२४ मे २०१८

आणखी जीव घेण्यास "राझी" नसलेली "सेहमत" ...



आपला देश, आपल्या देशातील माणसे आणि त्या माणसांसाठीची देश म्हणून काही प्रतीके यांचे त्या त्या देशातील माणसाच्या आयुष्यात काय महत्व आहे हे जर कुणाला विचारले तर कदाचित सांगता येणार नाही. पण त्याबद्दलची भावना मात्र प्रबळ असते आणि तेवढीच सार्वत्रिकही असते. याच भावनेतून मग आपल्या देशाप्रती अभिमान/प्रेम व्यक्त करण्यासाठी गाणी तयार होतात आणि ती गाणी काही कालावधीसाठी का होईना पण आपल्यामध्ये प्रचंड उत्साह भरतात.


प्रत्येक देशाला अशी गाणी असतात आणि प्रत्येक देशातील माणसाचे आपल्या देशावर असेच निस्सीम प्रेम असते. मग तो देश भारत असो, पाकिस्तान असो की आणखी कोणता.  #राझी या चित्रपटात देखील असेच एक गाणे आहे. ‘ए वतन मेरे वतन आबाद रहे तू, मै जहाँ रहू जहाँ में याद रहे तू ...’ राझीमधील या गाण्याचे एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे हे गाणे एकच आहे, पण ते एकच गाणे म्हणणारी माणसे राष्ट्र निर्मितीपासूनच शत्रुत्व घेऊन जन्माला येणाऱ्या भारत आणि पाकिस्तानचे नागरिक आहेत. या दोन्ही देशांची माणसे हे गाणे एकाच वेळी अत्यंत मनापासून आपल्याआपल्या देशासाठी म्हणत आहेत. त्यात आपल्या देशाप्रती प्रेम आहे, पण म्हणून दुसऱ्या देशाप्रती कोठेही द्वेष नाही. जेथे प्रेम आहे तेथे द्वेष कसा येईल? असाच काहीसा प्रश्नवजा संदेश त्यातून मिळतो. त्यामुळे त्या तत्कालिक काही क्षणांसाठी तरी तेथे प्रेमाची निखळ भावना व्यक्त होते. त्यावेळी काही क्षण मनात पटकन विचार येऊन जातो की मग या दोन देशांमध्येही असेच प्रेम तयार झाले तर ? ही खुपच सुखावणारी शक्यता आहे ना? हो नक्कीच आहे.


या गाण्याचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या गाण्याच्या शेवटी लहान मुलाच्या आवाजात एका प्रार्थनेचाही अंश आहे. हीच प्रार्थना भारताला स्वातंत्र्य मिळण्याअगोदर संपूर्ण देशात म्हटली जायची. याची आठवण स्वतः गुलजार यांनीच एका मुलाखतीत सांगितली. त्यावेळी गुलजार यांनी हेही आवर्जून सांगितले की या प्रार्थनेचे आणि “सारे जहाँ से अच्छा …” या गीताचे लेखक एकच आहेत आणि ते पाकिस्तानी होते. त्याचं नाव #इक्बाल आणि त्यांची ती प्रार्थना,


लब पे आती है दुआ बनके तमन्ना मेरी
जिंदगी शम्मा की सूरत हो खुदाया मेरी
दूर दुनीया का मेरे दम अन्धेरा हईओ जाये
हर जगह मेरे चमकने से उजाला हो जाये
हो मेरे दम से यूही मेरे वतन की जीनत
जिस तरह फूल से होती है चमन की जीनत
जिंदगी हो मेरी परवाने की सूरत या रब
इल्म की शम्मा से हो मुझको मोहब्बत या रब
हो मेरा काम गरीबो की हिमायत करना
दर्द मंदों से ज़ईफों से मोहब्बत करना
मेरे अल्लाह बुराई से बचाना मुझको
नेक जो राह हो उस राह पे चलाना मुझको


सेहमत आणि इकबाल यांच्या नात्याचा प्रवास तर खूपच संवेदनशील आहे. या नात्यात परस्पर सहमती आणि आदर हे खूप महत्वाचे पैलू दिसतात. लग्नानंतर पत्नीला समजून घेण्यासाठी आणि पत्नीला देखील पती समजून घेता यावा यासाठी ते जो वेळ घेतात तो खूपच प्रगल्भता दर्शवणारा भाग आहे. ही प्रगल्भता व्यक्तीनुसार २ देशांमध्ये देखील असेल तर … खरतर हा जर तरचाच प्रश्न आहे, पण चांगल्या शक्यतांबद्दल विचार करायला हरकत नाही. असो.


