"ज्ञान म्हणजे काय ? ते कोणी निर्माण केलं ? ते कसं मिळतं ? ज्ञानाची उत्सुकता का असते ? ज्ञान मिळवण्याची धडपड क असते ?" याचा आयुष्यभर शोध घेत, त्याचा पाठपुरावा करत मुक्तपणे जगणारा माणुस म्हणजे डॉ. गणेश देवी होय. वयाच्या १७ व्या वर्षापासून ४४ व्या वर्षापर्यत दररोज न चुकता पुस्तकाची ३०० पानं वाचणारा हा माणूस.
वयाच्या ४५ व्या वर्षी बडोद्यामधील (गुजरात) सयाजीराव गायकवाड विश्वविद्यालयातील इंग्रजी विषयाची प्राध्यापकी सोडून आदिवासींमध्ये त्यांच्याच जीवनशैलीत जगू लागला. सुरुवातीचे दोन वर्ष तर डॉ. देवी आदिवासींसोबत एकही शब्द न बोलता एकत्रितपणे बसून राहत. फक्त आदिवासींना ऐकत, न्याहाळत व निघून जात. या सर्व प्रकाराच्या शब्दांशिवायच्या संवादाला गणेश देवी 'निशब्द अड्डा' असं संबोधतात. पुढे मग ते त्या नि:शब्द अड्ड्यात काही वर्तमान पत्र आणुन ठेवत व आदिवासी बांधव उत्सुकतेने ते न्याहाळत बसत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील हा अभ्यासक - संशोधक स्वतःपासून कमालीचा आलिप्त राहून जगाशी जोडला जातो. हे जोडलेपण तेथील मातीशी जोडुन घेण्यापासून सुरू होते आणि पुढे तेथील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुजरात राज्यात बडोद्यामधील तेजगड या आदिवासी भागात त्यांचे काम होय.
सामुहिक प्रयत्नातून व सहभागातून उभ्या राहिलेल्या 'आदिवासी अकॅडमी'च्या माध्यमातून आदिवासींचे जीवन आणि पर्यावरण समजून घेत त्या ऐतिहासिक ठेव्यांचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्याचे महत्वाचे काम तेथे झाले आहे. एकीकडे लोक भाषांना सुनियोजित पद्धतीने संपवण्याचे प्रयत्न होत असताना तेजगडमध्ये ८०० प्रादेशिक भाषांमध्ये बोलणाऱ्या ८०० झाडांचे 'भाषावन' उभे केले आहे. या झाडांना हात लावला की ती झाडे त्यांच्या भाषेत बोलू लागतात. तेजगडमधील आदिवासी म्युझियम हे तर तेथील आदिवासींच्या जगण्याचा जीवंत व समृद्ध ठेवाच आहे. अशा पद्धतीने बायोसेन्साॅरच्या मदतीने झाडांना बोलते करण्यातून व म्युझियमच्या माध्यमातून ईतिहास करण्याच्या कृतीतून भाषातज्ञ असणाऱ्या गणेश देवींमधील वैज्ञानिक आणि ईतिहासकाराचे सुक्ष्मरूप अनुभवता येते.
डॉ. गणेश देवींच्या या कामातून त्यांच्या सातत्यपुर्ण कृतीप्रवणतेचा गुण स्पष्टपणे अनुभवायला मिळतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रादेशिक लोक भाषा जतनाचे मोठ काम करत असताना अभ्यास आणि संशोधनाला थेट जमिनीवरील रचनात्मक कामाला जोडून घेण्याची त्यांची कामाची पद्धत त्यांना म्हणूनच विशेषत्व बहाल करते. जगभरातील 40 ते 50 देशांमध्ये अभ्यास, अध्यापन आणि संशोधनासाठी गेलेल्या या माणसात जसा व्यापक जागतिक दृष्टिकोन दिसतो तसेच तळागाळातील सामन्यातील सामान्याचं जगणं समजून घेणारा सहृदय दृष्टिकोन देखील दिसतो. त्यांच्या स्वतःच्या मते ते एकाचवेळी तीन जगांमध्ये व भाषांमध्ये राहिले आहेत. ते तीन म्हणजे आदिवासींचे जग, तुमचं आमचं नागरी जग आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील जग होय. तसेच तीन भाषा म्हणजे मराठी, गुजराती आणि इंग्रजी भाषा होय. त्यामुळेच त्यांच्या विचारांना जसा वैश्विक संदर्भ असतो तसा स्थानिक वास्वववादी आधारही असतो. त्यातूनच त्यांची मांडणी अधिक तर्कसंगत आणि कालसुसंगत झाल्याचे लक्षात येते.
