एरिन ब्रोकोविच (चित्रपट)
"स्तन आणि गर्भाशय नसलेली स्त्री ही स्त्री असू शकते का ?" हा प्रश्न प्रचलित स्त्री असण्याच्या सर्वच संकल्पनांना धक्का देतो आणि त्या स्त्रीचे स्त्री असण्यापलीकडचे माणूसपण अधोरेखित करतो.
१४ मार्च २००० रोजी अमेरिकेत प्रदर्शित झालेला हा चित्रपट कॅलिफोर्नियामधील एका सत्य घटनेवर आधारित आहे. एक बेरोजगार आई (एरिन ब्रोकोविच) स्वतःच्या कष्टाने आणि गुणवत्तेच्या आधारावर आपल्या कामाचा ठसा उमटवते. कायद्याची प्रचलित कोणतीही पार्श्वभूमी आणि डिग्री नसतानाही संशोधक वृत्ती आणि कामाबद्दलची आत्मीयता याच्या बळावर एका वकिलाच्या कार्यालयात कायदेशीर कामात सहाय्यक बनते. त्यामाध्यमातून कॅलिफोर्नियातील असंख्य लोकांना ती न्याय मिळवून देते. "पॅसिफिक गॅस अँड इलेक्ट्रिक कंपनी ऑफ कॅलिफोर्निया" या कंपनीच्या प्रकल्पामुळे तेथील भूगर्भातील पाण्याचे प्रदूषण होऊन पाण्यात हेक्सावॅलेन्ट क्रोमिअमचे घटक मोठ्या प्रमाणात सोडले गेले. त्याचा परिणाम म्हणून तेथील स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणावर आजारांनी ग्रासले. अनेक लहान मुले, वृद्ध आणि तरुण स्त्री पुरुषांचा त्यात मृत्यूही झाला. १९९३ सालच्या वास्तविक घटनेवर आधारित हा चित्रपट त्या घटनांमध्ये वैश्विक पातळीवरील स्त्री जीवन दर्शकांसमोर ठेवतो. हा चित्रपट बघताना एक महत्वाची बाब लक्षात येते ती म्हणजे, "सर्वसामान्यपणे स्त्री जीवनाविषयी आणि त्यातही आई म्हणून असलेल्या जबाबदाऱ्या पेलताना होणारी स्त्रीची ससेहोलपट आणि खडतर प्रवास हा फक्त भारतीय परिप्रेक्ष्यापुरता मर्यादित नाही. तो शोषणाचा आणि पिळवणुकीचा अनुभवही वैश्विक आहे. पाश्चिमात्य जगातही मुक्त जीवनाच्या वाटेवर जगताना जबाबदाऱ्यांचे ओझे हे तेथील स्त्रीवरच येते. असे होत असतानाही या जबाबदाऱ्यांना तोंड देत नोकरीसाठी आटापिटा करत नोकरी मिळवून कामाच्या ठिकाणी स्वतःच्या कामातून समाजात स्वतःचे स्थान संवेदनशीलपणे निर्माण केले.
एरिनचे ऐन उमेदीच्या काळात लग्न झाले आणि त्यामुळे जे काम करत होती तेही मध्येच सुटले. मध्यंतरीच्या मोठ्या काळाचे अंतर आणि नंतर आई म्हणून तीन मुलांच्या जबाबदारीसह इराणचा घटस्फोट होतो. यापुढेच सुरु होते या चित्रपटाची खरी कथा.