सेहमत ही तशी रक्त बघितले तरि चक्कर येणारी मुलगी. अगदी छोट्याश्या खारीला वाचवताना रस्त्यात असल्याचेही भान नसणाऱ्या सेहमतला पुढे देशातील समस्यांबद्दल वडिलांकडून माहिती दिली जाते आणि वडिलांच्या जागी हेरगिरी करण्यासाठी पाकिस्तानमध्ये लग्न करून पाठवले जाते. येथे एक प्रश्न मनात येतो तो म्हणजे सेहमतचे लग्न एवढ्या सहजासहजी कसे होते. दोन्ही देशात एकीकडे तणाव वाढत असताना हे होऊच कसे शकते असेही वाटू शकते आणि ते वाटायलाही हवे. याचे उत्तर आहे पाकिस्तानी सैन्याचा तो अधिकारी आणि हेरगिरी करणारा तो "भारतीय काश्मिरी मुस्लिम" यांच्यातील फाळणीपूर्वीचे नाते. बांग्लादेशची फाळणी होऊपर्यंत अशापद्धतीने नात्यांमध्ये काहीसा ओलावा शिल्लक होता का ? असा प्रश्न यानिमित्ताने पडतो. त्याचे उत्तरही होकारार्थी येते. हा चित्रपट घटीत घटनांवरच बेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. या दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने स्वीकारल्याचेही जाणवते ते याचमुळे कदाचित.


आपण कोठे राहतो यावर आपण घटनांकडे कसे पाहतो हे ठरत असते. त्याचा प्रत्यय या चित्रपटात येतो. म्हणजे दोन्ही देशांना वाटत असते की आपला देश सुरक्षित रहावा. आपल्या देशाच्या रक्षणाची जबाबदारी आपली आहे आणि महत्वाचे म्हणजे आमच्या अंतर्गत बाबींमध्ये बाहेरच्या देशांनी हस्तक्षेप करू नये. मग दोघांनाही असे वाटत असताना अडचण कुणाची आहे ? आणि का ? या दोन देशांमध्ये तणाव का निर्माण होतो ? यावर विचार करण्याची जबाबदारी चित्रपट दर्शकांवर सोपवतो.


सेहमत जम्मू काश्मीरमधील ‘भारतीय मुस्लीम मुलगी’. मला हा उल्लेख खूप महत्त्वाचा वाटतो. तो अशासाठी की सद्यस्थितीत मुस्लिमांबाबत एका रणनितीअंतर्गत देशविरोधी असल्याचे प्रचारतंत्र राबवले जात आहे आणि ती मुस्लीम व्यक्ती जम्मू काश्मीरमधील असेल तर मग त्याच्याविषयी आणखी जास्त संशयास्पद वातावरण निर्माण केले जाते. चित्रपट ज्या ‘कॉलिंग सेहमत’ या पुस्तकावर आधारित आहे, ते पुस्तक लिहिणाऱ्या लेखकाने याबाबतचा एक प्रश्न जम्मू काश्मीरच्या एका वरिष्ठ नेत्याला विचारला असता, त्याचे उत्तर देखील अंतर्मुख करायला भाग पाडते. त्या नेत्याने म्हटले होते, की ‘आपको एक सेहमत चाहिये, हजारो सेहमत है. सिर्फ उन्हे अपनाने की जरूरत हैं.’ जम्मू काश्मीरचा प्रश्नाचा विचार तेथील स्थानिक लोक वगळता उर्वरित देश कसा करत असेल तर जम्मू काश्मीर भारताची शान आहे आणि तेथील जमीनीचा इंच न इंच भाग भारताचा आहे, अशी. पण या सर्व हेव्यादाव्यांमध्ये तेथे राहणारे सर्व जम्मू आणि काश्मीरमधील माणसे आमची आहेत की नाही ? असा मुलभूत प्रश्नच हरवून जातो. या प्रश्नाला भिडण्याचीही गरज या निमित्ताने जाणवते.