विनोबांचा 'Think Globally Work Locally' हा विचार प्रत्यक्षात आचरणात आणण्याचे भरीव काम डॉ. गणेश देवींनी केले आहे. 'अक्षर मानव'च्या संवाद - सहवास या उपक्रमात त्यांच्या सोबत जो वेळ जगता आला त्यातील एक महत्वाची बाब म्हणजे त्यांनी चर्चेसोबत दिलेला एक कृतीकार्यक्रम होय. त्यांच्यामते स्थानिक पातळीवर प्रत्येक गावात तरूण मातांना एकत्र करून 'मातृमंडळ' तयार करून त्यांना आपल्या कुटूंबात स्वातंत्र व निर्भयता रुजवण्यास प्रोत्साहित केले. त्यांना काही पुस्तके वाचायला देऊन नवा विचार दिला आणि त्याच्या छोट्या छोट्या बातम्या व्हाट्सअॅप , फेसबुकवर पाठवल्या तर स्वातंत्र व निर्भयतेचे वातावरण निर्माण होण्यास मोठी मदत होईल. मातृभूमीचा भावनिक अतिरेक होत असताना त्यावर 'मातृमंडळ' प्रभावी ठरेल.
असाच काहीसा कृती कार्यक्रम फ्रान्समध्ये बिघडलेल्या परिस्थितीत व कडव्या टोकदार उजव्या शक्तींच्या प्रभावाला उत्तर देण्यासाठी एक चळवळ उभी राहिली होती. त्या अंतर्गत फ्रन्समधील लोकांनी दररोज रात्री आपल्या जवळच्या, ओळखीच्या व्यक्यींसोबत १० मिनीटे बोलण्याचे सुरू केले. त्याच्या परिणाम स्वरूप कडव्या टोकदार उजव्या शक्तींना प्रभावी उत्तर तर मिळालेच सोबत २०१७ च्या फ्रान्स अध्यक्षीय निवडणुकीत देखील सकारात्मक बदल घडून आला.
असाच काहीसा शुल्लक वाटणारा कार्यक्रम गांधींनीही दांडी सत्याग्रहाच्या रूपाने केला होता. त्यावेळी त्यांच्या त्या कार्यक्रमाला मोतीलाल नेहरूंनी निरूपयोगी ठरवले ज्यावर गांधींनी दिलेले एका ओळीचे उत्तर होते, 'करके देखो' होते. त्यावर मोतीलाल यांना दांडी सत्याग्रहात सहभागी होण्याच्या अगोदरच अटक झाली व त्यांनी गांधींना उत्तर पाठवले 'करनेसे पहलेही देख लिया'. हीच अनुभूती गणेश देवींच्या या कृतीकार्यक्रमासाठीही लागु झाली तर विशेष वाटायला नको.
म्हणूनच 'करके देखो'
डॉ. गणेश देवी स्वतःला कायम विद्यार्थीच असल्याचे मानतात. त्यांच्यामते त्यांच्या जगण्याचा व कामाचा मार्ग त्यांनी स्वतः ठरवलेला आहे. पण त्यावर कसे चालायचे, मार्गक्रमण करायचे हे त्यांना त्यांचे विविध गुरू सांगतात. डॉ. गणेश देवी सर्वांनाच वेगवेगळ्या विषयांसाठी गुरू मानतात. जसे मनुस्मृतीच्या विश्लेषणासाठी ते डाॅ. आंबेडकरांना गुरू मानतात तर ग्रामविकासाच्या संकल्पनेसाठी गांधींना गुरू मानतात. अशा पद्धतीने ते अनेकांना विषयानुरूप आपले गुरू मानतात. आदिवासींना ते स्वतःचा सर्वात चांगला गुरू मानतात. या सर्व गोष्टींतून त्यांचा विनम्रपणा आणि ज्ञानोपासनेच्या वृत्तीची प्रचिती होते.