चित्रपटाची वैशिट्ये म्हणजे, संपूर्ण चित्रपट कोठेही संगीताचा अथवा पार्श्वसंगीताचा भडीमार करत नाही. अनेक चित्रपटांत काल्पनिकता आणि अतिशयोक्ती करत मांडणी होते, पण या चित्रपटात तसे काहीही आढळत नाही. अगदी साधेपणाने दैनंदिन जगण्यातील ठिकाणे आणि प्रसंग अर्थपूर्ण पद्धतीने मांडलेली दिसतात. ती घालत असलेल्या कपड्यांवर कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून जो आक्षेप घेतला जातो तो समाजाचा आरसा दाखवतो. तर उलटप्रश्नी सहकाऱ्याला त्याच्या वेशभूषेत (टाय घालू नये) बदल करण्यास सांगताना समाजाचा दुटप्पी चेहराही समोर येतो. अनेकदा स्त्रियांना आजूबाजूला असलेल्या वातावरणामुळे असेच वाटू लागते की मी काही करू शकणार नाही, मला काहीही काम करता येत नाही. त्यातून महिला आणखी मागे राहतात. तशीच स्थिती एरिन या महिलेच्या रूपाने या चित्रपटात दाखवली आहे, पण फरक एवढाच आहे की एरिन फक्त तेवढ्यावरच थांबत नाही तर त्या परिस्थितीशी संघर्ष करते. हा संघर्ष पुढे सर्वच गृहीतके मोडीत काढत अमेरिकेच्या सामाजिक क्षेत्रात मैलाचा दगड ठरतो. आजपर्यंतच्या सर्वात जास्त मोबदला मिळवून देणारी कायदेशीर लढाई एरिनच्या कामातून उभी राहते आणि यशस्वी होते.
पत्रकारितेचा विद्यार्थी म्हणून हा चित्रपट बघताना काही वेगळे दृष्टिकोनही समोर आले. एरिन या सामान्य स्त्रीने ज्या असामान्यपणे तिच्या कामाच्या संबंधाने घटनास्थळांवर जाऊन संशोधन केले आणि पुरावे मिळवले ते "शोध पत्रकारितेला" प्रोत्साहन देणारे होते. त्या प्रकल्पाच्या प्रदूषणाने गंभीर आजारी पडलेल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एरिनही मोठ्या काळापासून त्या प्रदूषणात काम करत असते आणि त्यामुळे तीही काही प्रमाणात आजारी पडलेली असते. हे सर्व दाखवण्यासाठी चित्रपट एरिनचा एका आजारी मुलीशी संवाद दाखवला आहे, ज्यात त्या लहान मुलीच्या चेहऱ्यावर आजारपणाचे स्पष्ट संकेत दिसत असतात. पण कॅमेरा जेव्हा विरुद्ध दिशेला बसलेल्या एरिनच्या चेहऱ्यावर येतो तेव्हा ते दृश्य त्या मुलीच्या स्थितीत आणि एरिनच्या स्थितीत खूप काही साम्य असल्याचे सुचवितो. कॅन्सर आणि इतर आजाराने शस्त्रक्रिया करायला लागलेली महिला एरिनला विचारते की "स्तन आणि गर्भाशय नसलेली स्त्री ही स्त्री असू शकते का ?" हा प्रश्न प्रचलित स्त्री असण्याच्या सर्वच संकल्पनांना धक्का देतो आणि त्या स्त्रीचे स्त्री असण्यापलीकडचे माणूसपण अधोरेखित करतो.
एका बलाढ्य कंपनीविरोधात असलेले हे काम थांबण्यासाठी एरिनला आर्थिक अमिषापासून तर अगदी जीवे मारण्याच्या धमक्यांपर्यंत प्रकार होतात तरी एरिन थांबत नाही कारण ती या घटनांकडे माणूस म्हणून बघत असते. या माणूसपणाचे दर्शन तिच्या दोन महिला वकिलांसोबतच्या संवादात स्पष्टपणे दिसते. एरिन ज्या केसवर काम करत असते त्या संबंधित प्रत्येक व्यक्तीशी तिचे व्यक्तिगत नाते तयार झालेले असते. त्या प्रत्येकाची इतंभूत माहिती तिला तोंड पाठ असते, पण तरीही तिच्या सोबत काम करणाऱ्या वरिष्ठ महिला वकिलाकडून तिच्याशी वाईट वागणूक होते. पण एरिन तिला सडेतोडपणे उत्तर देते.
दुसऱ्या एका प्रसंगात प्रकरण मिटवण्यासाठी आलेल्या महिला वकिलाच्या पैशाच्या भाषेतील मांडणीला एरिन खूप चपखलपणे स्त्री जीवनाच्या अंगाने खोडते आणि तिला वास्तवाची जाणीव करून देत. वकिलाच्या भूमिकेतील त्या महिलेला महिला प्रश्नांवर जागे करते. खरतर स्त्री जीवन हे कौटुंबिक दृष्टिकोनातून खूपच संवेदनशील आहे. ही संवेदनशीलता खूप सकारात्मक पद्धतीने या चित्रपटात मांडली आहे.