बांग्लादेश फाळणी या विषयाला घेऊन सुरू झालेला हा चित्रपट शेवटपर्यंत आपल्याला देशभक्तीच्या ओतप्रोत भावनांमधून घेऊन जातो, काही ठिकाणी 'सेहमत'ची (आलिया भट) होणारी भावनिक ओढाताण, घुसमट देखील प्रकर्षाने जाणवते. मात्र या सर्व प्रवासातून अंतिमतः काय होते तर युद्ध (जंग). मग युद्धात काय होते ? याचा काहीसा अनुभव घेणारी सेहमत उद्वेगाने काही प्रश्न उपस्थित करते. सेहमतने उपस्थित केलेले हे प्रश्न आणि त्या प्रश्नांना भारतीय गुप्तहेर संस्थेतील त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेले उत्तर खूप महत्वाचे आहे आणि तेच सांगण्यासाठी अगोदरचा हा सर्व रोमांचक प्रवास अनुभवला आहे का असेही वाटते. तो संवाद आहे,


"वतन के आगे कुछ नही, खुद भी नही प्यार भी नही!
मैने अपना जमीर, जान, जिंदगी आपके लिये दि और आपने ? …
जंग में ना तुम्हारी कोई किमत होती है, ना मेरी
ना रिश्तो की किमत, ना जान की
जंग मे सिर्फ जंग होती है, और कई मासूमोंकी जाने जाती है."


यावेळी सेहमत खूप ठाम भूमिका घेते व इतर गुप्तहेरांसारखं तिला निर्दयी-पाशवी व्हायचे नाही आणि हे सर्व सोडून घरी जायचे आहे असे सांगतेे. भारतात आल्यावर देखील तिची आई तिला ती गरोदर असल्याचे सांगते, त्यावेळी ती क्षणाचाही वेळ न लावता आता आपण कोणाचाही जीव घेणार नसल्याचे स्पष्ट करते. हा क्षण अंगावर काटा आणणारा आहे. पोटात शत्रू समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानच्या नवऱ्यापासून होणारे बाळ असूनही त्याचा गर्भपात करायला नकार देत, सेहमत त्याला वाढवण्याचा निर्णय घेते आणि हाच मुलगा भारतीय सैन्यात दाखल होतो. तो चित्रपटात जहाजावर काम करत असताना दाखवला देखील आहे.


आशयाच्या पातळीवर चित्रपटाच्या सर्वात शेवटी कानावर पडलेले हे संवाद चित्रपटाचा गाभा आहे, असे मला वाटते. हा चित्रपट "Between the line" असे खूप काही सांगून जातो. आपल्यालाही आपल्या अनुभव विश्वानुसार या चित्रपटातील संवादाला घेऊन वर्तमानात काही सापडते आणि आपण त्याचा विचार करायला सुरुवात करतो.
आपल्याकडे  प्रेमाची आणि द्वेषाची सर्वच बीजे इतिहासात असल्याचे माझे व्यक्तीगत मत आहे. इतिहासातून पुढच्या पिढ्यांना घडवत असताना पुर्वजांकडून एकमेकांच्या कडवट आठवणींचा ठेवा दिला जातो,  की एकमेकांवर प्रेम करणारे काही सामायिक दुवे त्या पिढ्यांमध्ये झिरपवल्या जातात त्याप्रमाणे त्या देशातील जनमानसाचे मन घडत असते. हेच पुढे निर्णायक ठरते, याचा प्रत्यय आपल्यालाही येत आहेच.