ज्ञानाच्या संदर्भातील संकल्पना स्पष्ट करताना ते सांगतात की, 'ज्ञान आणि स्वातंत्र्यात खुप जवळचा संबंध असून जो मुक्त आहे त्याला ज्ञान मिळवता यायला हवे. पण येथे ज्ञानामुळे माणूस मुक्त होतो अशी मांडणी होते. ज्ञानावर मालकी मिळवण्याचे मोठे प्रयत्न होत असून त्यामागे केवळ नफा कमावण्याचा हेतू आहे. पाठीचा मणका वाकवावा लागेल अशी कष्टाची कामे इतरांवर ढकलण्यासाठीही ज्ञानाचा वापर होतो आहे. लिपी हे स्वार्थाचं स्पष्ट रूप आहे. कुठलीही भाषा कुठल्याही लिपीत लिहिता येते. भाषेचा व लिपीचा काडीचाही संबंध नाही. भाषा लिपीवर अवलंबून नाही तर व्यवसाय देण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे. अनेकदा लिपीचा भाषेवर अन्याय होतो. लिखीत व्याकरण, लिपी ही भाषेची जरूरी नसते. अगदी साडेतीन वर्षांपर्यंतच्या मुलांनाही अवघड आणि किचकट भाषेतील वाक्ये येतात हे त्याचे एक चांगले उदाहरण आहे.
भाषा बोलणारे जर रेल्वेचे इंजिन मानले तर व्याकरणवाले त्या रेल्वेच्या इंजिनचा शेवटचा बडा ठरतील. व या व्याकरणरूपी डब्याला शेवटी इंजिनाच्याच मागे धावावे लागते. त्याप्रमाणे व्याकरण हे देखील भाषा बोलणाऱ्यांची मागे धावत असते. भाषा बोलणारच भाषेला स्वतंत्र बनवतात. शिक्षक हा ज्ञानासाठी आवश्यक नसून, शिक्षकांनी स्वतःच्या अस्तित्वासाठी, रोजगारासाठी भाषा शिकवायला सुरुवात केली. आदिवासी त्यांच्या ढोलाच्या एका आवाजातून २४ प्रकारचे संदेश पाठवू शकतात. हि त्यांची स्वतंत्र अभिव्यक्ती आहे.
आपण कसे बघतो ते बघणे, आपण कसा विचार करतो त्याचा विचार करणे अर्थात प्रक्रिया समजून घेणेहे डॉ. गणेश देवी यांच्या अभ्यासाचे, संशोधनाचे आणि कामाचे मुख्य सूत्र राहिले आहे. या सूत्राबद्दल ते आग्रही आहेत. कुठल्याही कामात झोकून देऊन शिस्तीने, प्रामाणिकपणे आणि वेळेवर काम करणे हि त्यांच्या कामाची पद्धत असल्याचे प्रकर्षाने लक्षात येते. त्याच्याच परिणाम स्वरूप त्यांनी आजपर्यंत मोठे काम निर्माण केले. ३००० लोकांना सोबत घेऊन ३० राज्यांचे लोक भाषा सर्वेक्षणाचे काम जे सरकारने शक्ती असतानाही करणे टाळले तेच काम डॉ. गणेश देवी यांनी सरकारच्या मदतीशिवाय लोकांच्या सहभागातून केले. त्या सर्वेक्षणाचे ३० खंड प्रकाशित करून ते देशाला अर्पण केले. प्रकाशनासाठी त्यांनी बाहेर देशातील अनेक नावाजलेल्या प्रकाशकांची प्रकाशनासाठीची मागणी नाकारून जाणीवपूर्वक ते प्रकाशनाचे काम देशातीलच प्रकाशकाला दिले. यातून त्यांचे कामाच्या प्रत्येक टप्प्यावर असलेले लक्ष आणि प्रत्येक निर्णयात अधिक विधायकता आणि अर्थपूर्णता आणण्याचे प्रयत्न दिसतात. या सोबतच आदिवासी अकॅडमी विकसित करण्याचे ४० ते ५० कोटींचे काम असो की 'भाषा' ट्रस्ट व प्रकाशन अंतर्गत २०० ग्रंथांचे प्रकाशन या सर्व कामांत त्यांच्या कार्यपद्धतीचा ठसा उमटलेला दिसतो.