कामानिमित्त नेहमी घराबाहेर राहायला लागल्यामुळे एरिनच्या अगदी लहान वयातील मुलांना आईचा सहवास मिळत नाही. त्यातून एरिनचा ८ वर्षाचा मुलगा तिच्यावर नाराज होतो. एरिनच्या मनात हा प्रश्न पडतो की, "मी जे महत्वाचे आम करते आहे हे माझ्या मुलांना कधी समजेल ? ज्यामुळे ते नाराज होणार नाही ?" आई म्हणून हा प्रसंग आणि एकूणच स्थिती तिची कसोटी बघणारी ठरते. पण कामाचे गांभीर्य तिला काम सुरु ठेवण्यास मदत करते. पुढे तिचा तोच मुलगा जो आईला रात्र रात्र काही कागदपत्रे वाचत असलेली बघतो आणि ती कागदपत्रे वाचून आईला विचारतो की "या ठिकाणी उल्लेख असलेल्या मुलीचे वयही माझ्या एवढेच आहे आणि ती आजारी आहे ना ?" त्यावर आई त्याला म्हणते "हो, मी तिलाच मदत करते आहे." त्यावर तो मुलगा पुन्हा म्हणतो की मग तिची आई तिला का मदत करत नाही ?" "तिची आई देखील आजारी आहे" हे समजल्या नंतर त्या मुलाच्या वागण्यात जो बदल होतो तो खूप काही सांगून जातो. त्या संवेदनशील बदलाचे समाधान एरिनच्या चेहऱ्यावर खूप प्रभावीपणे दिसतात. आयुष्यात एकटी असलेली एरिन नव्याने झालेल्या मित्राच्या मदतीमुळे जास्त वेळ काम करू शकली पण शेवटी तोही जेव्हा सोडून जाण्याचा निर्णय घेतो. तेव्हा मात्र एरिन एकूणच पुरुषी मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. यावर तिचा मित्र "मी इतरांसारखा नाही यासाठी काय करायला हवे ?" असे विचारतो तेव्हा एरिन खूप खंबीरपणे स्पष्ट सांगते की "अश्या स्थितीत तू येथेच थांब इतरांसारखा निघून जाऊ नको." हा प्रसंग अनेक महिलांना कणखरपणे भूमिका घ्यायला प्रेरणा देतो. कालांतराने पुन्हा तो मित्र आणि ती एकत्र येतात. या मित्राला आपण एवढे दिवस काय करत होतो हे दाखवण्यासाठी त्या समस्याग्रस्त स्थानिकांच्या भेटीला नेते तेव्हा त्या सर्व लोकांच्या चेहऱ्यावरील न्याय मिळाल्याचे समाधान एरिनच्या मित्राचे अनेक प्रश्न निकाली काढते.
अशा पद्धतीने "एरिन ब्रोकोविच" हा चित्रपट दर्शकांना चित्रपट कसे असतात आणि कसे असावेत हे बघण्याची दृष्टी तर देतोच पण भारतीय चित्रपट सृष्टीत वास्तवाला भिडणाऱ्या चित्रपटांची उणीव देखील तीव्रपणे अधोरेखित करतो.
एरिन ब्रोकोविच


छान मांडलंय
उत्तर द्याहटवाधन्यवाद राहुल.
हटवास्तन व गर्भाशय असल्याने स्रीत्व सिध्द होत नाहि.मनातील मात्रृत्व व ममता स्रीत्व सिध्द होत.प्रक्रुति संपूर्ण आहे,पुरुष अपूर्ण आहे.
उत्तर द्याहटवाअगदी बरोबर आहे सर. या चित्रपटातील त्या स्त्रीने उपस्थित केलेला प्रश्न हेच सुचवत आहे कि स्त्रीचे स्त्रीत्व हे फक्त तिच्या शारीरिक अवयवांमध्ये नसते तर ते तिच्या माणूसपणात, व्यक्तिमत्वात असते.
उत्तर द्याहटवाYou've picked up the exact same things which appealed me the most. Truly Amazing Inspiration! 😊👍
उत्तर द्याहटवा