राष्ट्रवादाच्या प्रवासात कोलमडणारी नाती आणि उद्ध्वस्त होणारे कुटुंब हा या प्रवासातील आणखी एक टप्पा. या टप्प्यावर मन पिळवटून काढणारे अनेक प्रसंग अनुभवायला मिळतात. हे सर्वच प्रसंग देश आणि धर्माच्या चौकटी ओलांडून आपल्यातील माणूसपणाला साद घालतात. जेव्हा आपल्यासमोर आपले माणुसपण जपायचे की राष्ट्रवाद असा प्रश्न येईल, तेव्हा रविंद्रनाथ टागोर यांचा राष्ट्रवादातील विचार देखील आठवतो.  रविंद्रनाथ टोगोर राष्ट्रवादाविषयी आपले विचार मांडताना आपल्या १९१७ च्या ‘नॅशनॅलिझम इन इंडिया’ नावाच्या निबंधात म्हणतात, ‘‘राष्ट्रवाद म्हणजे जनतेच्या स्वार्थाचे असे संघटीत रूप की ज्यामध्ये मानवता तसेच आपलेपणा किचिंतही शिल्लक राहात नाही. दुर्बल आणि असंघटीत शेजारी राज्यांवर अधिकार मिळवण्याचे प्रयत्न हा राष्ट्रवादाचा स्वाभाविक परिणाम आहे. ह्यातूनच निर्माण झालेला साम्राज्यवाद, अखेर मानवतेचा खुनी बनतो. राष्ट्राच्या बलविकासावर काही नियंत्रण शक्य नसते, त्याच्या विस्ताराला काही सीमा नसते. राष्ट्रवादाच्या अनियंत्रित शक्तीमध्येच मानवतेच्या विनाशाचे बीज आहे.’’ संकुचित राष्ट्रवादाच्या विरोधात ते पुढे लिहितात, “राष्ट्रवादातून जन्मणारी संकुचितता हा मानवाचे नैसर्गिक स्वातंत्र्य आणि आध्यात्मिक विकास यांच्या रस्त्यावरील अडथळा आहे.” ते राष्ट्रवादाला युद्धपिपासू वृ्त्तीला उत्तेजन देणारा आणि समाजविरोधी समजतात, कारण राष्ट्रवादाच्या नावांवर होणारा शासनशक्तीचा अनियंत्रित उपयोग अनेक अपराधांना जन्म घालतो.


चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा, संवाद, अभिनय सर्वच अप्रतिम. आलियाचा अभिनय तर प्रचंड ताकदीचा वाटला. ही ताकद चेहऱ्यावरील expression ची वाटली. तिच्या या expression मध्ये 'निरागसपणा' आणि ‘घुसमट’ हे भाव विशेष नोंद करून गेले. गाणी, संगीत तर ऐकत राहावं असंच आहे.


हा चित्रपट ज्या पुस्तकावर बेतला आहे त्याच्या लेखकांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये काही गोष्टी नमूद केल्या आहेत. त्यात त्यांनी हेही नमूद केले की सेहमत भारतात आली तेव्हा प्रचंड तणावात होती व तिने जे काही केले होते त्याबद्दल तिला अजिबात आनंद वाटला नव्हता. सेहमत भारतात जेथे रहात होती, तेथे ती का राहते असे विचारले तर तिने पाकिस्तानमध्ये ज्या अब्दुलला मारले तो येथेच राहत होता, असे सांगितले. सेहमत आणि तिच्या मुलांमध्ये देखील घडामोडींचा काय परिणाम झाला हे सांगताना त्यांच्यातील संबंध काहीसे दुरावल्याचेही लेखकांनी नोंदवले आहे. यातून हा सर्वच प्रवास किती गुंतागुंतीचा होता हे कळते. लेखकांनी हे देखील सांगितले की सेहमतकडून त्यांना गुरुनानक यांच्याबद्दल देखील खूप माहिती मिळाली. ते सेहमतचे वर्णन करताना म्हणतात, “Kashmiri Muslim Women Fight For India”, यात बरंच काही येते आणि ते समजून घेता आले तर खूप सकारात्मक परिस्थिती तयार होईल.


(नोंद - सेहमतचा मृत्यू जून २०१८ ला झाला आहे.)
#Raazi #राझी