कोणतेही काम दीर्घकाळ टिकण्यासाठी त्या कामात पुढच्या पिढ्यांचा सहभाग अत्यावश्यक असल्याचे ते मानतात. त्यातूनच त्यांनी आदिवासी अकॅडमीच्या सर्व पदांचा त्याग करून ते काम नव्या पिढीकडे सोपविले. जीवनात अंगिकारण्याच्या काही महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख करताना ते सांगतात की, 'अपरिग्रह हे आयुष्यातील महत्वाचे, अर्थपूर्ण व शक्तिशाली शस्त्र आहे. तसेच मनातून भीती काढून टाकणेही अत्यवाश्यक आहे. भय काढून टाकणे म्हणजे मृत्यूबद्दल बेदरकार होणे नसून मृत्यूबद्दल आदर ठेवणे होय.' डॉ. गणेश देवी यांच्या वेळोवेळी घेतलेल्या स्पष्ट वैचारिक भूमिकांमुळे आणि परिणामकारक संघर्षमय रचनात्मक कार्याने त्यांच्यावर जीवघेणे हल्ले देखील झाले. परंतु मृत्यूच्या भयाला दूर केल्याने व कामावरील अपरिग्रहवादी निष्ठेमुळे त्यांनी त्या हल्ल्यांना निकामी तर ठरवलं. सोबत त्यांच्यातील माफ करण्याच्या मानवी वृत्तीने त्यांनी त्या हल्लेखोरांना मोठ्या मानाने माफ केले. यात त्यांना त्यांच्या सतर्क आणि सजग 'दृष्टी'नेही मोठी साथ दिली. त्यांच्या स्वतःच्या निरीक्षणाप्रमाणे त्यांच्या कानाच्या तुलनेत त्यांचे डोळे हे जास्त जलद व तीक्ष्ण आहेत, त्याचा या सर्व घटनांना सामोरे जाण्यात खूप जास्त उपयोग झाला.
वयाच्या ११व्या वर्षांपासून अध्यात्मापासून अलिप्त झालेले आणि आत्म्याचा शुद्ध न घेता, आत्म्याच्या शोधाचा शोध घेणारे डॉ. देवी देव आणि आत्म्याबाबत स्पष्टपणे नमूद करतात की, 'शब्द आहेत म्हणूनच देव आहेत. आपण घोडा, शेळी या सारखे प्राणी असतो तर देव असला नसता. देव म्हणजे भाषा, लहान मुलांतील जाणिवा, सामाजिक संस्था होय. आस्तिक म्हणजे अस्तित्व स्वीकारणे होय. आपल्या या काळात 'निर्भयता' हाच देव आहे.'आदिवासींना भुकविना, कर्जविना, रोगविना, आणि स्थलांतर विना जगता येणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करताना ते सांगतात की, 'आदिवासी हे स्वतःला पृथ्वीचा मानतात पण पृथ्वीला स्वतःची मालकी मानत नाही. "I belongs to earth, doesn't belongs to me" म्हणताना त्यांना तेथे अपेक्षित असलेली भावना म्हणजे पृथ्वीच्या असंख्य घटकांपैकी आपण मात्र एक सूक्ष्म घटक असल्याची नम्र जाणीव होय. 'आदिवासींच्या साहित्याची पुस्तके करायची ठरली तर सर्व साधारणपणे ४०,००० पुस्तकांचं आदिवासी साहित्य तयार होऊ शकेल. आदिवासी वर्तमानकाळात जगतात म्हणून ते प्रामाणिक असतात. मात्र भूतकाळाचा शोध लागल्यापासून नागरीकरणातील माणसे अप्रामाणिक वागायला लागली, खोटं बोलायला लागली आहेत.'
