेश आहे.

 
प्रकाशन विभाग

           
भांडारकर संस्थेचा स्वतःचा असा स्वतंत्र प्रकाशन विभाग आहे. या प्रकाशन अंतर्गत अनेक मौल्यवान ग्रंथ प्रकाशित झाले आहे. संस्थेत या प्रकाशित पुस्तकांचे स्वतंत्र दालन आहे. ते सर्व ग्रंथ विक्रीस उपलब्ध करून दिले जातात.


 संशोधन विभाग व प्रशिक्षण कार्यक्रम

           
भांडारकर संस्थेच्या वतीने ऐतिहासिक संशोधनासाठी महत्वाच्या पद्धतींचे प्रशिक्षण वर्ग देखील घेतले जातात. २०१५ मध्ये येथे 'अवेस्ता' भाषेची १५ दिवसीय कार्यशाली झाली होती. त्याला देशभरातून ७०-८० लोक सहभागी झाले होते. येथे हस्थलिखितांचे जतन कसे करायचे याविषयीच्या देखील कार्यशाळा घेतल्या जातात. सर्वांना या पोथ्या व ग्रंथ बघता येतात आणि कॉपी घेता येतात. संस्थेकडून नवोदित अभ्यासकांना पोथ्या वाचण्यात मदत केली जाते. प्राकृत भाषेतील सर्वात पहिली शब्दावली (डिक्शनरी) तयार करण्याचे काम सुरु असून १५०० प्राकृत ग्रंथांचा यासाठी आधार घेण्यात येतो. प्राकृत ही भाषा नसून अनेक भाषांचा समूह आहे. या शब्दावलीत फक्त शब्दार्थाच नसून संदर्भ देखील दिलेले आहेत. हे गेली २० वर्षे काम सुरु आहे, त्यामध्ये आत्तापर्यंत ५ खंड प्रकाशित झाले आहे. यात फक्त स्वर पूर्ण झाले आहे . व्यंजनांचे काम सुरु झाले आहे. सध्या ६व्या खंडाचे काम सुरु आहे.

महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीच्या मदतीने प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी "सांस्कृतिक सूची" तयार करण्यात येत आहे. महाभारतात अनेक प्रदेश, राजे, शस्त्रास्त्र इत्यादी गोष्टींची विषयवार सूची यात बनवण्यात येत आहे. त्याचेही आत्तापर्यंत दोन खंड प्रकाशित झाले आहे. अजूनही हे काम सुरु आहे.

         

     
संदर्भ -

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था

http://www.bori.ac.in/

https://mr.wikipedia.org/wiki

शंभरी.. भांडारकर प्राच्यविद्या संस्थेची
http://www.loksatta.com/lekha-news/the-bhandarkar-oriental-research-institute-centenary-year-start-1268278/

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर

https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand12/index.php/component/content/article?id=9971

भांडारकर संस्था: सांस्कृतिक संचित

http://www.lokmat.com/storypage.php?catid=297&newsid=13492606

http://maharashtratimes.indiatimes.com/cold-wave/ravivar-mata/bhandarkar-institute-celebrating-hundrerd-years/articleshow/53134407.cms

http://marathi.eenaduindia.com/State/WesternMaharashtra/Pune/PuneCity/2016/07/07105854/cenetary-festival-started-on-wednesday.vpf