भारतीय भाषांचे जागतिक स्तरावरील महत्व व स्थान अधोरेखित करताना ते आवर्जून सांगतात की, 'जगातील सर्वोच्च ३० भाषांमध्ये भारताच्याच १२ भाषांचा सहभाग आहे. १००० वर्षांपेक्षा जास्त इतिहास असलेल्या जगातील १८ भाषांमध्ये भारताच्याच ८ भाषा आहेत. चांगले तत्वज्ञान व साहित्य असलेल्या जगातील ७ भाषांमध्ये भारताच्याच ३ भाषा आहेत आणि जगात सर्वात जास्त गतीने वाढणारी भाषा ही हिंदी आहे.' 'सामंतशाही (Fascism), प्रत्यक्ष नेता वाईट अथवा चुकीचे काम न करता तसे काम करण्यास पोषक विचारांचा मोठा समाज निर्माण करणे (Hegemony), आणि निवडून न आलेल्यांची दंडेलशाही (Terrini of unelected) अशा धोकादायक घटकांबरोबर सत्य, अहिंसा, आणि स्त्रीत्वाने लढावे लागेल. गांधींनी इंग्रजी राजवटीच्या पुरुषी वर्चस्वाला स्त्री प्रतीकांच्या आधाराने विरोध केला. रामकृष्ण परमहंस देखील स्वतःला मनाने स्त्री मानत, शिवाचे अत्युच्च रूप म्हणून अर्धनारी नटेश्वर मानले जाते. त्यातूनच स्त्री प्रतीकांची स्थापना झाली. काही गोष्टी पुरुषी दृष्टीने समजून घ्याव्या लागतात तर काही गोष्टी समजून घेण्यासाठी स्त्री दृष्टीच आवश्यक असते' असेही ते नमूद करतात.
२०० वर्षातील संकल्पनांचा आढावा घेताना समता, स्वातंत्र्य, बंधुता,या मूल्यांसोबतच राष्ट्र - राष्ट्रवाद, व्यक्ती - व्यक्तिवाद, यांचाही ते अचूकपणे वेध घेतात. अँडम स्मिथ आणि कार्ल मार्क्स यांच्या मांडणीत जमीन अस्मानाचा फरक असला तरी व्यक्तीला स्वातंत्र्य आणि न्याय मिळावा हा त्यांच्यातील सामान हेतू ते अचूकपणे अधोरेखित करतात. आजही आपल्याकडे व्यक्तीच्या न्याय स्वातंत्र्यासाठी व हक्कांसाठी राज्यसत्तेवर नियंत्रण घालण्याची मांडणी अस्तित्वात नसून हि मांडणी होण्याची गरज आहे असेही ते सांगतात. सामान्यतः विरुद्ध टोकाच्या गोष्टींमध्ये कमालीची विधायक समानता शोधण्याची त्यांची दृष्टी म्हणूनच महत्वाची वाटते. त्यांना अभिप्रेत असलेला व्यक्तिवाद हा बेफान व्यक्तिवाद (Reckless individualism) नसून तो निर्भय व्यक्तिवाद (Fearless individualism) आहे. भविष्यात तिसरे महायुद्ध हे बेफान व्यक्तिवाद विरुद्ध निर्भय व्यक्तिवाद यामध्ये होण्याची शक्यताही ते वर्तवता.
'१८ व्य शतकापासून पुढे स्वातंत्र्य व राष्ट्र या संकल्पना एकत्रित आल्या होत्या. स्वातंत्र्य मिळवायचे म्हणजे ते एका राज्यकर्त्यांकडून दुसऱ्या राज्यकर्त्याकडे देणे असे नसून राज्यकर्त्याच्या ताब्यातील स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला बहाल करणे आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर स्वातंत्र्य आणि राष्ट्र या संकल्पना वेगळ्या झाल्या. आज मात्र स्वातंत्र्य आणि राष्ट्र या दोघांत संघर्षाची स्थिती निर्माण होत आहे. आता राष्ट्राचे स्वातंत्र्य त्या राष्ट्रात राहून टिकवता येणार नाही तर राष्ट्राबाहेर वैश्विक युती करून टिकवावे लागणार असल्याचे' डॉ. देवी सूचित करतात.
'पोस्ट ट्रुथ' बद्दल आपले मत मांडताना ते शासन आणि लोक यांच्यातील आंतरसंबंध स्पष्ट करतात, 'अगोदर शासनात आणि लोकांमध्ये एक करार असत. त्यात लोकांनी शासनाला कर देणे आणि शासनाने लोकांना सुविधा व सुरक्षा देणे असा व्यवहार होता. त्यावेळी कराच्या आधारेच लोकांचे नागरिकत्व ठरत. पण आता हा करार बदलत आहे. उद्योपतींचं राज्य सुरु झाले तेंव्हापासून राज्यसत्ता पोखरून निघत आहे. अशा स्थितीत राज्यसत्तेकडे शक्ती, कुवतच शिल्लक नाही. सत्ता आता सरकारांकडे राहिली नसून उद्योगपतींकडे गेली आहे. भविष्यात स्वतःचा नफा, प्राप्ती वाढवण्यासाठी सरकार उद्योगपतींसाठी देखरेखीचे (Servillence) आणि माहिती पुरवठादाराचे (Information Vendering)चे काम करेल. त्यासाठीच आज शारीरिक ओळखेला डिजिटल ओळखेसोबत बंधनकारक केले जात आहे. हेच पोस्ट ट्रुथ आहे. येणाऱ्या काळात जे लोक सत्तेपासून व त्यांच्या देखरेखीपासून दूर जातील तेच सुरक्षित राहतील आणि टिकतील. जगाची वाटचाल हुकूमशाहीकडे होत असून लोकही ते स्वीकारत आहे.'
भारतातील अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोचित होत जाणारा अवकाश, वैचारिक मतभेदांप्रती असहिष्णुता आणि त्यातून झालेले कलबुर्गी, दाभोलकर, पानसरे यांच्या हत्या यांची निंदा करण्याच्या भूमिकेला समर्थन म्हणून डॉ. देवींनी स्वतःचा साहित्य अकादमी पुरस्कार परत केला. नंतर त्यांनी सुरु केलेल्या 'दक्षिणायन' अभियानाबद्दल सांगताना ते म्हणतात की, 'दक्षिणायन या वर्षाचा असा काळ असतो जेंव्हा रात्र मोठी असते आणि दिवस लहान झालेला असतो. गेली ३० वर्ष जगात उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग पडले आहेत. उत्तर हे समृद्धीचे प्रतीक मानले गेले आणि दक्षिणेला गरिबीचे प्रतीक मानले गेले. २०० वर्षात विकासाचे स्वरूप बदलून गेले व पाश्चिमात्यीकरण की पूर्वीकरण अशी मांडणी होत आली आहे. प्रत्येकाला उत्तरेला म्हणजेच सत्तेकडे (दिल्लीकडे) जाण्याची स्वार्थी इच्छा होत आहे. म्हणूनच मग या अभियानाला 'दक्षिणायन' हे नाव दिले आहे. येणाऱ्या वर्षभरात दक्षिणायनच्या विचारांची १०० पुस्तके आणि गांधी विचारांची परिणाम सांगणारी २० पुस्तके तयार होतील. ज्याचा या अभियानाला दिशा देण्यासाठी मोठा उपयोग होईल.'
डॉ. गणेश देवींना समजून घेताना त्यांच्या कामातील प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या एवढीच मेहनत घेत सक्रियपणे सहभागी असणाऱ्या डॉ. सुरेखा देवी यांना समजून घेतल्याशिवाय डाॅ. गणेश देवी यांना समजून घेण्याची प्रक्रिया पूर्ण होऊच शकणार नाही. यांना दिलेली आयुष्यभराची अनमोल साथ-सोबत मानवी नाते संबंधांमधील एक आदर्शच म्हणावा लागेल. २०० रिसर्च पेपर, २५ PhD साठी मार्गदर्शन करणाऱ्या आणि नोबेल पारितोषिक निवड समितीवर दोनदा काम केलेल्या डॉ. सुरेखा देवी व डॉ. गणेश देवी यासर्व कामातून जगण्याच्या संदर्भातील एक वेगळे भान नव्या पिढीला नक्कीच देऊन जातात.
प्रविण सिंधू भिमा शिंदे
pravinsindhubhima@gmail.com
Published at -
https://goo.gl/aqJ7D1
http://sumbaran.com/article/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा